व्याडेश्वर मंदिर

गुहागर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील व्याडेश्वर मंदिर हे गुहागरसह अवघ्या जिल्ह्याचे दैवत समजले जाते. येथील चित्पावन ब्राह्मण घराण्यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १६३७ साली गुहागरमधील कवी विश्वनाथ महादेव पित्रे यांनी या देवस्थानासंदर्भात संस्कृत भाषेत केलेले लिखाण कोलकत्ता येथील एशियाटिक सोसायटीत जतन करण्यात आलेले आहे. त्यातील माहितीनुसार व्याडेश्वराचे हे मंदिर १२ व्या शतकात बांधलेले असून येथील शिवपिंडी ही त्यापेक्षा प्राचीन आहे

या स्थानाची अख्यायिका अशी की परशुरामाने कोकणभूमीची निर्मिती केल्यानंतर अनेक ऋषीमुनी या भागात येऊन राहू लागले. त्यापैकी एक व्याडमुनी होते. त्यांनी या जागेवर स्वतःला पूजा करता यावी यासाठी शिवलिंगाची स्थापना केली होती. पुढे कलियुगात साकुराणा या पराक्रमी राजाचे येथे राज्य होते. त्यावेळी या परिसरात सर्वत्र बांबूची बेटे जंगल होते. आज जेथे व्याडेश्वर मंदिर आहे, त्याशेजारी राजाच्या घोड्यांचा तबेला होता. घोड्यांच्या शिंगरांना दूध पाजण्यासाठी तेथे काही गाईही होत्या. यामधील एक गाय खूपच कमी दूध देत असे. मात्र तीच गाय बांबूच्या बेटात असलेल्या एका खडकावर दुधाचा अभिषेक करताना गवळ्याला दिसली. ते पाहून चिडलेल्या गवळ्याने गाईला बदडलेच, शिवाय त्या खडकावरही कुऱ्हाडीने जोरदार प्रहार केला. प्रहार करताच खडकातून रक्त येऊ लागले.

खडकातून रक्त येऊ लागल्याचे वृत्त राजापर्यंत गेले. तेव्हा तो मंत्र्यांसह त्या ठिकाणी आला. त्याने खडकाच्या सगळ्या बाजूंनी खणण्याचा सेवकांना आदेश दिला. मात्र कितीही खणले तरी तो खडक जागचा हालला नाहीच, शिवाय तेथून अनेक साप बाहेर येऊ लागले. त्यामुळे पुन्हा तो खड्डा बुजवण्यात आला. त्यावर राजदरबारात विचारविनिमय सुरू असताना एका पंडिताने हा खडक म्हणजे व्याडमुनींनी स्थापन केलेली शिवपिंडी असावी, असे सांगितले. यावर सर्वांचे एकमत झाले; परंतु भंगलेल्या शिवलिंगावर मंदिर बांधावे की नाही याबाबत राजाच्या मनात संभ्रम होता. त्याच रात्री राजाला महादेवांनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की लिंग आहे तसेच राहू दे, त्यावर उद्या सकाळी ज्या पुरुषाचे तुला प्रथम दर्शन होईल, त्याच्या पावलाच्या आकाराएवढे तेथे मंदिर बांध, असे केलेस तर तुझे कल्याण होईल. या दृष्टांताचे पालन करण्याचे राजाने ठरविले.

त्यानुसार सकाळी महालातील खिडकीतून बाहेर पाहत असताना राजाला प्रथम एक गांगडक नावाचा बुटका तरुण दिसला. त्यामुळे या तरुणाचे पाऊल आणि भव्य शिवलिंग यांचा मेळ कसा घालावा, हे राजाला सुचत नव्हते. राजाने त्या बुटक्या तरुणाला शिवलिंगाजवळ नेले आतापर्यंत झालेला सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर क्षणाचाही विलंब करता या तरुणाने सुरी काढून पायाचे कातडे बाजूला केले. ते सर्व शक्तिनिशी सर्वबाजूंनी ताणल्यावर त्याचा आकार सध्याच्या मंदिराएवढा झाला. त्यानंतर त्याने राजाला या आकाराचे मंदिर बांध, असे सांगितले. मात्र यादरम्यान झालेल्या रक्तस्रावाने गांगडक बेशुद्ध पडला तेथेच त्याने प्राण सोडले. या जागेवर राजा सांकुराणा याने त्रिकम नावाच्या मंत्र्याला मंदिर बांधण्याची आज्ञा केली. वाड म्हणजेच तबेल्याजवळ हे लिंग सापडले म्हणून त्याचे नाव व्याडेश्वर ठेवण्यात आले.

