आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या वारकरी संप्रदायाचे मूळ नाथ संप्रदायात आहे. वारकरी संप्रदायाचा पाया घालणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ हे नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथांचे शिष्य होते. गहिनीनाथांचे गुरु व मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ यांनी संपूर्ण भारतभर फिरून नाथसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी निर्माण केलेले मठ आणि मंदिरे देशात जागोजागी आढळतात. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गोरक्षनाथांचे प्रसिद्ध मंदिर आहे. महाराष्ट्रातील हजारो नाथपंथीय मंदिरांपैकी बीड जिल्ह्यातील गोरक्षनाथ टेकडी विशेष प्रसिद्ध आहे. येथील गोरक्षनाथ समाधी मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
हे मंदिर सुमारे बाराव्या शतकातील असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. प्रत्यक्ष गोरक्षनाथ व गुरु मच्छिंद्रनाथ यांचे वास्तव्य येथे होते, असे म्हटले जाते. या स्थानाबाबत आख्यायिका अशी की गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना स्त्रीराज्यातून परत आणले, तेव्हा मैनाकिनी राणीने मच्छिंद्रनाथांच्या झोळीत सोन्याची वीट दिली होती. आपल्या गुरूंच्या झोळीत सोन्याची वीट असल्याने त्यांच्या मनात भीतीचा विकार निर्माण झाला असावा, हे ओळखून गोरक्षनाथांनी गुरूंच्या झोळीतील सोन्याची वीट फेकून दिली.
ही गोष्ट मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आली तेव्हा ते गोरक्षनाथांवर खूप रागावले. गुरूंच्या मनातील विकार नाहीसा करण्यासाठी गोरक्षनाथांनी योगसामर्थ्याने संपूर्ण टेकडी सोन्याची केली व ‘आपणास हवे तेवढे सोने घेऊन जा,’ असे गुरूंना सांगितले. तेव्हा मच्छिंद्रनाथांच्या मनातील विकार नाहीसा झाला. नंतर याच टेकडीवर काही काळ वास्तव्य करून त्यांनी सर्व गोसावी, योगी, साधू व संन्यासी यांना भोजन दिले. अन्नदानाची ती परंपरा आजही कायम आहे.
बीड-परळी महामार्गावर घाटसावली गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन चौकोनी स्तंभ व त्यावरील तुळईवर बाशिंग, असे या स्वागत कमानीचे स्वरूप आहे. येथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर गोरक्षनाथ टेकडी आहे. टेकडीच्या पायथ्याशी विस्तीर्ण मैदान आहे. तेथे सुमारे चाळीस हजार चौरस फूट आकारमानाचा प्रशस्त सभामंडप आहे. याच सभामंडपात उत्सवप्रसंगी अन्नदान, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे दोनशे पायऱ्या आहेत.
या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. टेकडीच्या माथ्यावर मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर स्थित मुखमंडपास तीन पायऱ्या आहेत. येथून सभामंडपात प्रवेश करता येतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्य बाजूंनी चौकोनी व मध्यभागी गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. बाह्य बाजूचे चौकोनी स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. येथील वितानावर चक्रनक्षी आहे. सभामंडपात ह.भ.प. नवनाथ बाबांची गादी आहे. पुढे गोरक्षनाथ समाधीचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे, तसेच ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. गर्भगृहात मागील भिंतीला लागून विविध देवतांच्या तसबिरी आहेत. गर्भगृहाचे द्वादशकोनी छत भिंतींवर तोललेले आहे. हे छत एकावर एक ठेवलेल्या पाषाणात साकारले आहे. घुमटाकार वितानावर चक्राकार नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. या शिखराचा खालील पहिला थर षटकोनी आहे. शिखराचे दुसरे, तिसरे व चौथे थर गोलाकार आहेत व त्यात पद्ममंडल नक्षी आहेत. शिखराच्या पाचव्या निमुळत्या थरात स्तंभनक्षी आहे.
त्याच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व आमलकावर कळस आहे.
गोरक्षनाथ समाधी मंदिराच्या बाजूला ह.भ.प. किसनबाबा व ह.भ.प. साधूबाबा यांचे समाधी मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभ्या धारेची नक्षी आहे. गर्भगृहात ह.भ.प. किसनबाबा व ह.भ.प. साधूबाबा यांच्या समाधींचे चौथरे आहेत. दोन्ही समाध्यांच्या मध्यभागी शेंदूरचर्चित पाषाण आहे. मंदिराच्या छतावरील पाच थरांच्या शिखराची रचना गोरक्षनाथ समाधी मंदिराच्या शिखरासारखीच आहे.
मंदिरासमोर प्रांगणात शेंदूरचर्चित नऊ पाषाण आहेत. हे नवनाथांचे स्थान असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या प्रांगणात तुळजाभवानीचे लहानसे मंदिर आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार अरुंद व खुजे आहे. मंदिरात वज्रपीठावर तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर दोन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालील पहिल्या थरात पद्ममंडल आहे, तर चारही बाजूंना चार देवकोष्ठके आहेत; त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या वरील निमुळत्या थरात स्तंभनक्षी आहे. शीर्षभागी आमलक व कळस आहे. तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला तुळशी वृंदावनही आहे. मंदिराच्या प्रांगणात महंत शांतीब्रम्ह नवनाथबाबा यांचे निवासस्थान आहे.
नाथ संप्रदायात बीज (महिन्याची दुसरी/तिसरी तिथी) अत्यंत शुभ मानली जाते. घाटसावली येथे धर्मनाथ बीज सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या दिवशी विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. याशिवाय मंदिरात तुकाराम बीज, किसनबाबा पुण्यतिथी, नवनाथबाबा पुण्यतिथी आदी प्रसंगी वार्षिक सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावेळी सलग सात दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रम होतात. दर महिन्याच्या पौर्णिमेला महाउत्सवाचे आयोजन केले जाते. सर्व उत्सवांच्या वेळी राज्यभरातून हजारो भाविक समाधीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. मंदिरात चैत्रपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांत आदी सण व उत्सव साजरे केले जातात. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रोजच वर्दळ असते.