चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ला हा गोंड साम्राज्याचा ‘माणिक’ समजला जातो. ऐतिहासिक उल्लेखानुसार नागवंशीय राजा महिन्दू योन यांनी ९व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली होती. त्यांचे राज्य १२व्या शतकापर्यंत टिकले. या किल्ल्याच्या पायथ्याशी साधारणतः त्याच कालावधीतील प्राचीन हेमाडपंती विष्णूमंदिर आहे. जिवती तालुक्यात असलेल्या अनेक मंदिरांपैकी हे एकमेव प्राचीन मंदिर समजले जाते. परिसरातील हजारो भाविकांचे ते श्रद्धास्थान असून भाविकांसोबतच माणिकगड किल्ल्यामुळे शेकडो पर्यटकही दररोज या मंदिराला भेट देतात.
गडचांदूरकडून जिवतीकडे जाताना एक मोठा घाट पार केल्यावर माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. येथे वनविभागाची चौकी असून तेथून उजवीकडे माणिकगड किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे, तर डावीकडून खालच्या बाजूला प्राचीन विष्णू मंदिर आहे. चौकीपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे १५० पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराच्या प्रांगणात गेल्यावर ते डोंगर उतारावरती वसले असल्याचे जाणवते. या मंदिराची बांधणी काळ्या पाषाणांची व हेमाडपंती रचनेची आहे. आजूबाजूला असलेले घनदाट जंगल व त्याच्या मध्यभागी स्थित या मंदिराला शिखर व भिंती नाहीत. तरीही हे मंदिर चौथऱ्यावर (पाया) व स्तंभांवरील कलाकुसरींमुळे वैशिष्ट्यपूर्ण भासते.
एका डोंगर उतारावर असलेल्या सपाट भागात हे मंदिर स्थित आहे. त्यामुळे मंदिराचा परिसर जास्त मोठा नाही. मागच्या बाजूला डोंगर कडा, तर तिन्ही बाजूने तटभिंती आहेत. मंदिरासमोरील बाजूस खोल दरी आहे. तटभिंतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रथम मंदिराच्या शेजारी असणाऱ्या कुंडाचे दर्शन होते. सुमारे ८ ते १० फूट खोल असलेल्या या मोठ्या कुंडाच्या आतमध्ये साधारणतः ५ फूट बाय ५ फूट आकाराचे आणखी एक लहान कुंड आहे. या कुंडात वर्षभर पाणी असते. तो कधीही आटत नाही. या परिसरातील अनेक भाविक या कुंडातील पाणी तीर्थ म्हणून घेऊन जात असतात. या लहान कुंडातील पाणी हा येथील एकमेव पाण्याचा स्रोत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत मात्र मोठे कुंड पूर्ण पाण्याने भरलेले असल्यामुळे त्यात खाली असलेले लहान कुंड दिसत नाही.
कुंडाच्या वरील भागात जमिनीपासून सुमारे ४ फूट उंचीवर असणाऱ्या मोठ्या चौथऱ्यावर हे मंदिर उभे आहे. या चौथऱ्यावरील ५ आडव्या थरांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. त्यामधील पहिल्या ४ थरांवर विविध फुले, नक्षीकाम असून ५ व्या थरावर अनेक मैथुन शिल्पे कोरलेली आहेत. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला पूर्वेकडून व उत्तरेकडून अशी २ प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा सभामंडप मोठा असून त्यात २१ नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर छत असून त्यावर इतर मंदिरांना असते तसे शिखर वा कळस नाही. स्तंभांची खालची बाजू चौकोनी, तर मधल्या भागात विविध शिल्पांकन आहे. स्तंभांच्या वरील बाजूस भारवाहक यक्षप्रतिमा कोरलेल्या आहेत. उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळील स्तंभांच्या खालच्या बाजूला अनेक देवीदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या स्तंभांना बाहेरच्या बाजूने जोडणाऱ्या भिंती नसल्यामुळे हा सभामंडप पूर्ण मोकळा आहे.
सभामंडपाच्या मध्यभागी २ गर्भगृह आहेत. त्यापैकी एकात शेषशाही श्रीविष्णूंची सुमारे ५ फूट लांबीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या वर ब्रह्मदेव व दशावतार कोरलेले आहेत. दुसऱ्या गर्भगृहात शिवपिंडी आहे. या दोन्ही गर्भगृहांची दारे पूर्वेकडे असल्यामुळे सकाळच्या वेळी सूर्यकिरणे थेट गाभाऱ्यात पडतात. मंदिराच्या आवारात अनेक प्राचीन मूर्ती व विविध शिल्पे आहेत. येथील स्तंभांवर व त्यावरील असलेल्या शिल्पांवर रंगकाम केल्यामुळे त्यांचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. दरवर्षी मार्गशीर्ष अमावस्येला येथे सप्ताह असतो. यावेळी शेकडो भाविक उपस्थित असतात. मंदिराच्या आजूबाजूला कमी जागा असल्यामुळे या मंदिराच्या दक्षिणेकडे असलेल्या टेकडीवरील मोकळ्या जागेत सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. हा सर्व परिसर वनविभागाच्या अखत्यारित असल्यामुळे व येथील परिसरात जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे सायंकाळी वा रात्री या मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
या मंदिरापासून जवळच माणिकगड किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ५०७ मीटर उंचीवर असलेला हा किल्ला सुमारे ७५ एकर जागेवर वसलेला आहे. वनविभागाच्या चौकीतून शुल्क आकारून येथे प्रवेश दिला जातो. महाराष्ट्र सरकारतर्फे या किल्ल्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असल्यामुळे येथे पर्यटकांसाठी अनेक सोयी–सुविधा करण्यात आल्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीची पुनर्बांधणी करण्यात आली असून अनेक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग लावण्यात आले आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असून हत्तीवर आरूढ झालेला सिंह हे गोंड सत्तेचे राजचिन्ह, विविध व्याल, नागशिल्प व इतरही अनेक शिल्पांचे अंकन आहे. दरवाजाच्या चौकटीवर गणेशमूर्ती आहे. याशिवाय किल्ल्यात तोफ, बुरुज, बुरुजांवर असलेल्या विविध मूर्ती, तळघर, पाताळ विहीर, राणी महल, राणी तलाव हे पाहता येतात. सोबतच जैवविविधतेने नटलेली विपुल वनसंपदा येथे अनुभवता येते.