विजयादुर्गा देवस्थान

केरी, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

दैत्यावर विजय मिळवून सुखशांती निर्माण करणाऱ्या दुर्गादेवीचे म्हणजे विजयादुर्गा देवीचे मंदिर केरी येथे स्थित आहे. साडेचारशे वर्षांहून अधिक प्राचीन असलेले हे भव्य मंदिर उत्तर गोव्यातील असंख्य देवीभक्तांप्रमाणेच मंदिर अभ्यासकांचेही आकर्षण केंद्र आहे. याचे कारण या मंदिरातील कावी कलाप्रकारातील नक्षीकाम आणि काष्ठशिल्प काम. प्रशस्त आणि भव्य अशा या प्राचीन मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात भरणारी यात्रा हा पंचक्रोशीतील एक महोत्सव असतो. या यात्रेच्या वेळी येथे होणारे सांगोड (नौका क्रीडा) पाहण्यासाठी हजारो लोक येथे जमतात.

विजयादुर्गा नावाबद्दल पौराणिक आख्यायिका अशी की प्राचीन काळी शंखावली भागात एकदा कालांतक नामक राक्षसाने लोकांना त्राही माम् करून सोडले होते. बाष्कलवंशात जन्मलेला तो नीलवर्णी दैत्य प्रेतवस्त्रधारी व धूम्रलोचन असा होता. त्याने नांगराच्या फाळाने कित्येक ब्राह्मणांची हत्या केली. तेव्हा तेथील ब्राह्मण महादेवास शरण गेले. त्यांच्यावरील आपत्ती जाणून पार्वती माता संतापली. तिने त्या दैत्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. दुर्गेचे रूप धारण करून तिने त्या दैत्याशी युद्ध केले. एक वृक्ष उटपटून तिने त्याच्या छातीवर मारला. त्यासरशी तो गतप्राण होऊन कोसळला. देवीने दैत्यावर मिळवलेल्या विजयाची स्मृती म्हणून लोकांनी तिचा विजया या नावाने गौरव केला. तसेच लोकांमधील भय दूर करण्यासाठी येथेच राहा, असा आग्रह केला. तेव्हापासून देवी शंखावली नगरीत वास करू लागली.

अशा प्रकारे विजयादुर्गा देवीचे आद्यस्थान शंखावली (शंखवाळी वा सांखवाळ) हे आहे. ‘देवभूमी गोमंतक’ या ग्रंथात मंदिर अभ्यासक विनायक नारायण शेणवी धुमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इसवी सनाच्या सोळाव्या शतकाच्या मध्यपूर्वीपर्यंत विजयादुर्गा देवीचे देवस्थान शंखवाळी येथे स्थापित होते. इ.स. १५६०च्या सुमारास त्याचे केरी येथे स्थलांतर झाले. याचा इतिहासही गोमंतकातील अन्य मंदिरांप्रमाणेच पोर्तुगीजांच्या धर्मछळाच्या (इन्क्विझिशन) इतिहासाशी निगडित आहे. इ.स. १५६० साली गोवा बेटांत ‘इन्क्विझिशन’ म्हणजेच धर्म समीक्षण संस्थेची स्थापना झाली आणि धर्मांतर आणि धर्मछळाची क्रूर लाट गोव्यात पसरली. १ मे १५६० रोजी जेसुईट पाद्र्यांचा एक संघ आरमारासह सासष्टीतील कुठ्ठाळ गावी आला. परंतु तत्पूर्वीच लोकांनी गावातील देवालयातील देव लपवून अन्यत्र नेले होते. कुठ्ठाळ गावाच्या शेजारीच शंखवाळी हे गाव असल्याने येथील लोकांनीही गावातील मंदिरांतील देवतांच्या मूर्ती अन्यत्र हलवल्या असाव्यात, असा तर्क लावला जातो. याचा एक संदर्भ ‘कोकणाख्यान’ या इ.स. १७२९ मध्ये रचलेल्या ग्रंथात लागतो. त्यात या देवतांच्या स्थलांतराविषयी असे म्हटले आहे की ‘कुशस्थळी श्रीमंगेश प्रियोळी। वेरणे म्हाळसा म्हाडदोळी। शंखावळी देव दोन्ही स्थळी। केरी आणि वेलिंगासी।। वेलिंगासी नरसिंह सांतेरी। विजयदुर्गा ते केरी माझारी। आणि केळोशीची शांतादुर्गा बरी। राहिली कवळे ते ग्रामी।।’ यावरून १ मे १५६०च्या पूर्वी विजयादुर्गा देवीस केरी येथे आणून प्रतिष्ठापित करण्यात आल्याचे स्पष्ट होते.

