विदर्भातील समृद्ध संतपरंपरेमध्ये संतशिरोमणी येल्होजी महाराज यांचे नाव आदराने घेतले जाते. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील जांभोरा येथे त्यांचे प्राचीन समाधी मंदिर आहे. श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त असलेले येल्होजी महाराज हे सुतार समाजाचे आराध्यदैवत मानले जातात. मोगल काळापासून महत्त्व लाभलेल्या या स्थानाला राज्य सरकारने ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा दिला आहे. मंदिर परिसरात महाराजांच्या संजीवन समाधीसोबतच नवनाथ आणि महालक्ष्मी देवीची मंदिरे आहेत. येथे इ.स. १७११ मधील ऐतिहासिक सनदही पाहायला मिळते. आध्यात्मिक शांतता आणि प्रबोधनाचा वारसा जपणारे हे मंदिर विदर्भातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मोगल राजवटीच्या काळात बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा या गावातील सुतार कुटुंबात येल्होजी महाराजांचा जन्म झाला. त्यांना चार भाऊ होते. बालपणापासूनच ते कृष्णभक्तीत तल्लीन असत. तारुण्यातही ते कोणताही व्यवसाय न करता कृष्णभजनात दंग राहत असल्यामुळे त्यांच्या माता-पित्यांना चिंता वाटत होती. अखेर त्यांनी येल्होजी महाराजांना गुरे राखण्याचे काम दिले. मात्र, रानातही गुरे राखण्याऐवाजी ते कृष्णभक्तीतच मग्न राहायचे. परिणामी गुरे नजीकच्या शेतात घुसून पिकांचे नुकसान करत. या प्रकारामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी एकदा येल्होजी महाराजांना बेदम मारहाण केली.
असे सांगितले जाते की त्या वेळी श्रीकृष्णाने स्वतः येल्होजी महाराजांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवून त्यांच्या जखमा बऱ्या केल्या होत्या. तेव्हापासून श्रीकृष्ण स्वतः अदृश्यावस्थेत येल्होजी महाराजांची गुरे सांभाळत व त्यांच्या बासरीचा आवाजही कानावर पडत असे. श्रीकृष्णाच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त झालेले येल्होजी महाराज पंचक्रोशीत प्रबोधनाचे कार्य करू लागले. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरल्याने अनेक अनुयायी त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले.
जांभोरा परिसरात भणगोजी नावाचा मोठा जहागीरदार होता. एकदा भणगोजीने मोगल राजवटीला खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त बादशहाने भणगोजीच्या मुलाला कैद करून त्याला सुळावर चढवण्याचे फर्मान सोडले. हतबल झालेल्या भणगोजीने अंधेरा येथे येऊन मुलाच्या सुटकेसाठी येल्होजी महाराजांना साकडे घातले. तेव्हा ‘तू चिंता करू नकोस, उद्या पहाटेपर्यंत तुझा मुलगा सुखरूप घरी येईल,’ अशा शब्दांत आश्वस्त करत महाराजांनी भणगोजीला घरी जाण्यास सांगितले. तिकडे बादशहा भ्रमिष्टासारखी बडबड करू लागला. चिंतेत पडलेल्या बेगमने वजीराकडे विचारणा केली असता, भणगोजीच्या मुलाला शिक्षा सुनावल्यापासून बादशहाची ही स्थिती झाल्याचे वजीराने सांगितले.
ते ऐकून बेगमने भणगोजीच्या मुलाची शिक्षा माफ करून त्याची सुटका केली. दुसऱ्या दिवशी पहाटे मुलगा घरी परतल्यानंतर भणगोजी पुन्हा अंधेरा येथे आले आणि गुरुदक्षिणा म्हणून मोठी जहागिरी देण्याची इच्छा व्यक्त केली. येल्होजी महाराजांनी ती स्वीकारण्यास नकार दिल्यानंतरही भणगोजींनी जांभोरासह ११ गावांची जहागिरी अर्पण केली. तेव्हापासून येल्होजी महाराज जांभोरा येथे स्थायिक होऊन अनुयायांना मार्गदर्शन करू लागले. काही वर्षांनी गावातील नवनाथ मंदिराजवळ त्यांनी संजीवन समाधी घेतली. कालांतराने याच ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात आले. या गावातील पाटीलकी अनेक वर्षांपासून सुतार समाजाकडेच होती. त्यांच्या वंशजांकडे बादशहाच्या नावाचा शिक्का असलेली फसली ११२१ म्हणजेच इसवी सन १७११ हे साल नमूद असलेली व लोखंडी पत्र्यावर कोरलेली सनद आजही उपलब्ध आहे. येल्होजी महाराजांच्या समाधी मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला.
