श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या सूर्योदयापूर्वी मेहकर तालुक्यात सप्तर्षींनी स्थापित केलेल्या शिवमंदिरांच्या परिक्रमेतील शेवटचे मंदिर विश्वी येथे आहे. विश्वामित्र ऋषींनी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून तप केल्याची आख्यायिका आहे. विश्वामित्री नदीजवळ वसलेल्या या स्थानी विश्वामित्र ऋषींनी केलेल्या एका यज्ञादरम्यान विघ्न आणणाऱ्या एका दैत्याच्या संहारासाठी श्रीराम व लक्ष्मण येथे आल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यातील परिक्रमेत हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जातो.
पौराणिक इतिहासात महर्षी विश्वामित्र हे दुर्दम्य जिद्द आणि विलक्षण इच्छाशक्तीचे मूर्तिमंत प्रतीक मानले जातात. विश्वामित्र हे पूर्वाश्रमी ‘कौशिक’ नावाचे, एक अत्यंत पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष क्षत्रिय राजा होते. एकदा आपल्या सेनेसह महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात गेले असता, तिथे असलेल्या ‘कामधेनू’ गाईचा प्रभाव आणि सामर्थ्य पाहून राजा कौशिकाला तिचा मोह झाला. त्यांनी आपल्या सत्तेच्या आणि सैन्याच्या बळावर ती गाय बळकावण्याचा प्रयत्न केला. परंतु वसिष्ठांच्या ब्रह्मदंडापुढे त्यांचे क्षात्रबळ निष्प्रभ ठरले. या पराभवाने त्यांना जीवनाचे सत्य उमजले.
‘क्षत्रिय बळापेक्षा ब्रह्मतेज (तपोबळ) हेच श्रेष्ठ आहे’, हे ओळखून त्यांनी राज्याचा त्याग केला आणि तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला.
विश्वामित्रांनी हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली. इंद्राने त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवले, ही कथा सर्वश्रुत आहे. त्यांच्याच अलौकिक बुद्धिमत्तेतून हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या ‘गायत्री मंत्राची’ निर्मिती झाली. तो मंत्र आजही घराघरात जपला जातो. विश्वामित्र हे अत्यंत कोपिष्ट पण तेवढेच वचनबद्ध होते. जेव्हा सत्यव्रत (त्रिशंकू) राजाला स्वर्गात स्थान नाकारले गेले, तेव्हा विश्वामित्रांनी आपल्या तपोबळावर चक्क एक ‘प्रतिसृष्टी’ अर्थात स्वतंत्र स्वर्ग निर्माण करण्याचे आव्हान पेलले होते. रामायणातही विश्वामित्रांचे स्थान अनन्यसाधारण आहे. श्रीराम व लक्ष्मणाला दशरथाकडून मागून नेणारे आणि त्यांना शस्त्रास्त्रांचे ज्ञान देऊन त्राटिका व इतर राक्षसांचा नाश करायला लावणारे गुरु विश्वामित्रच होते. सीतेच्या स्वयंवरासाठी रामाला जनकपुरीला नेण्याचे श्रेयही त्यांनाच जाते.
प्राचीन काळी मेहकर हा दंडकारण्याचा भाग होता. या दंडकारण्यात बकदालभ्य ऋषींनी देळप, वाल्मिकी ऋषींनी वरवंड, वसिष्ठ ऋषींनी वडाळी, गौतम ऋषींनी गोमेधर, पाराशर ऋषींनी पाथर्डी, दुर्वास ऋषींनी दुर्गबोरी तर विश्वामित्र ऋषींनी विश्वी येथे तप करून शिवलिंगांची स्थापना केली होती. श्रावण महिन्यात शिवशंकरांची आराधना केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी सूर्योदयापूर्वी जिल्ह्यातील हजारो भाविक या सातही मंदिरांची परिक्रमा करतात.