देवीच्या येथील स्थापनेविषयीची कथा अशी की केरी गावात हे दैवत स्थापन करण्यापूर्वी फोंडा तालुक्याच्या कवळे गावातील अगस्तीपूर उर्फ आगापूर येथील माधव मंदिराच्या समोरील तलावाच्या पाण्यात देवीची मूर्ती लपवून ठेवली होती. यानंतर एके दिवशी केरी गावातील एका काश्यप गोत्री ब्राह्मणास स्वप्न पडले. स्वप्नात एक तेजःपुंज स्त्री त्याच्यासमोर प्रकट झाली व म्हणाली की ‘मी तुझी कुलस्वामिनी आहे. मला एका भक्ताने आगापूर येथील तलावात ठेवले आहे. उद्या सकाळी उठताच तुझ्या घरासमोरील केळीला पिकलेला घड दिसेल तो आणि पलीकडील केतकीला फुलावयास आलेला गोंडा दिसेल तो घेऊन आगापूरच्या तलावात सोडून मला अर्पण कर. त्यानंतर तलावात बुडी मार. माझी प्रतिमा हाताला लागेल. ती घेऊन या गावी आणून तिची स्थापना कर.’ त्यानुसार केल्यानंतर त्या ब्राह्मणास देवीची मूर्ती सापडली. ती खांद्यावर धारण करून तो केरी गावी आणू लागला. मार्गात एके ठिकाणी अचानक ती मूर्ती जड झाली. तेव्हा त्याने ती तेथेच ठेवली. हा चमत्कार पाहून लोकांनी

भक्तिभावाने देवीस नमन केले व त्याच ठिकाणी देवीचे लहानसे मंदिर बांधले. कालांतराने, पुण्यात पेशवाईत मोठा नावलौकिक मिळविलेल्या लघाटे उपनावाच्या एका देवीभक्त गृहस्थाने या मंदिराचा विस्तार केला. नंतर १८७५ साली केरी येथील देवीचे भक्त व महाजन पांडुरंग रामचंद्र वैद्य यांनी लोकांच्या सहकार्याने देवालयास सभामंडप बांधला. पुढे १८९७मध्ये सावंतवाडीतील माधवराव गोविंद धोपेश्वरकर यांनी मंदिरास नगारखाना आणि गोपुराची इमारत स्वखर्चाने बांधून दिली. पुढील काळातही प्रसंगोपात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

निसर्गरम्य परिसरात, हिरवळ आणि फुलझाडांनी सुशोभित केलेल्या विस्तिर्ण प्रांगणात हे मंदिर वसले आहे. मंदिराच्या प्रांगणात भव्य मनोऱ्यासारखा अष्टकोनी सातमजली दीपस्तंभ आहे. त्याच्या शीर्षभागी सपाट छत व त्याच्या चारही बाजूंनी कठडे लावण्यात आले आहेत. या समोर गोमंतकीय स्थापत्यशैलीत उभारण्यात आलेली मंदिराची भव्य वास्तू उभी आहे. या स्थापत्यशैलीनुसार, नगारखाना, सभामंडप, अर्धमंडप, महामंडप आणि गर्भगृह या प्रमाणे या मंदिराची संरचना आहे. महाद्वारास मोठी कमान असलेल्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा आहे. त्यात डाव्या व उजव्या बाजूस कक्षासने आणि त्यांमध्ये गोलाकार स्तंभ आहेत. येथून काही फूट अंतर सोडून, दोन्ही बाजूंस रुंद अशा गोलाकार स्तंभांची रांग आहे. स्तंभांच्या शीर्षस्थानी असलेल्या तरंगहस्तांना विविध प्राण्यांचे तसेच मानवी आकार देण्यात आले आहेत. सभामंडपावर लाकडी सज्जा असून येथील छतही काष्ठपट्ट्यांनी सुशोभित केलेले आहे. सभामंडपात मध्यभागी होमकुंड आहे. समोरच्या सज्जातील मखरामध्ये विजयादुर्गा देवीची मोठी प्रतिमा लावलेली आहे. येथून चार पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळास मोठ्या कमानीच्या खिडक्या आहेत. त्यांखाली कक्षासने आहेत.

