कारागृहात जन्माला आलेल्या श्रीकृष्णाऐवजी कंसाच्या हाती लागलेली योगमाया त्याच्या हातातून निसटून आकाशात गेली व कंसाच्या वधाची शापवाणी करून ती अदृश्य झाली. नंतर ती विंध्याचल पर्वतावर प्रकट झाली. भारतातील १२ शक्तिपीठांपैकी विंध्यवासिनीचे मूळ स्थान उत्तर प्रदेशात विंध्याचल येथे आहे. चिपळूण शहरातील रावतळे परिसरातील विंध्यवासिनी मंदिरात असलेली देवी ही तिचाच अंश (अंशपीठ) असल्याची मान्यता आहे. देवीचे हे मंदिर चिपळूण व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की सहाव्या शतकातील चालुक्य घराण्यातील सम्राट पहिला पुलकेशी याच्या कारकिर्दीत चिपळूण येथे एक मोठा यज्ञ सोहळा पार पडला होता. या चालुक्य पुलकेशीची आई शिलाहार घराण्यातील होती. तिने आपल्या माहेरी हा यज्ञ घडवून आणला होता. याच काळात सध्या मंदिरात असलेली श्रीविंध्यवासिनी देवीची मूर्ती तिने दक्षिण भारतातून आणली होती. आदिलशाही काळात चिपळूण आणि कोकण प्रांतावर बाराराव कोळ्यांचे राज्य होते. त्यांच्या येथील निवासामुळे हा भाग रावतळे म्हणून प्रसिद्ध आहे. विंध्यवासिनी ही त्यांची कुलदेवता. या कोळ्यांचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने शेख बहादूरला पाठविले होते. या युद्धात जर आपला पराभव झाला तर शेख बहादूर आपल्या कुलदेवतेचे मंदिर भ्रष्ट करेल या भीतीने बाराराव कोळ्यांनी दगड रचून हे संपूर्ण मंदिर मातीखाली गाडून टाकले. पुढे अनेक वर्षे हे मंदिर मातीखालीच होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात शेत नांगरताना कळस दिसला आणि हे मंदिर उजेडात आले. त्यानंतर इ.स. १७६९ मध्ये यज्ञेश्वर दीक्षित चितळे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, अशी नोंद आहे.
अशी मान्यता आहे की विंध्यवासिनी ही देवी मूलतः विंध्याचल प्रदेशातील भिल्ल, निवाद, किरात व शबर या आदिवासी जमातींची कुलदेवता होती. कालांतराने ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य घराण्यांचीही कुलदेवता झाली. रावतळे येथील विंध्यवासिनी प्रामुख्याने दीक्षित, आवळसकर, चितळे, भाजेकर, मोने, जोशी, रेळे, सांव, ढेबरी, पित्रे व प्रधान या घराण्यांची कुलस्वामिनी आहे. तसेच समस्त चिपळूणकर नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान मुंबई–गोवा महामार्गापासून एक किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत व गर्द हिरवाईत एका उंचवट्यावर वसलेले आहे.
येथील प्रवेशाच्या कमानीजवळ उंच दीपमाळ असून तेथून मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी २० पायऱ्या आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप दुमजली असून उत्सवाच्या वा कार्यक्रमाच्या वेळी वरच्या मजल्यावर भाविकांना (विशेषतः महिला भाविकांसाठी) बसण्याची सोय करण्यात आलेली आहे. सभामंडपातील खांबांवर विशेष कलाकुसर नसली तरी कमानीद्वारे ते एकमेकांशी जोडण्यात आलेले आहेत. गर्भगृहात देवपीठावर मध्यभागी विंध्यवासिनी देवीची मूर्ती आहे. मूर्तीशेजारी गणपती व कार्तिकस्वामी यांच्या रेखीव मूर्ती आहेत.
प्रसन्न मुद्रा असलेली विंध्यवासिनी देवीची मूर्ती शिलाहारकालीन असल्याचे सांगितले जाते. शिलाहारकालीन उत्कृष्ट शिल्पांमध्ये या मूर्तीची गणना होते. तीन फूट उंचीची ही देवी महिषासुराचा वध करताना दिसते आहे. मस्तकावर मुकुट, गळ्यात विविध अलंकार, हातांत कंकणे आणि पायांत पैंजण आहेत. कमरेला वस्त्र व त्यावर लहान लहान घंटा असून मोत्याचे पदर खाली लोंबत आहे. मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात खड्ग आणि डाव्या हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातातील त्रिशूळ तिने राक्षसाच्या पोटात खुपसला आहे. डाव्या हाताने तिने त्याचे डोके पकडलेले आहे. महिषासुर देवीचा त्रिशूळ आपल्याला लागू नये म्हणून तो धरण्याचा प्रयत्न करतो आहे. देवीचे वाहन असणारा सिंह देवीच्या खाली उजव्या हाताशी असणाऱ्या महिषासुराच्यामागून त्यावर हल्ला करतो आहे.
मंदिराशेजारी एक कुंड असून त्यातील पाणी मंदिरातील पूजाविधीसाठी वापरले जाते. इ. स. १६३७ मध्ये पंडित विश्वनाथ पित्रे यांनी लिहिलेल्या व्याडेश्वर माहात्म्य या ग्रंथात येथील भगवान कार्तिकेय व देवी विंध्यवासिनी यांचा उल्लेख आहे. त्यावरून हे देवस्थान १६ व्या शतकाच्या आधीपासूनचे आहे, हे सिद्ध होते. चैत्र शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा वासंतिक उत्सव, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा नवरात्र उत्सव, माघ शुद्ध चतुर्दशी देवीचा जीर्णोद्धार वर्धापनदिन, कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्र आल्यास कार्तिक स्वामी दर्शन व माघ वद्य पंचमीला मंदिरात गणपती उत्सव साजरा केला जातो. भाविकांसाठी भक्त निवासाचीही सुविधा आहे. (संपर्क : सुरेश चितळे : ९४२११८५९४०)