उंचावर वसलेल्या या मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात.
मंदिराच्या आकर्षक प्रवेशद्वारावर नगारखाना व त्यावरील भागात मिनारसारखी रचना आहे. या प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश करताना डावीकडे गजराजाचे शिल्प आहे. विस्तीर्ण प्रांगणात उजव्या बाजूस येल्होजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी सूर्यप्रतिमा आहे. तळघरात असलेल्या समाधीस्थानाकडे येण्यासाठी सभामंडपातून काही पायऱ्या आहेत. खाली उतरल्यावर समाधीस्थानी येल्होजी महाराजांची कृष्णवर्णीय पाषाणातील मूर्ती आहे. सुंदर पोषाख व पागोटे ल्यालेल्या या मूर्तीच्या गळ्यात उपरणे आणि रुद्राक्षाच्या माळा आहेत. या समाधीच्या मागे एक भुयार आहे. असे सांगण्यात येते की याच भुयारात बसून येल्होजी महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. वरच्या भागात सभामंडपाच्या समोर असलेल्या गर्भगृहातील चौथऱ्यावर काचबंद पेटीत बासरीवादन करणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागे गोमाता आहे आणि समोर लाकडी रेलिंग बसवण्यात आले आहे. या मूर्तीच्या मागील बाजूस येल्होजी महाराजांची पंचधातूची मूर्ती आहे. समाधी मंदिरातील मूळ मूर्तीची झीज होत असल्यामुळे नित्यपूजेसाठी काही वर्षांपूर्वी ही नवीन मूर्ती घडवण्यात आली. जवळच येल्होजी महाराजांच्या पादुका, त्यांची गादी व पलंग या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. या मंदिराच्या गर्भगृहावर घुमटाकार शिखर आणि त्यावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे.
या मंदिराजवळ नवनाथांचे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरात नवनाथांची एक प्रतिमा आणि नऊ समाध्या आहेत. जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दोन मूर्ती आहेत.
नवनाथ मंदिर तसेच महालक्ष्मी मंदिरावरही घुमटाकार शिखरे आहेत. मंदिर परिसरात एक भुयार आहे. पक्क्या बांधकामाच्या या भुयारात उतरण्यासाठी पायऱ्या करण्यात आल्या आहेत. या भुयारात नवनाथांचे तैलचित्र व त्यांच्या प्रतिमा आहेत. माघ शुद्ध द्वितीयेला येणाऱ्या धर्मनाथबीजेच्या आधी होणाऱ्या सप्ताहादरम्यान येथे नवनाथांचे पारायण होते.
या मंदिराला चारही बाजूंनी तटबंदी आहे आणि मागील बाजूसही एक प्रवेशद्वार आहे. तटबंदीच्या आतील भागात काही ओवऱ्या आहेत. येथील स्वयंपाकगृहात मोठ्या आकाराच्या चुली आहेत. उत्सवकाळात त्यावर महाप्रसाद तयार केला जातो. मंदिराच्या परिसरात या मंदिराच्याच समकालीन दोन बारव आहेत. या बारवांना चारही बाजूंनी पायऱ्या आहेत आणि मध्यभागी छोट्या आकाराचा हौद आहे. येथून काही पावलांवर ‘सीतान्हाणी’ म्हणून प्रसिद्ध असलेले झऱ्यांचे ठिकाण आहे.
जांभोरा येथील मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महाशिवरात्री व श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या धार्मिक परंपरेतील सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे श्री संत येल्होजी महाराजांची पुण्यतिथी. ती दरवर्षी माघ वद्य दशमी या तिथीला साजरी होते. या निमित्ताने जांभोरा येथे जत्रा भरते. या उत्सवकाळात भजन, कीर्तन, महाप्रसाद यांसारखे विविध धार्मिक विधी पार पडतात.