महामंडपाच्या दगडी दर्शनीभिंतीवर दोन्ही बाजूंस काळ्या पाषाणात घडवलेल्या वैष्णव द्वारपालांच्या मोठ्या मूर्ती आहेत. महामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटींवर वेलबुट्टीची नक्षी कोरलेली आहे. महामंडपाच्या डाव्या व उजव्या भिंतींमध्ये मोठ्या कमानीच्या खिडक्या आहेत. त्यांपासून काही अंतरावर दोन्ही बाजूंस, मोठ्या कमानीने एकमेकांस जोडलेली रुंद गोलाकार स्तंभरांग आहे. आत छतावर काचेचे मोठे झुंबर टांगलेले आहे. या महामंडपाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे केलेली कावी कलाप्रकारातील नक्षी. महामंडपात मध्यभागी समई ठेवलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर चंदेरी पत्रा चढवलेला आहे व त्यावर सुबक नक्षीकाम आहे. द्वारचौकटीच्या वरच्या दोन कोपऱ्यांत दोन मोठे मयूर कोरलेले आहेत, तर स्तंभांच्या खालच्या भागात सिंहमूर्ती आहेत. येथे ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आणि त्यावरच्या भागात गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सुशोभित उंच देवळ्यांमध्ये द्वारपालांची मोठी शिल्पे आहेत. गर्भगृहात चांदीच्या मोठ्या मखरामध्ये विजयादुर्गा मातेची मूर्ती विराजमान आहे. वस्त्रालंकारांनी शृंगारलेली ही मूर्ती अष्टभुजा महिषासूरमर्दिनी स्वरूपात आहे. देवीच्या उजवीकडील एका हातात महिषासुराची शेंडी, दुसऱ्या हातात बाण, तिसऱ्या हातात धनुष्य व चौथ्या हातात चक्र आहे. तर डावीकडील पहिल्या हातात महिषासुराची शेंडी, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात धनुष्य आणि चौथ्या हातात शंख आहे. देवीच्या पावलांजवळ महिषासूर पडलेला आहे. देवीच्या दोन्ही बाजूंस देवसेविका आहेत. देवीच्या या पाषाणी मूर्तीस सोन्याचा मुखवटा आहे. मस्तकी मनोहारी मुकूट आहे. असे सांगण्यात येते की येथील मूळ मूर्ती आठव्या-नवव्या शतकातील होती. ती जीर्णावस्थेत पोचल्यामुळे येथे नवीन पाषाणी मूर्ती घडवून, शके १८९९, वैशाख वद्य नवमीस (११ मे १९७७) तिची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. जुनी मूर्ती या मंदिराच्या उजवीकडे विसर्जित करण्यात आली व त्यावर मोठे तुलसी वृंदावन बांधण्यात आले.
मंदिराच्या गर्भगृहावर गोमंतकीय स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य मानले गेलेले मनोऱ्यासारखे व वर घुमट आणि कलश असलेले शिखर आहे. या शिखरावर, मंदिराच्या बाह्य व आतील भिंती आणि स्तंभांवर कावी प्रकारातील नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या प्रांगणात श्रीदंडपाणीचे छोटे मंदिर आहे. या दैवतास विजयादुर्गा देवीचे अंगभूत दैवत मानले जाते. त्यास श्रीक्षेत्रपाळ, श्रीदंडपाणी, श्रीव्याघ्र (वागरा) या तीन नावांनी ओळखले जाते.

मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा, उत्सव केले जातात. याच प्रमाणे येथे अश्विन नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमी, महाशिवरात्र, रामजन्म, विजयादशमी आदी सण व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. येथे दर महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील दशमीस रात्री विजयादुर्गा देवीचा शिबिकोत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यात या देवीचे स्थलांतर झाले असावे, असे मानले जाते. त्यामुळे मंदिरात या महिन्यात मल्हारी नवरात्र साजरी केली जाते. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमा या कालावधीत हा जत्रोत्सव चालतो. या उत्सवास वळवईच्या गजान्तलक्ष्मी देवस्थानाशी संबंधित भाविकांना खास आमंत्रण असते. यात्रेत ‘सांगोड’ (नौका) फिरवण्याचा मान त्यांचाच असतो. सांगोडाचा उत्सव हे या यात्रेतील एक मोठे आकर्षण आहे. यात्रेत देवीची हत्तीच्या अंबारीतून काढण्यात येणारी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांची येथे गर्दी होते. देवस्थानात प्रसाद-कौल घेण्याची वहिवाट आहे.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ९ किमी अंतरावर
  • फोंडा येथून येण्यासाठी राज्य परिवहन बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्य वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९१७२०७७८९९
Back To Home