राज्यातील अनेक घराण्यांची कुलदेवता असलेली आदिशक्ती श्री यमाई देवी हिचे मूळपीठ सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावात आहे. शिवशक्तिस्वरूपिणी यमाई देवी म्हणजे शिव आणि पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप, अशी मान्यता आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये यमाई देवीची अनेक पीठे आहेत. त्यात औंधच्या देवीचे स्थान हे जागृत व मूळपीठ असल्याने या देवस्थानाचे महत्त्व जास्त आहे.
औंध या नावाबद्दल व देवीच्या मंदिराबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळात कंटकगिरी परिसरात औंधासुर नावाच्या राक्षसाचे वास्तव्य होते. तो अतिशय बलाढ्य असून त्याची या परिसरात दहशत होती. या परिसरात तपश्चर्या करणाऱ्या ऋषी–मुनींनाही तो त्रास देत असे. तेव्हा ज्य़ोतिबाने औंधासुरासोबत युद्ध केले, पण त्याची शक्ती कमी पडू लागली. त्यावेळी त्याने अंतर्ज्ञानाने पाहिले असता या राक्षसाचा वध यमाई देवीच्या हातून असल्याचे त्याला दिसले. त्यावरून त्याने यमाई देवीला येथे येण्याची विनंती केली. यमाई देवीने औंधासुरासोबत युद्ध करून त्याचा पाडाव केला. तेव्हा आपली चूक मान्य करून औंधासुराने देवीकडे विनंती केली की असे काही कर ज्याने माझे नाव घेतले जाईल. तेव्हा देवीने हा परिसर तुझ्या नावाने यापुढे ओळखला जाईल, असे वरदान दिले व त्याचा वध केला. तेव्हापासून कंटकगिरी हा परिसर औंध म्हणून प्रचलित झाला. तेव्हा ज्योतिबाच्या विनंतीवरून देवीने याच भागात वास्तव्य करण्याचे मान्य केले.
औंध गावामध्ये आणि गावाजवळील टेकडीवर यमाई देवीची दोन मंदिरे आहेत. गावातील मंदिर भगवानराव पंतप्रतिनिधी यांनी बांधले असून त्यांच्या राजवाड्याजवळ ते आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिरासमोर चार भव्य दीपमाळा आहेत. त्यातील एक दीपमाळ ही सुमारे ६५ फूट उंचीची आहे. असे म्हटले जाते की ही दीपमाळ महाराष्ट्रातील सर्वात मोठी दीपमाळ आहे. मंदिराच्या आवारात औंधासुर राक्षसाचे शिल्प आहे. या मंदिराचा सभामंडप लाकडी असून देवीची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आणि चांदीच्या प्रभावळीत बसवलेली आहे. डोंगरावर असणाऱ्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी औध गावापासून दोन मार्ग आहेत. एक जुना पायरी मार्गाने ४३३ पायऱ्या आहेत. दुसरा नव्याने बनविलेला डांबरी रस्ता असून तेथून थेट मंदिरापर्यंत वाहने जाऊ शकतात.
टेकडीवर असणाऱ्या देवीच्या मूळ मंदिराभोवती उंच तटबंदी असून जेजुरीच्या खंडोबा मंदिराप्रमाणे याची बांधणी आहे. या तटबंदीला दहा बुरूज असून दक्षिण आणि उत्तरेकडे प्रवेशद्वारे आहेत. तटबंदीच्या पूर्वेकडे व उत्तरेकडे असलेल्या शिलालेखांमध्ये या मंदिराच्या व तटबंदीच्या बांधकामाविषयीची नोंद आहे. उत्तरेकडे असणाऱ्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात जाता येते. तटबंदीच्या आतील बाजूला नऊ ओवऱ्या आहेत. यातील कोनाड्यांमध्ये देवी–देवतांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मुख्य मंदिर एक ते दीड मीटर उंचीच्या जोत्यावर असून ते हेमाडपंती रचनेचे आहे. मंदिराला सुंदर रंगकाम केलेले आहे, मात्र ते करताना त्यावरील शिल्पांचे नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. येथील शिल्पांमध्ये अनेक देव–देवतांच्या मूर्तींबरोबर दशावतारांच्या मूर्तीही आहेत. शिखरावर ठिकठिकाणी वेलबुट्टी, फुले व प्राणी यांचे नक्षीकाम आहे.
मुख्य मंदिरासमोर नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाच्या दोन्ही बाजूला उंच दीपमाळा आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असून सभामंडपाच्या छतावर कोरीव काम केलेले आहे. गर्भगृहात चांदीच्या प्रभावळीत असणारी यमाई देवीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून सुमारे पाच फूट उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या हातांमध्ये त्रिशूल, गदा, बाण व पानपत्र आहे. या मूर्तीसमोर शिवपिंडी आहे. मंदिराभोवती असणाऱ्या उंच तटबंदीवर जाण्यासाठी दोन्ही प्रवेशद्वारांच्या बाजूने पायऱ्या आहेत. या तटबंदीवरून संपूर्ण औंध गाव आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवता येते. सर्वत्र असलेल्या पवनचक्क्यांमुळे हा परिसर आणखी सुंदर भासतो.
मंदिराच्या आवारामध्ये देवीच्या मंदिराव्यतिरिक्त आणखी एक मंदिर आहे. ते मंदिर दत्ताचे असले तरी त्यात दत्तमूर्ती नसून एक पिंडी आहे. पिंडीवर दत्ताचे रूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची तीन स्थाने असून असे मंदिर दुर्मिळ समजले जाते. ही मंदिरे चालुक्यकाळातील असावीत, असे सांगितले जाते.
नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतो. या उत्सवात गोंधळी, डबरी, सफाई काम करणारे लोक, दिवट्या धरणारे लोक यांना सेवेचा मान असतो. पौष महिन्याच्या पौर्णिमेला औंधासुराला मारण्याचा विजयोत्सव म्हणून देवीची दोन दिवस यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रातून, तसेच महाराष्ट्राबाहेरूनही भक्त येतात. यात पहिल्या दिवशी सर्व दीपमाळा प्रज्वलित करण्यात येऊन देवीची पालखी काढली जाते. नाकात नथ, गळ्यात डोरलं, लक्ष्मीहार, चांदीचे डोळे, चांदीचा मुकुट असा देवीचा साजशृंगार करण्यात येतो. यावेळी देवीची पूजा करून रथातून मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीतील जल्लोष व होणारी गुलाल–खोबऱ्याची उधळण यामुळे सारे वातावरण भारलेले असते.