भारतीय लोकसंस्कृतीत ‘ग्रामदैवत’ आणि ‘क्षेत्रपाळ’ या संकल्पनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गरम्य डोंगररांगांच्या कुशीत आणि मोहाडी घाटाच्या दुर्गम परिसरात वसलेली प्राचीन महादेव व म्हसोबा मंदिरे याचेच मूर्तिमंत रूप आहेत. शिस्तप्रिय वैदिक परंपरेतील भगवान शंकर आणि कष्टकरी-पशुपालक समाजाचे रक्षक लोकदैवत ‘म्हसोबा’ यांचे एकाच ठिकाणी असणारे सहअस्तित्व हे या स्थानाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. येथील महादेव मंदिराचे आणखी एक वेगळेपण म्हणजे गर्भगृहात असलेल्या तीन पिंडी. या तीन पिंडी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानल्या जातात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या जागृत देवस्थानात विशेषतः श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी हजारो भक्तांची मांदियाळी असते.
महादेव आणि म्हसोबा या दोन देवता भिन्न वाटत असल्या, तरी त्यांच्यात एक सखोल ‘अद्वैत’ नाते आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर, म्हसोबा हे महादेवाचेच एक रूप किंवा अंश मानले जाते. शैव परंपरेत शिवाला ‘पशुपती’ म्हटले जाते आणि ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषतः
शेतकरी आणि धनगर समाजात, गुराढोरांचे आणि शेतीचे रक्षण करणारा देव म्हणून म्हसोबाची पूजा केली जाते. म्हणजेच, शिवाची जी रक्षणकर्ता ही भूमिका आहे, तीच भूमिका ग्रामीण स्तरावर म्हसोबा पार पाडतात. अनेक ठिकाणी म्हसोबाला शिवाचा भैरव किंवा रुद्र या उग्र रूपाचा आविष्कार मानले जाते. ज्याप्रमाणे शिवाला स्मशान आणि वैराग्य प्रिय आहे, तसेच म्हसोबाचे स्थानही गावाबाहेर, शिवारात किंवा अरण्यात असते. हे साधर्म्य त्यांच्यातील नाते स्पष्ट करते.
पौराणिक संदर्भांचा विचार करता, म्हसोबा या नावाची उत्पत्ती महिष (रेडा) या शब्दाशी जोडली जाते. काही लोककथांनुसार, देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर त्याच्या पश्चात्तापदग्ध आत्म्याला रक्षक म्हणून राहण्याचा वर मिळाला आणि तो शिवाचा गण बनला. तर, नाथ संप्रदायाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी म्हसोबाला शिवाचा निष्ठावान सेवक किंवा क्षेत्रपाळ मानले जाते. महादेवाच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी किंवा गावाच्या सीमा ओलांडण्यापूर्वी क्षेत्रपाळाची (म्हसोबाची) परवानगी घेणे किंवा त्याला नमन करणे, ही प्रथा या नात्याची साक्ष देते.
भक्तांच्या दृष्टीने, महादेव हे मोक्ष देणारे व म्हसोबा हे दैनंदिन जीवनातील संकटांपासून वाचवणारे दैवत आहेत.
मोहाडी हे गाव चिखली-खामगाव या महत्त्वाच्या राज्य महामार्गावर स्थित आहे. हा रस्ता ज्या घाटातून जातो, त्याला मोहाडी घाट म्हणून ओळखले जाते. या घाटाच्या एका तीव्र उताराच्या आणि वळणावळणाच्या रस्त्यावर येथील महादेव व म्हसोबा मंदिरे आहेत. प्राचीन काळी आणि मध्ययुगात, जेव्हा रस्ते आणि वाहनांची सोय नव्हती, तेव्हा घाट ओलांडणे हे एक आव्हानात्मक आणि काहीसे धोकादायक मानले जात असे. अशा वेळी, घाटाच्या सुरुवातीला किंवा मध्यभागी असलेल्या देवतेची पूजा करून पुढे जाण्याची प्रथा व्यापाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये रूढ होती. मोहाडीचे हे मंदिर अशाच मोक्याच्या ठिकाणी वसलेले आहे. पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अवर्णनीय असते. मंदिराच्या जवळून वाहणारे नैसर्गिक धबधबे आणि ओढे हे येथील प्रमुख आकर्षण आहेत. त्यामुळे भाविकांसोबतच अनेक पर्यटकांचीही येथे वर्दळ असते.
मुख्य रस्त्यापासून काही पायऱ्या उतरून महादेव मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेल्या या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. मुख्य मंदिराच्या शेजारी नव्याने सभामंडप बांधलेला आहे. मूळ मंदिर हे प्रांगणापेक्षा काहीसे खोलवर असल्याने आठ पायऱ्या उतरून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एक नंदी व त्याशेजारी त्रिशूळ आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर गणपतीची मूर्ती आहे. गोलाकार आकारात असलेल्या या गर्भगृहात वज्रपीठावर तीन पिंडी आहेत. यापैकी एक मोठी व इतर दोन सारख्या आकाराच्या आहेत. या तिन्ही पिंडींवर पितळी पत्र्याची आवरणे आहेत. त्यांवर नागांनी छत्र धरलेले आहेत व तिन्ही पिंडींच्या वर छताला अभिषेकपात्रे टांगलेली आहेत. या तीन पिंडी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक म्हणून येथे पुजल्या जातात. या गर्भगृहाला दोन दरवाजे व बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या मंदिराच्या प्रांगणात एक कुंड व एक विहीर आहे. याशिवाय प्रांगणात समाध्यांचे तीन चौथरे व त्यावर शिवपिंडी आहेत. याशिवाय प्रांगणात अनेक प्राचीन मूर्ती, पिंडी व नंदीमूर्ती आहेत.
या मंदिरापासून सुमारे ५० मीटर अंतरावर म्हसोबाचे मंदिर आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिरात येण्यासाठी आठ पायऱ्या आहेत. लहानसा सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी वज्रपीठावर म्हसोबाची शेंदूरचर्चित शिळा आहे.
मंदिर परिसरात असलेल्या प्रशस्त प्रांगणात उत्सवप्रसंगी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या मंदिरात दररोज सकाळी व सायंकाळी आरती केली जाते. महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव आहे. या उत्सवानिमित्त व श्रावण महिन्यात येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात नामांकित कीर्तनकारांची कीर्तने होतात. सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. उत्सवकाळात संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिर परिसरात पूजा-प्रसाद तसेच विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने सजतात. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेली मंडळी या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. दररोज सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात महादेव व म्हसोबाचे दर्शन घेता येते.