ब्राह्मणदेव मंदिर आणि भोलानाथ मंदिर

आवरे, ता. उरण, जि. रायगड

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे गाव आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. या गावाला अकराव्या शतकातील शिलाहार राजा महाकुमार केशीदेव यांच्या काळापासूनचा प्राचीन इतिहास लाभला आहे. गावात शिवभक्तीची प्रदीर्घ परंपरा असून येथे दोन महत्त्वाची शिवस्थाने आहेत. यांपैकी एक गावाच्या वेशीवरील प्राचीन ब्राह्मणदेव मंदिर आणि दुसरे गावातील मध्यवर्ती भागात असलेले ऐतिहासिक भोलानाथ मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांचा उल्लेख ऐतिहासिक नोंदींमध्ये आणि शिलाहारकालीन ताम्रपटांमध्ये आढळतो. येथील धार्मिक उत्सवांना संपूर्ण पंचक्रोशीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

उरणमार्गे पेणला जाणाऱ्या रस्त्यावर पिरकोन गावाजवळ आवरे गाव वसले आहे. अकराव्या शतकात शिलाहार राजा महाकुमार केशीदेव यांनी आवरे आणि पिरकोन ही दोन गावे ब्राह्मणांना दान केली होती, असे ऐतिहासिक दाखले मिळतात. या दोन गावांच्या वेशीवर असलेल्या मंदिराला ‘ब्राह्मणदेव’ हे नाव रूढ झाले. हे रायगड जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान मानले जाते. ब्राह्मणदेवाचे मंदिर आवरे गावाच्या वेशीवर खाडीकिनारी असून येथे पोहचण्यासाठी सुमारे दीड तासाचा पायी प्रवास करावा लागतो.हे शिवस्थान तिवरांच्या आणि खाजणाच्या दाट जंगलाच्या मध्यभागी वसले आहे. मंदिरात येण्यासाठी आवरे-वशिणी-दादर-कडापे असा दुसरा मार्गही उपलब्ध आहे. या मार्गाने वाहनाने कडापे गावापर्यंत येता येते. तेथून पुढे पायी चालत आल्यावर वीस ते पंचवीस मिनिटांत मंदिरात पोहोचता येते. या पायवाटेच्या एका बाजूला शेकडो एकर भातशेती आणि दुसऱ्या बाजूला तिवरांचे रान आहे.

ब्राह्मणदेवाचे मंदिर लहान स्वरूपाचे आहे. येथील मूळ देवता मंदिराच्या बाहेर कोणत्याही निवाऱ्याशिवाय उघड्यावर विराजमान आहे. एक मोठी पाषाण शिळा म्हणजे ब्राह्मणदेव, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. ही शिळा दरवर्षी आकाराने किंचित वाढते, अशी गावकऱ्यांची समजूत आहे. या शिळेवर छत बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तो यशस्वी न झाल्याने गावकऱ्यांनी बाजूलाच शंकराचे मंदिर बांधले. भाविकांना बसण्यासाठी या मंदिरासमोर सभामंडप बांधण्यात आला आहे. या मंदिराचा १९११ मध्ये जीर्णोद्धार झाल्याची नोंद आढळते. ब्राह्मणदेवाची ख्याती रायगडसह मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही पसरली आहे. महाशिवरात्रीला येथे तीन दिवसांची मोठी जत्रा असते आणि श्रावण महिन्यातही भाविकांची मोठी गर्दी असते. या काळात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद दिला जातो. अपत्यप्राप्तीसाठी अनेक दाम्पत्ये येथे नवस करतात आणि इच्छापूर्ती झाल्यानंतर महाशिवरात्रीला येऊन नवस फेडतात. नवसपूर्तीसाठी लहान मुलांचा साखर, फळे, फुले, गूळ आणि मिठाईने तुलाभार करून ती सामग्री देवाला अर्पण केली जाते. अनेक भाविक येथील घंटाघरावर पितळी घंटा अर्पण करतात. मंदिरासमोरील छोट्या टेकडीवर मारुतीचे मंदिर असून भाविक या मारुतीचेही दर्शन घेतात. पावसाळ्यात चिखलामुळे येथील वाट अवघड होते, मात्र इतर वेळी हे मंदिर भाविकांसाठी दिवसभर खुले असते.

आवरे गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले भोलानाथ शिवमंदिरही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथील शिलाहार काळातील शिलालेखावरून या स्थानाची प्राचीनता स्पष्ट होते. ठाणे येथे सापडलेल्या शिलाहार राजा महाकुमार केशीदेव यांच्या ताम्रपटातही या मंदिराचा उल्लेख आल्याचे सांगितले जाते. आंबा, भोगावती, पाताळगंगा, बाळगंगा आणि निगडे या पाच नद्या ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळतात, तेथे आवरे गाव वसले आहे. भोलानाथ मंदिरामुळे आवरे गावाची ओळख शिवभक्तांचे गाव, अशी निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यावरील मोठ्या तलावाच्या समोर हे मंदिर आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीतून आत आल्यावर भव्य कौलारू मंदिर दिसते. मंदिरासमोर प्रशस्त मंडप असून प्रवेशद्वाराजवळ पांढराशुभ्र नंदी आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या बांधकामात लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. गर्भगृहासमोरील खांबाला अनेक पितळी घंटा बांधलेल्या आहेत. येथील गर्भगृहात शिवपिंडी स्थापित केलेली आहे. या पिंडीवर पंचमुखी नागाने फणा धरला आहे. पिंडीच्या बाजूला हनुमंत आणि श्रीदत्त यांच्या मूर्ती आहेत.

या मंदिराचा १९१७ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला होता. असे सांगितले जाते की त्यावेळी शिवपिंडी मध्यभागी घेण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पंधरा-सोळा फूट खोदकाम केल्यानंतर पिंडीच्या बाजूने गुलालाचे लोट वाहू लागल्याने ते काम थांबवावे लागले.

मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे सागवानी लाकूड गावाजवळील खाडीच्या पाण्यातून वाहून आले होते आणि तीच लाकडे आजही मंदिरात पाहायला मिळतात. भोलानाथ मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. येथील पालखी उरण तालुक्यातील सर्वांत जुनी पालखी मानली जाते.

मागील २५ वर्षांपासून येथे दर सोमवारी महाआरती केली जाते. श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त येथे दर्शनासाठी येतात. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • उरणपासून १९ किमी अंतरावार
  • पनवेलपासून ३० किमी अंतरावर
  • उरवण व पनवेल येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने भोलानाथ मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

ब्रह्मदेव मंदिर और भोलानाथ मंदिर

जागरूक, ताल. उरण, जिला. रायगढ़

Back To Home