श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी रात्री सर्व परिक्रमावासी वडाळी येथील शिवमंदिरात एकत्र येतात. मध्यरात्री १२ च्या सुमारास तेथील गोमुखाखाली स्नान करून महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर ओल्या अंगाने या परिक्रमेला प्रारंभ होतो. विश्वी येथील मंदिरात शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर या परिक्रमेचा समारोप होतो. सोमवारी सूर्योदयापूर्वी ही परिक्रमा पूर्ण करावी लागते. या सातही ठिकाणी गोमुखांमधून जलधारा कोसळत असतात. या धारांखाली स्नान केल्यास अभ्यंग स्नानाचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांच्या सीमेनजीक विश्वी हे गाव आहे. त्रेतायुगात विश्वामित्र ऋषींनी येथे शिवलिंगाची स्थापना केली. त्यांनी अनेक वर्षे येथे तप केले. एकदा त्यांनी येथे यज्ञ केला. परिसरात राहणाऱ्या दैत्याने या यज्ञात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. विश्वामित्र ऋषींनी केलेल्या विनंतीनंतर त्या काळात वनवासादरम्यान दंडकारण्यात वास्तव्याला असलेले श्रीराम आणि लक्ष्मण येथे आले आणि त्यांनी या दैत्याचा संहार केल्याची आख्यायिका आहे. त्या काळात सीतामाता येथून सुमारे पाच कि.मी. अंतरावरील वसाली (ता. पातूर) येथील गुहेत वास्तव्यास होती, असे सांगण्यात येते. तेथे सीता न्हाणीही आहे. विश्वी येथील विश्वेश्वर मंदिराचे कालौघात अनेकदा जीर्णोद्धार झाले. अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. राज्य सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा दिलेला आहे.
मंदिराला निसर्गसमृद्ध परिसर लाभला आहे. मंदिराजवळून विश्वामित्री नदी वाहते. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेले मोठे प्रांगण आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे बारा ज्योतिर्लिंग मंदिर आहे. येथे एका ओळीत जोडून बारा शिवलिंगे आहेत.
एका कोपऱ्यात नंदीची छोटी मूर्ती आहे. या मंदिराला लागूनच एक सभागृह आहे. त्याच्या प्रवेशाजवळ गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते. विविध उत्सवांप्रसंगी या सभागृहाचा वापर केला जातो. प्रांगणाच्या उजवीकडे असलेल्या हनुमान मंदिरात पवनसुताची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. जवळच असलेल्या एका चौथऱ्यावर शनिदेवाची मूर्ती आहे. नजीकच अवदुंबराचे झाड आहे. मुख्य मंदिरासमोरही मोठे प्रांगण आहे. सभामंडप आणि मध्यभागी असलेले गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गर्भगृहातील भिंतींवर फरशा बसवण्यात आल्या आहेत. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये विश्वेश्वराचे शिवलिंग आहे. दगडी शाळुंकेवर पंचधातूचा पत्रा बसवण्यात आला आहे.
मंदिर परिसरात महाकाली मातेचे प्राचीन मंदिर आहे. काही पायऱ्या चढून या मंदिरात यावे लागते. येथे देवीचा मोठा शेंदूरचर्चित तांदळा आहे. त्यावर भुवया, डोळे, नाक, ओठ, जीभ कोरलेले आहेत. या मंदिरालगतच भक्तनिवास उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या परिसरात असलेल्या गोमुख कुंडात येण्यासाठी काही पायऱ्या उतराव्या लागतात. श्रावण महिन्यात होणाऱ्या परिक्रमेदरम्यान या कुंडात स्नान करून भाविक विश्वेश्वर महादेवाचे दर्शन घेतात. मंदिर परिसरात एके ठिकाणी काही प्राचीन मूर्ती तसेच शिवलिंगही ठेवलेले दिसतात.
महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव असतो. या उत्सवानिमित्त येथे होणाऱ्या सप्ताहादरम्यान भजन, कीर्तन, भागवतकथा कथन आदी कार्यक्रम होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी परिसरात मोठी जत्रा भरते. पंचक्रोशीतील असंख्य भाविक या दिवशी दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागतात. त्या दिवशी भाविकांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात येते. श्रावण महिन्यात होणाऱ्या सप्तर्षी मंदिर परिक्रमेदरम्यान येणाऱ्या भाविकांना येथे फराळ व चहापानाची व्यवस्था करण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान येथील महाकाली मंदिरात नवरात्रोत्सव होतो. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.