चंद्रपूर शहरापासून गडचिरोलीकडे जाणाऱ्या मार्गावर मूलरोड परिसरात मारुतीची २ प्रसिद्ध स्थाने आहेत. त्यापैकी अजयपूर–पिंपळझोरा येथील झोपलेला मारुती हे जागृत व स्वयंभू स्थान मानले जाते. तेथे मारुतीची झोपलेल्या अवस्थेतील सुमारे १० फूट लांबीची व ५ फूट रुंदीची स्वयंभू मूर्ती आहे. गर्द झाडीमध्ये व वनखात्याच्या अखत्यारित असलेले हे स्थान भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान, तर पर्यटकांसाठी सुंदर पर्यटनस्थळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर चिचपल्ली येथे ६३ फूट उंचीची मारुतीची भव्य व वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे.
असे सांगितले जाते की श्री कुमरे महाराज हे मारुतीचे भक्त होते. एके दिवशी त्यांना मारुतीने स्वप्नदृष्टांत देऊन पिंपळझोरा येथील जंगलात आपण असल्याचे सांगितले. श्री कुमरे महाराजांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर त्या घनदाट अरण्यात मारुतीची मूर्ती शोधून काढली. या मूर्तीचे वेगळेपण म्हणजे ती झोपलेल्या अवस्थेत आहे. महाराजांनी या परिसरात साफसफाई करून मूर्तीच्या बाजूने छोटेसे मंदिर बांधले व स्वतःसाठीही मंदिराशेजारी झोपडी बांधून ते तेथे तप–साधना करू लागले; परंतु घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर असे. यासाठी कुमरे महाराजांनी मंदिरासमोरील एका झाडावर मचान तयार केले व रात्री ते त्यावर मुक्काम करत असत.
स्वयंभू मूर्ती व नवसाला पावणारा मारुती, अशी या मारुतीची अल्पावधीतच ख्याती झाली. त्यामुळे येथे दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढू लागली. साधारणतः २००५ च्या सुमारास येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिकाणी मारुतीचे मोठे मंदिर बांधले. ‘संकटमोचन हनुमान मंदिर’ असे मंदिराचे नाव असले तरी भाविकांमध्ये ते झोपलेला मारुती मंदिर म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.
अजयपूरच्या बाजूला असलेल्या पिंपळझोरा येथे हे मंदिर आहे. मुख्य मार्गावर वाहनतळ व वनखात्याची चौकी असून तेथून शुल्क भरून मंदिर परिसरात प्रवेश करावा लागतो. या चौकीजवळ पूजासाहित्याची २० ते २५ दुकाने आहेत. मंदिर परिसरात फरसबंदी केलेली आहे. त्यामुळे गर्द झाडीत असलेला हा परिसर स्वच्छ, प्रसन्न व शांत भासतो. मुख्य मंदिरासमोर सभामंडप असून त्यापुढे गर्भगृहात झोपलेल्या मारुतीची शेंदूरचर्चित भव्य मूर्ती आहे. श्रीरामांच्या वानर सेनेने ज्याप्रमाणे लंकेला जाण्यासाठी समुद्रावर सेतू निर्माण केले होते, त्याची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती या मंदिरासमोर तयार करण्यात आली आहे. भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने ते येथील आकर्षण आहे. या सेतूच्या प्रतिकृतीजवळ असलेल्या एका उंच झाडावर श्री कुमरे महाराजांनी बनविलेले मचान आजही पाहता येते. या मंदिराजवळच एक नदी असून काही भाविक तेथे स्नान करून मारुतीच्या दर्शनाला येतात. दर शनिवारी पूजा करण्यासाठी येथे भाविकांची गर्दी असते, तर सुटीच्या दिवशीही अनेक पर्यटक येथे येतात.
वन्यप्राण्यांपासून भाविक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसराला तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. या परिसरात अनेक उद्याने विकसित करण्यात आली असून त्यामध्ये झोपाळे, बसण्यासाठी बाके, लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय येथे विविध वन्यप्राण्यांची हुबेहूब वाटावीत अशी शिल्पे आहेत. ही शिल्पे विविध झाडांमध्ये, गवतामध्ये ठेवण्यात आली आहेत. त्यांचा आकार व त्यावर केलेली कलाकुसर यामुळे या प्राण्यांच्या प्रतिकृती जिवंत भासतात. नदी किनारी बांधलेल्या घाटामुळे भाविकांना व पर्यटकांना तेथे स्नान करणे सोयीचे होते.
हा भाग दाट जंगलांचा असल्यामुळे येथे वन्यप्राण्यांचाही वावर असतो. त्यामुळे सायंकाळनंतर येथे कोणासही थांबण्यास परवानगी दिली जात नाही. सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक या स्थानाला भेट देतात. याशिवाय भाविक व पर्यटकांकडून येथे वनभोजनाचा कार्यक्रमही करण्यात येतो. मात्र त्यासाठी वनविभागाचे शुल्क भरून त्यांची रितसर परवानगी घ्यावी लागते.
अजयपूरपासून काही अंतरावर असलेल्या मूलरोडवरील चिचपल्ली या गावात महारुद्र कष्टभंजन हनुमान मंदिर आहे. येथे मारुतीचे मंदिर जरी असले तरी येथील आकर्षण आहे ते येथील ६३ फूट उंचीची (साधारणतः सहा मजली इमारतीइतकी) मारुतीची भव्य मूर्ती. ही मूर्ती तयार करताना अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र व अध्यात्म यांचा आधार घेण्यात आला आहे. एका आख्यायिकेनुसार या परिसरात रावणाचे भाऊ खर व दूषण यांचे वास्तव्य होते. श्रीरामांनी या दोघांचा त्यांच्या सैन्यासह वध केला होता. असे सांगितले जाते की येथे मारुतीचे वास्तव्य आहे. त्यामुळे या परिसरात अनेक मारुतीची मंदिरे आहेत.
एका रुद्राचे रूप म्हणून एका साधूने महारुद्र कष्टभंजन हनुमान मंदिराची स्थापना केली होती. रुद्राचे १६ मंत्र म्हणून या मारुतीला १६ अक्षरी नाव दिले. १४ लोकांचे ब्रह्मांड म्हणून १४ फूट उंचावर हनुमानाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. ब्रह्मदेवाकडून कमळाच्या पाकळ्यांनी सृष्टी निर्माण केली गेली म्हणून या पाकळ्यांवर हनुमानाची स्थापना करण्यात आली आहे. नवविधी म्हणून आशीर्वादाचा हात ३६ इंच (३+६=९) व ६३ फूट (३+६=९) उंची त्यामुळे येथेही ९ ही संख्या येते. या परिसरात ९ ठिकाणी रामनामाची यंत्रे स्थापित आहेत. मागे सिंहासन व वर छत्र दिले आहे. छत्र हे १० दिग्पालांचे अधिपत्य दर्शविते म्हणून ते १० फुटांच्या मापाचे आहे. १२ राशी व २७ नक्षत्रांमुळे या छत्राला ३९ घंटी लावल्या आहेत, त्या प्रत्येक घंटीमध्ये राशींची व नक्षत्रांची प्रतिष्ठापना केली आहे. रुद्राचा ११ वा अवतार म्हणून ११ फुटी झेंडा लावला आहे. या मोठ्या मूर्तीच्या पायाजवळ असलेली पूजेची मूर्ती ५१ किलो अष्टधातूपासून तयार केली आहे. या मारुतीच्या चरणाखाली ध्यान मंदिर असून भाविक तेथे रामनामाचे लेखन करतात.