व्याडेश्वराचे हे स्थान प्राचीन असले तरी सध्याचे मंदिर हे साधारणतः ३५० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. समुद्र किनाऱ्यालगत नारळीपोफळीच्या बागांमध्ये हे मंदिर स्थित आहे. तटभिंतीयुक्त असलेल्या मंदिराचे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार आकर्षक आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सिंह, नर्तकी असून द्वारपट्टीवर नागांची शिल्पे कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस लहान लहान तीन शिखरे आहेत. याशिवाय तटभिंतीला उत्तर दक्षिण दिशेलाही प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस असलेल्या दोन मोठ्या कोनाड्यांत हनुमंत गरुड यांच्या सुमारे चार फूट उंचीच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की यातील गरुडाची मूर्ती नवीन असून त्याऐवजी तेथे पूर्वीपासून चंदेशाची मूर्ती होती. हाताच्या घडीत त्रिशूळ दोन हात जोडलेले असे चंदेशाचे रूप असते. चंदेश हा लाडका गण समजला जातो. मंदिरात येोणाऱ्या भक्तांची तो नोंद ठेवतो, अशी समजूत आहे. तामिळनाडूसारख्या राज्यांमधील शिवमंदिरांत चंदेशाच्या मूर्ती आढळतात; परंतु महाराष्ट्रात तशा मूर्ती आढळणे दुर्मीळ आहे. येथील चंदेशाची मूर्ती भग्न झाल्यामुळे विसर्जन केली गेली आणि त्याच्या जागी गरुडाची मूर्ती बसविण्यात आलेली आहे.

मंदिराच्या प्रांगणात व्याडेश्वराच्या मुख्य मंदिरासह सूर्य, गणपती, अंबिका विष्णू यांची मंदिरे आहेत. त्यामुळे हा मंदिर परिसर शिवपंचायतन म्हणून ओळखला जातो. याशिवाय प्रांगणात दोन विहिरी आहेत. पूर्वाभिमुख असलेल्या मुख्य मंदिरासमोर नंदीमंडप असून त्यात अखंड पाषाणातील एक मोठा नंदी विराजमान आहे. रंगकाम केल्यामुळे या नंदीवर कोरलेली घंटांची माळ विविध आभूषणे स्पष्टपणे दिसतात. नंदीमंडपाच्या बाजूला दीपमाळ आहे. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या दक्षिणेकडील भिंतीला लागून असलेल्या लहानशा खोलीत एक त्रिकोणी आकाराची विहीर आहे. मंदिरातील पूजेसाठी या विहिरीचे पाणी वापरले जाते. अशा प्रकारे मंदिरातच विहीर असणारे स्थान इतरत्र सहसा आढळत नाही. या सभामंडपाचे त्यावरील छताचे बांधकाम हे दगडांतील असून त्यात चार झरोके, चार मोठे चार लहान कोनाडे आहेत. याशिवाय संपूर्ण सभामंडपात सर्व बाजूंनी दगडी महिरपी कमानींची कलाकुसर केलेली दिसते.

अंतराळात एका लहानशा उंच चौथऱ्यावर संगमरवरी कासव आहे. येथे असणाऱ्या गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर कोरीव काम असून ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती, तर खालील बाजूस कीर्तिमुख कोरलेले आहे. येथील गर्भगृह काहीसे खोलवर असून त्यामध्ये प्राचीन स्वयंभू शिवपिंडी आहे. या शिवपिंडीची रचना पाहिल्यास त्यावर घाव घातल्याच्या खुणा दिसतात. शिवलिंगाभोवती सात फण्यांचा पितळी नाग आहे. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूच्या भिंतींवर नागांची विविध शिल्पे, मोर, फुले असे कोरीव काम आहे. तसेच जगतीवर अनेक चक्र कमळ कोरलेले आहेत.

मंदिरात आषाढी एकादशी, श्रावणी सोमवार, नागपंचमी, पितृपंधरवडा, विजयादशमी, कार्तिकी एकादशी, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्र होळी असे उत्सव साजरे होतात. कधी पाऊस लांबला किंवा त्यात खंड पडला तर व्याडेश्वराचा गाभारा पाण्याने भरून देवास कोंडतात. त्यानंतर पर्जन्यवृष्टी होते, असा येथे समज आहे. भाविकांसाठी येथे अभिषेक, षोडशोपचारी पूजा लघुरुद्र अभिषेक असे विधी केल्या जातात. त्यासाठी मंदिर समिती वा येथील पुजाऱ्यांशी आगाऊ संपर्क साधावा लागतो. (संपर्क : संजीव गोंधळेकर, प्रशांत कानडे, चंद्रशेखर भावे (सर्व पुजारी) : मो. ९१६८२४०९०१

उपयुक्त माहिती:

  • गुहागर बस स्थानकापासून २०० मीटर, तर रत्नागिरीपासून ८८ किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांतून थेट एसटी सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर समिती कार्यालय : ०२३५९ २४०९०१
Back To Home