हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंची समाधी असलेले पाचाड गाव आणि चवदार तळ्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेले महाड शहर सावित्री नदीच्या तीरावर वसलेले आहे. प्राचीन काळी बाणकोट खाडीतील एक प्रमुख व्यापारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचे वीरेश्वर महाराज हे आराध्य दैवत आहे. महाड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर पंचक्रोशीचे ग्रामदैवत असण्यासोबतच जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
महाडचे प्राचीनत्व येथील पहिल्या ते तिसऱ्या शतकातील गांधारपाले लेण्यांमुळे सिद्ध होते. कुंभोजवंशीय बौद्ध राजा विष्णू पुलित याच्या काळात या लेण्यांच्या खोदकामास प्रारंभ झाला. ऐतिहासिक नोंदींनुसार, इसवी सन पूर्व २२५ मध्येही महाडचा उल्लेख एक महत्त्वाचे व्यापारी बंदर म्हणून आढळतो. या शहराचे जुने नाव ‘महिकावती’ होते. पाली भाषेतील ‘महा हाट’ म्हणजे मोठी बाजारपेठ या शब्दावरून ‘महाड’ हे नाव रूढ झाले असावे. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळातही येथील व्यापाराला मोठे महत्त्व होते. पोर्तुगीजांनी या शहराचा उल्लेख ‘गव्हाची बाजारपेठ’ असा केला आहे.
कारण पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून गहू, कापड आणि दागदागिने महाबळेश्वर मार्गे येथे येत आणि समुद्रमार्गे इतरत्र पाठवले जात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड किल्ल्यापाठोपाठ येथे मराठ्यांचे राज्य आले. महाराजांची प्रशासकीय कामे महाडमधूनच चालत असत आणि काही इतिहासकारांच्या मते राजधानी म्हणूनही या शहराचा विचार झाला होता. शा. वि. आवळसकर यांच्या ‘रायगडची जीवनगाथा’ या ग्रंथानुसार, इसवी सन १६६८ ते १६६९ या काळात महाराज अनेकदा येथे वास्तव्यास होते आणि त्यांनी येथे एक वाडाही बांधला होता. वीरेश्वर महादेवाचे हे स्थान शिवपूर्वकाळापासून असून महाराज स्वतः येथे दर्शनासाठी आणि कीर्तन ऐकण्यासाठी येत असत. या ऐतिहासिक संदर्भामुळे आजही कीर्तन उत्सवाच्या वेळी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक विशेष गादी आणि लोड ठेवला जातो. शिवरायांनीच राजापूरजवळील धोपेश्वर येथील गुरवांची नियुक्ती या मंदिराचे पुजारी म्हणून केली होती. अर्धे पुजारी वीरेश्वराचे, तर अर्धे पुजारी जाखमाता मंदिराचे असतील आणि महाशिवरात्रीच्या रात्री ते आपल्या कामांची आदलाबदल करतील, असा नियम त्यांनी घालून दिला होता, तो आजही पाळला जातो.
या मंदिरातील घंटेखाली उभे राहून कोणी खोटे बोलले, तर देव त्याला शिक्षा करतो, अशी लोकांची धारणा होती. याच मंदिरात ‘तैलदिव्य’ करून सत्याची परीक्षा घेतल्याची एक कथा प्रसिद्ध आहे. रायगडावरील ३२ मण सोन्याच्या सिंहासनाच्या कामात अफरातफर झाल्याची शंका आल्यावर रामजी प्रभू चित्रे यांनी वीरेश्वरासमोर तापलेल्या तेलाच्या कढईतून सोन्याचा होन बाहेर काढून स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध केले होते. वीरेश्वर मंदिरात शंकराचे स्वयंभू स्थान आहे. सद्यस्थितीत उभे असलेले हे मोठे मंदिर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या काळात त्यांचे सुभेदार आणि छत्रपती शाहू महाराजांचे सरदार यशवंतराव पोतनीस यांनी बांधले आहे. यशवंतराव पोतनीस हे स्वराज्याचे शिलेदार मुरारबाजी देशपांडे यांच्या भावाचे चिरंजीव होते. मंदिराचे बांधकाम साधारण १७६८ च्या सुमारास झाले असावे, असा अंदाज आहे. हे मंदिर सुमारे साडेतीन फूट उंचीच्या जोत्यावर उभारण्यात आले आहे. मंदिरासाठी लागणारे दगड समोरील दगडखाणीतून काढण्यात आले आणि पुढे त्याच खाणीचे रूपांतर एका मोठ्या तलावात झाले.
तलावाच्या काठावर असलेल्या या मंदिराची दगडी बांधणी अत्यंत लक्षवेधी आहे. मंदिराची रचना नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी विभागलेली आहे.
नंदीमंडपात एकाच पाषाणातून कोरलेला मोठा नंदी असून त्याच्या सुंदर रंगकामामुळे तो सजीव वाटतो. नंदीमंडप आणि गर्भगृह यांच्या दरम्यान दोन मजली सभामंडप आहे. यातील दगडी खांबांवर सुंदर कलाकुसर रंगकामामुळे अधिक स्पष्ट दिसते. सभामंडपाच्या बाहेरील भिंतींवरही विविध शिल्पे कोरलेली आहेत.
त्यापैकी एका शिल्पावर हत्तीवरून जाणारी मिरवणूक दिसते. त्यातील हत्तीवर बसलेली मुख्य व्यक्ती मंदिर बांधणारे सरदार यशवंतराव पोतनीस असावेत, असे मानले जाते. सभामंडपातून मुख्य मंदिरात येण्यासाठी चार पायऱ्या आहेत.
तेथील दर्शनी भिंतीवर विविध देवतांची शिल्पे आणि दोन देवकोष्टकांवर हत्तींची शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल आणि गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहात मध्यभागी पाषाणाची शिवपिंड आहे. उत्सवाच्या वेळी त्यावर वीरेश्वराचा चांदीचा मुखवटा ठेवला जातो. या मुखवट्यावर पगडी, चंद्र आणि शेषनाग असून वीरेश्वराच्या मुखावर मोठे नेत्र आणि मिशा दाखवल्या आहेत. गर्भगृहावर या काळातील वास्तुकलेचे वैशिष्ट्य दर्शवणारे उंच शिखर आहे.
या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. महाशिवरात्री हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वीरेश्वर स्वतः नैवेद्य ग्रहण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या परिसरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिवरात्रीनंतर होणारा छबीना महोत्सव होय.
फाल्गुन शुद्ध द्वितीया किंवा तृतीयेला हा महोत्सव सुरू होतो. यावेळी आजूबाजूच्या गावांतून झोलाईदेवी, बहिरीनाथ, रवळनाथ, जाखमाता आणि कोटेश्वरी माता अशा विविध देवतांच्या पालख्या वीरेश्वराला भेटण्यासाठी येतात. या महोत्सवाची सांगता ललिताच्या कीर्तनाने होते. दररोज सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.