खंडोबा मंदिर

तिलोरे, ता. माणगाव, जि. रायगड

खंडोबा हे महाराष्ट्रातील अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचे कुलदैवत आहे. प्रत्येक मराठी घराच्या देव्हाऱ्यात खंडोबाची पूजा केली जाते. या दैवताचा संबंध केवळ महाराष्ट्राशी नसून आंध्र प्रदेशातील मैलापूरशीही आहे. तेथून हे दैवत नळदुर्ग, पाली आणि जेजुरी मार्गे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांत पोहचले. या प्रसारामध्ये जैन, लिंगायत आणि व्यापारी वर्गाचे मोठे योगदान राहिले आहे. याच परंपरेतील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील तिलोरे येथील खंडोबा मंदिर अत्यंत पुरातन आणि प्रसिद्ध आहे. डोंगरमाथ्यावर वसलेले हे मंदिर श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथील खंडोबा ‘प्रति जेजुरी’ म्हणून ओळखला जातो.

या मंदिराचे स्थान सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. हे प्राचीन मंदिर मूळचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील पाषाण बांधणीचे होते. त्याच्या खुणा आजही आसपास पडलेल्या कोरीव आणि नक्षीदार पाषाणांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून आता हे मंदिर सिमेंट काँक्रीटमध्ये बांधलेले आहे. जेजुरीचा खंडोबा भक्तांच्या विनंतीवरून येथे येऊन स्थायिक झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. याच कारणामुळे या गावाला ‘प्रति जेजुरी’ असे संबोधले जाते. ब्रिटीश सरकारने २५ जानेवारी १८६४ रोजी या मंदिराला दिवाबत्तीसाठी सनद दिली होती, जी आजही कायम आहे. पूर्वी या मंदिराजवळ तेली समाजाची वस्ती आणि तेली घाणे होते, म्हणूनच या गावाला ‘तिलोरे’ हे नाव पडले.

हे मंदिर माणगावजवळील तिलोरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर एका उंच टेकडीवर वसलेले आहे. मंदिरासमोर वाहनतळाची सोय आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराला समोर, डाव्या आणि उजव्या बाजूला मिळून तीन मुखमंडप आणि तीन दरवाजे आहेत. समोरील मुखमंडपाच्या बाहेर तुळशी वृंदावन, पाषाणी समई आणि नंदीची एक खंडित मूर्ती आहे. या मुखमंडपाला चार पायऱ्या असून त्याचे छत दोन गोलाकार स्तंभांवर तोललेले आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या शाखांवर नक्षीकाम आहे व दरवाजाला नक्षीदार लाकडी झडपा आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार लागते. याच्या लाकडी चौकटी आणि झडपांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी खंडोबाचा स्वयंभू तांदळा आहे. त्यावर जलधारा धरण्यासाठी तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले असते. तांदळ्याच्या भोवती चौथरा असून त्यावर एक पाषाणी समई आणि पितळी कासव आहे. चौथऱ्याला लागून असलेल्या मागील भिंतीवर वज्रपीठावर खंडोबाचे सिंहासन आहे. या सिंहासनावर खंडोबा, म्हाळसा, बाणाई आणि प्रधान यांच्या पितळी मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. वज्रपीठावर सिंहासनाच्या बाजूला तांब्याची शिवपिंड आहे. त्यावर छत्र धरलेला तांब्याचा नाग आहे. गर्भगृहातील भिंतीपाशी खंडोबाची एक प्राचीन पाषाण मूर्तीही पाहायला मिळते.

मंदिराच्या तिन्ही मुखमंडपांवर उतरती कौलारू छपरे आहेत. सभामंडपावर वर आणि खाली अशा दोन स्तरांमध्ये विभागलेले कौलारू छत आहे. गर्भगृहाच्या छतावर मध्यभागी दोन स्तरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराचा खालचा भाग सरळ भिंतींचा असून त्यावर कमानींची नक्षी आहे. वरच्या निमुळत्या होत गेलेल्या भागात प्रत्येक बाजूला तीन छोटी अंगशिखरे आणि त्यावर अर्धामलक आहेत. शिखराच्या चारही कोपऱ्यांवर लघु शिखरे आणि चारही बाजूंना कुंभथर आहेत. शिखराच्या माथ्यावर एकावर एक असे दोन आमलक, कळस आणि ध्वजपताका आहेत. मंदिराच्या मागील बाजूस पेव्हर ब्लॉक बसवलेले प्रांगण आहे.

प्रांगणात मागील बाजूस महिषासुर मर्दिनी आणि भवानी मातेचे कौलारू मंदिर आहे. या मंदिरासमोर लोखंडी खांबांवर पत्र्याचे छत असलेला एक खुला सभामंडप आहे. येथील गर्भगृह दगडी बांधकामाचे आहे. वज्रपीठावर अष्टभुजा भवानी देवीची प्राचीन मूर्ती व शेजारी नंदी आहे. प्रांगणातच एक शिवमंदिर आहे. या मंदिरात जमिनीवर शिवपिंड आहे व त्याभोवती नैसर्गिक वारूळ आहे. पिंडीवर पितळी नाग आणि तांब्याचे अभिषेक पात्र आहे. मंदिराच्या बाजूला बगाड मंडप व त्यावर वर्तुळाकार फिरणारी बगाड काठी आहे. ही काठी नगरोळ गावातून आणली जाते. भाविक येथे बगाड घेण्याचा नवस बोलतात आणि यात्रा काळात तो पूर्ण केला जातो. प्रांगणात काही जुन्या पाषाण मूर्ती आणि नंदी शिल्पे आहेत. टेकडीच्या उतारावर पूर्वेला पाण्याचा एक हौद आहे. असे सांगितले जाते की त्यातील पाणीसाठा कधीही संपत नाही

येथील मुख्य वार्षिक उत्सव चैत्र पौर्णिमा आणि मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला साजरे केले जातात. या उत्सवाचे पहिले निमंत्रण माणगावमधील तेली समाजाच्या जाधव कुटुंबाला दिले जाते. उत्सवकाळात परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येथे येतात. नवसाचे बगाड घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागतात. याशिवाय मंदिरात चैत्र पाडवा, नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सणही उत्साहात साजरे होतात. या काळात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण-गोंधळ आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रविवार, पौर्णिमा आणि अमावस्येला मंदिरात भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • माणगाव येथून ५ किमी अंतरावर
  • अलिबाग येथून ७७ किमी अंतरावर
  • माणगाव येथून तिलोरे गावापर्यंत एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • गावापासून दीड किमी अंतर पायी वा खासगी वाहनाने जावे लागते
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक सुविधा

खंडोबा मंदिर

तिलोर, मानगांव, जिला। रायगढ़

Back To Home