
अपरांत म्हणजेच कोकणभूमीवरील नितांत सुंदर गाव म्हणून गुहागरची ओळख आहे. येथील असगोली गावातील वालुकेश्वराचे मंदिर जिल्ह्यातील प्राचीन व प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते. मंदिर व येथील परिसर अनेक भाविकांसोबतच पर्यटकांचेही आकर्षण आहे. पद्मपुराणातील सह्याद्री खंडामध्ये ‘उत्तरे जंबुकादेवी दक्षिणे वालुकेश्वर’ असा या मंदिराबाबतचा उल्लेख आहे. त्यावरून हे स्थान खूपच प्राचीन व पुराण रचल्याच्या आधीपासून येथे अस्तित्वात आहे, याला दुजोरा मिळतो.
मंदिराची अख्यायिका अशी की गुहागरमधील व्याडेश्वराच्या लिंगावर गुराख्याने कुऱ्हाडीने घाव घातल्यावर लिंगाचे दोन कपचे उडाले, त्यांतील एक असगोली येथे पडला व त्यावर वालुकेश्वर मंदिर बांधण्यात आले, तर दुसरा अंजनवेल येथील डोंगरावर पडला, त्यावर टाळकेश्वराचे मंदिर बांधण्यात आले. त्यामुळे हे स्थान व्याडेश्वराचाच अंश असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
‘गुहागर माहात्म्य’ या पोथीतील उल्लेखानुसार स्वतः देवी सीतेने येथे पूजेसाठी वाळूपासून शिवलिंग बनविले होते, त्यामुळे या देवस्थानाला वाळुकेश्वर नाव पडले. प्राचीन काळात गुहागरची हद्द वाळुकेश्वर मंदिरापर्यंत होती, असाही उल्लेख पद्मपुराणात आढळतो. हे स्थान प्राचीन असले तरी येथील सध्याचे मंदिर पेशवेकालीन आहे.
खालचा पाट, वरचा पाट आणि देव पाट अशा तीन भागांत गुहागर विभागलेले आहे. नारळी–पोफळीच्या बागा, सुरुची वने, लांबच लांब समुद्रकिनारा आणि किनाऱ्याच्या समांतर जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वसलेली सुंदर व कोकणी पद्धतीची टुमदार घरे हे येथील वैशिष्ट्य. आजही येथील अनेक घरांसमोरील आंगण सारवलेले दिसते. याच मार्गावरून खालच्या पाटातील रस्त्याने असगोली गावातील वाळुकेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. अथांग समुद्र, परिसरात सर्वत्र नारळाची झाडे, या झाडांमध्ये किनाऱ्यावरील पुळणीपासून जेमतेम २०० फूट अंतरावर वाळुकेश्वर मंदिर आहे. मंदिराभोवती तटभिंत असून त्यात असलेल्या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या वरील बाजूस एक लहानसा सुंदर कळस
बसविलेला आहे. प्रवेशद्वारातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी फरसबंदीचा रस्ता असून रस्त्याच्या दुतर्फा सुंदर उद्यान विकसित करण्यात आलेले आहे.
मंदिरासमोर दीपमाळ असून त्याशेजारी तुलशी वृंदावन आहे. दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडप व सभामंडप खुल्या स्वरूपाचे आहेत. येथील सर्व खांब वरील बाजूने कमानीयुक्त कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी संगमरवरी चौथऱ्यावर अखंड दगडातील नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाच्या भिंतींमध्ये १४ खांब असून प्रत्येक खांबांच्या वरील बाजूला गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारच्या उजव्या बाजूच्या कोनाड्यात गणपतीचे व डाव्या बाजूला श्रीरामाचे स्थान आहे. येथील गणपतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की मूर्तीच्या एका हातात जपमाळ आहे. अंतराळापासून मंदिराचे गर्भगृह सुमारे साडेतीन फूट खाली आहे. येथे शाळिग्राम शिळेतील सुंदर शिवपिंडी आहे. या पिंडीच्या समोरील बाजूला पार्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहावर अष्टकोनी शिखर असून त्यावर कळस आहे.
मंदिराच्या मागे समुद्रकिनाऱ्याला लागून दगडी बांधकाम केलेला गोड्या पाण्याचा मोठा तलाव आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे समुद्राच्या भरती रेषेला लागून असूनही यातील पाणी मात्र गोडेच आहे. या तलावाचे अरुणा आणि वरुणा असे दोन भाग आहेत. एका बाजूने माणसांना वापरण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूने जनावरांना पाणी पिता येऊ शकेल, अशी तलावाची रचना आहे. १७५३ मध्ये वैजनाथ भट शारंगपाणी (खरे) नावाच्या व्यक्तीने हा तलाव बांधला. त्यांनीच मंदिराजवळची विहीर आणि धर्मशाळा उभारली, अशी नोंद आहे. मंदिराच्या तटबंदीतून तलावात व समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी मार्ग आहे.
मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावेळी आदल्या दिवशीपासून भाविकांची दर्शनासाठी रांग लागते. श्रावणी सोमवार व त्रिपुरी पौर्णिमेलाही भाविकांची गर्दी असते.