वैजनाथ मंदिर

वैजनाथ, ता. कर्जत, जि. रायगड

कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि पेज नदीच्या काठी वसलेले वैजनाथ येथील महादेव मंदिर हे ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात हे सुंदर मंदिर आहे. या मंदिरावरूनच गावाला वैजनाथ हे नाव पडले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथील शिवपिंड ही नदीच्या पाण्याबरोबर वाहत येथे आली होती. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे भरणारी जत्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा असते.

‘शिवपुराणा’तील कोटीरुद्र संहितेच्या २८व्या अध्यायात महादेवांच्या वैजनाथ या नावाबद्दलची माहिती आहे. त्यानुसार, लंकाधिपती रावणाने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, मात्र महादेव प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा रावणाने एका खड्ड्यात अग्नी प्रज्वलित करून तेथे महादेवांची प्रतिमा स्थापन केली आणि पुन्हा तपस्येस प्रारंभ केला. तरीही यश न मिळाल्याने त्याने स्वतःचे एकेक शिर कापून महादेवांस अर्पण करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे नून नऊ शिरे अग्निकुंडात अर्पण केल्यानंतर, जेव्हा तो दहावे शिर कापण्यास सज्ज झाला, तेव्हा महादेव तेथे प्रकट झाले. रावणाने त्यांना आपल्यासोबत लंकेत येण्याची विनंती केली. तेव्हा महादेवांनी रावणाला अतिबलिष्ठ बनवून त्याच्या हाती शिवलिंग सोपविले. हे शिवलिंग प्रवासात कुठेही जमिनीवर ठेवू नये, अशी अट महादेवांनी घातली होती. लंकेकडे जात असताना रावणाने ते शिवलिंग एका गोपालकाच्या हाती दिले. त्या बालकाने काही वेळ वाट पाहून ते शिवलिंग जमिनीवर ठेवले आणि ते तेथेच स्थिर झाले. हेच स्थान पुढे ‘वैजनाथ’ या नावाने प्रसिद्ध झाले. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या ‘भक्तीकोशा’त या नावाचा अधिक खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार, शिवलिंग जमिनीवर ठेवणारा तो गोपालक म्हणजे प्रत्यक्षात शिवपुत्र गणेश होता आणि त्याने ‘वैजू’ हे नाव धारण केले होते. या वैजू नावावरूनच महादेवास ‘वैजनाथ’ असे नाव प्राप्त झाले.

पेज नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराभोवती संरक्षक भिंत आहे. या भिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या आटोपशीर फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात मध्यभागी नंदीमंडप आहे. नंदीमंडपात शुभ्र संगमरवरी नंदीची सुंदर मूर्ती आहे. नंदीमंडपावर वरच्या बाजूला चौकोनी निमुळते होत जाणारे शिखर व त्यावर कळस आहे. नंदीमंडपाच्या शेजारी मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस सुंदर दीपमाळ आहे. उत्सवकाळात या दीपमाळेवर खोबऱ्याच्या वाटीत दिवे लावले जातात. अर्धखुल्या स्वरूपाचा मंडप, त्यापुढे बंदिस्त सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. नंदीमंडपापासून काही पायऱ्या उतरून मंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर गणपतीची मूर्ती व बाजूला दोन चामरधारिणी आहेत. सभामंडपात पुढच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील अखंड मूर्ती व त्यासमोर कासवशिल्प आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवर दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणपती व बासरी वाजविणारा श्रीकृष्ण यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखा व दरवाजे नक्षीदार धातूच्या पत्र्याने मढविलेले आहेत. गर्भगृहात मध्यभागी एका खोलगट जागेत वैजनाथ महादेवाची स्वयंभू पिंड आहे. या पिंडीला धातूच्या पत्र्याचे आच्छादन केलेले आहे. पिंडीच्या मागील भिंतीमधील देवकोष्टकांत शंकर व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय मंदिरात श्रीराम-लक्ष्मण-सीता, राधा-कृष्ण व देवीच्या मूर्ती आहेत.

जुन्या मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचे जुने, लाकडी, सुंदर नक्षीकाम केलेले खांब दीपमाळेजवळ असलेल्या हनुमंताच्या मंदिरात जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यावरील नक्षीकाम अतिशय उत्कृष्ट आहे. शेकडो वर्षांनंतरही हे खांब सुस्थितीत पाहायला मिळतात. मंदिर परिसरातून वाहत जाणाऱ्या पेज नदीवर बंधारा घालून येथे पाणी अडविण्यात आले आहे. मंदिराच्या मागे नदीच्या पात्रापर्यंत उतरण्यासाठी २४ दगडी पायऱ्यांचा घाट आहे. घाटालगत जुन्या बांधणीची चौकोनी दगडी विहीर आहे. नदीच्या पलीकडे, नदीला समांतर पाण्याचा कालवा आहे. पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात हा परिसर खूपच रमणीय असतो.

असे सांगितले जाते की साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी वैजनाथ येथे श्री वामन महाराज वास्तव्यास होते. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. नंतर ते वैजनाथ मंदिर परिसरात राहू लागले. भक्तांनी त्यांना मंदिराच्या सान्निध्यातच मठ बांधून दिला. त्यानंतर हळूहळू तालुक्यात त्यांचे शिष्यगण वाढू लागले. १८९२ साली त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांची येथेच समाधी बांधण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होतात. माघ शुक्ल त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत तीन दिवस सद्‌गुरू वामन महाराज पुण्यतिथीचा हा उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्रिपुरारी व कोजागिरी पौर्णिमेला येथे उत्सव असतो. महाशिवरात्रीला येथे भरणारी यात्रा तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाते. भाविकांसाठी मंदिर सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत खुले असते. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी येथे भक्तनिवासाची सुविधा आहे.

उपयुक्त माहिती

  • कर्जत येथून १७ किमी अंतरावर
  • अलिबाग येथून ८७ किमी अंतरावर
  • कर्जत येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे

वैजनाथ मंदिर

वैजनाथ, टी. कर्जत, जिला. रायगढ़

Back To Home