मुंबईतील वडाळा, साताऱ्यातील जावळी तालुक्यातील करहर, पुण्यातील मावळ तालुक्यातील दुधीवरे आपटी, कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ, अमरावती जिल्ह्यातील विदर्भपंढरी म्हणून ओळखले जाणारे कौडण्यपूर अशी अनेक स्थाने आजमितीस प्रतिपंढरपूर म्हणून ओळखली जातात. त्यातील छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज परिसरातील श्री क्षेत्र पंढरपूरचे वैशिष्ट्य म्हणजे येथून वाहणारी खाम नदी. पंढरपूर येथे चंद्रभागा नदीने ज्या प्रमाणे चंद्रकोरीचा आकार धारण केलेला आहे, त्याच प्रमाणे वाळूजच्या पंढरपूर परिसरातील विठ्ठल मंदिरासमोरून खाम नदीही चंद्रकोरीच्या आकारातच वाहत आहे. त्यामुळे हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
विठोबाचे पंढरपूर हे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तेलंगणातीलही कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पंढरपूरला होणाऱ्या आषाढी आणि कार्तिकी यात्रेनिमित्ताने तेथे भाविकांची मांदियाळी जमते. गावागावांतून तेथे संतांच्या पालख्या जात असतात. लक्षावधी वारकरी त्या दिंड्यांमध्ये सहभागी होतात; परंतु ज्यांना काही कारणांमुळे या वारींमध्ये सहभागी होता येत नाही, ते भाविक आपापल्या परिसरातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जातात. छत्रपती संभाजीनगर शहराच्या परिसरात विठ्ठल–रुक्मिणीची अशी तब्बल ५६ मंदिरे आहेत. मात्र मंदिरासमोरील चंद्रभागेच्या रूपातील खाम नदीमुळे या मंदिरास भाविकांच्या दृष्टीने खास महत्त्व आहे. या मंदिराला किमान १०० वर्षांची परंपरा आहे. येथील वैशिष्ट्य असे की हे मंदिर ज्या परिसरात आहे, त्या परिसरालाही पंढरपूर हेच नाव देण्यात आलेले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज हा परिसर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमआयडीसीतर्फे विकसित होण्यापूर्वी दाट झाडाझुडपांनी व्यापलेला होता. येथे वळदगाव नजीक हे प्राचीन विठ्ठल–रुक्मिणी मंदिर होते. या मंदिराविषयी आख्यायिका अशी की पंढरपूरमध्ये पुंडलिक हा थोर मातृ–पितृभक्त होता. तो त्याच्या आई–वडिलांची करीत असलेली सेवा पाहून वैकुंठीचा देव प्रसन्न झाला. त्याला भेटण्यासाठी विठ्ठल आणि रुक्मिणी हे पंढरपूरला जात असताना वाटेत त्यांना खाम नदीकाठचा हा परिसर दिसला. येथील रम्य परिसर पाहून विठ्ठल आणि रुक्मिणीला येथे थांबण्याचा मोह झाला. काही काळ येथे विश्रांती घेतल्यावर त्यांनी पंढरपूरकडे प्रयाण केले. ते ज्या ठिकाणी थांबले होते, त्या जागेवर त्यांच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. तेथेच आज हे मंदिर उभे आहे.
पूर्वी येथे छोटेखानी मंदिर होते. वाळूज परिसरातील भाविकांनी एकत्र येऊन सर्वप्रथम १९६४ मध्ये या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी पंढरपूरच्या विठ्ठल–रुक्मिणीच्या मूर्तींप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या मूर्ती येथे प्रतिष्ठापित करण्यात आल्या. त्यानंतर १९६५ मध्ये धर्मादाय आयुक्तांकडे या मंदिराची नोंदणी करण्यात आली. कालांतराने १९८५ मध्ये वाळूज परिसर औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर झाले. अनेक कारखाने येथे आले व गावाची भरभराट झाली. या मंदिराकडे भक्तांचा ओघ वाढू लागला. तेव्हा येथील भाविकांनी या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यास भव्य रूप देण्याचे ठरविले. इ.स. २००२ मध्ये जीर्णोद्धाराच्या कामास शुभारंभ करण्यात आला. ते काम २००७ मध्ये पूर्ण झाले आणि येथे हे मंदिर साकारले गेले.
वाळूज नगराच्या मुख्य रस्त्याला लागून मंदिराची ही वास्तू आहे. सभामंडप, गर्भगृह व त्यावर उंचच उंच शिखर, अशी या मंदिराची रचना आहे. ही रचना द्रविड स्थापत्यशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. शिखरावर कळसापर्यंत अनेक देवीदेवता व संतांच्या मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिर जमिनीपासून काहीसे उंचावर असून चार पायऱ्या चढून दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपाच्या वरील बाजूस असलेल्या देवड्यांमध्ये महाराष्ट्रातील थोर संतांच्या मूर्ती आहेत. या मंडपाच्या उजवीकडे सिद्धिविनायक गणपतीचे लहानसे मंदिर आहे, तर डावीकडे तुळशी वृंदावन आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ज्याप्रमाणे नामदेव पायरी आहे, तशीच रचना येथे केलेली आहे. येथील पायऱ्यांवर संत नामदेवांची वीणाधारी संगमरवरी मूर्ती आहे.
दर्शमंडपातील मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपाच्या भिंतीच्या वरील बाजूला दशावताराच्या मूर्ती आहेत. पंढरपूर मंदिराप्रमाणे येथे आणखी एक साम्य आहे, ते म्हणजे या सभामंडपात असलेला गरुड खांब. सभामंडपात डावीकडे असलेल्या या गरुडखांबाला अलिंगन देऊन नंतर विठ्ठल–रुख्मिणीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. गर्भगृहासमोर भाविकांच्या सोयीसाठी व रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी स्टीलचे रेलिंग लावण्यात आले आहेत. गर्भगृहात एका चौथऱ्यावरील मखरात विठ्ठल व रुख्मिणी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. या मूर्ती पंढरपूर येथील मंदिरात असलेल्या मूर्तींप्रमाणेच असल्याचे सांगितले जाते.
मंदिरात दर एकादशीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. वारकऱ्यांसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन तिथी अत्यंत महत्त्वाच्या. त्या दिवशी येथे लाखो भाविकांची गर्दी जमते. परिसरातील गावांतून येथे अनेक दिंड्या येतात. या दिवशी मंदिरास विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते व मंदिराच्या गर्भगृहास फुलांनी सजविले जाते.