वडेश्वर महादेव मंदिर

अंभई, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर

सिल्लोड तालुक्यातील जंजाळा किल्ल्यानजीकच्या अंभई वडगाव येथील वडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर प्राचीन स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना समजला जातो. हे मंदिर नक्षत्राकृती असून तीन गर्भगृह असलेले त्रिदल रचनेचे आहे. शिल्परचनेवरून १२ व्या शतकात, चालुक्य काळात या मंदिराचे बांधकाम झाले असावे, असे सांगितले जाते. कालौघात काहीशी पडझड झाली असली तरी प्राचीन अद्वितीय स्थापत्यकला शिल्पकलेचे वैभव मिरवत, आजही हे मंदिर येथे डौलात उभे आहे. या मंदिराच्या तीनही गर्भगृहांमध्ये शिवलिंगे आहेत, हे येथील वैशिष्ट्य समजले जाते.

मराठवाड्यातील अजिंठा डोंगररांगांच्या परिसरात कातळात कोरलेली लेणी तसेच स्थापत्यशैलीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली दोन अतिशय प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी एक अन्वा येथील पुरातन शिवमंदिर, तर दुसरे अंभई येथील हे वडेश्वर महादेवाचे मंदिर होय. अंभई येथे येण्यासाठी सिल्लोडहून गोळेगावउंडणगावमार्गे यावे लागते. अजंठा डोंगररांगांपासून जवळ आणि निसर्गसमृद्ध परिसरात चालुक्य शैलीचे हे वडेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराचे प्रांगण प्रशस्त असून मंदिरासमोर पायऱ्यांची एक प्राचीन बारव आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम करण्यात आले आहे. पूर्वीच्या सभामंडपाच्या जागी आता नवा सभामंडप बांधण्यात आला आहे. येथील आधीच्या मुखपंडपातील तसेच सभामंडपातील मूर्ती कोरीव दगड मंदिर परिसरात ठेवण्यात आले आहेत.

मुख्य गर्भगृहासमोरील मंडपात मोठा नंदी असून त्याच्या शरीरावर सुंदर अलंकार आहेत. या पूर्वाभिमुख मंदिराला पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेला अशी तीन गर्भगृहे आहेत. सर्व गर्भगृहे वेगवेगळ्या अंतराळांच्या माध्यमातून एकाच सभामंडपाशी जोडलेले आहेत. तिन्ही गर्भगृहांच्या अंतराळांमध्ये देवकोष्ठे आहेत. त्यात ब्राह्मी, सरस्वती, वैष्णवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच गर्भगृहांवरील प्रवेशद्वारांवरही कोरीवकाम आहे. मुख्य गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे. तेथे चार द्वारशाखा कोरलेल्या दिसतात. वादक, व्याल, स्तंभ कलश या प्रतीकांचे द्वारशाखांवर अंकन केलेले आहे. गर्भगृहाच्या द्वारावर चार शाखा असतील तर त्यास गांधारी किंवा मध्यद्वार असे म्हटले जाते. गर्भगृहाच्या मुख्य द्वाराजवळ वरच्या भागात शंख चिपळ्या वाजवणाऱ्या, नृत्य करणाऱ्या स्त्रीपुरुषांचे शिल्प तसेच नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहात जाताना चारपाच पायऱ्या उतराव्या लागतात. या चौरसाकृती गर्भगृहाच्या आत मध्यभागी शिवलिंग आहे. डावीकडील उजवीकडील गर्भगृहात ही शिवलिंगे असून प्रत्येक गर्भगृहाच्या टोकाला कीर्तिमुखे आहेत. तिन्ही गर्भगृहांच्या तोरणभिंतीवर अष्टमातृकांची शिल्पपट्टी आहे. या अष्टमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ, वराह, मनुष्य यावर बसलेल्या आहेत. वेरूळच्या लेण्यांमध्येही अशा मातृकांची शिल्पे पाहायला मिळतात.

मुख्य गर्भगृहापेक्षा दक्षिणेकडील गर्भगृहात अधिक शिल्पे आहेत. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर त्रिशाखा आहेत. येथील ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. वरील बाजूस मध्यभागी विष्णू आणि टोकावर शिव आणि ब्रह्मा आहेत. याशिवाय नवग्रहांच्या उभ्या आकृत्या आहेत. उत्तरेकडील गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरही त्रिशाखा आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती असून वरच्या द्वारमाथ्यावर मातृका आहेत.

मंदिराच्या शिखराला नव्याने सिमेंटचा गिलावा करण्यात आला आहे. एका उंच दगडी अधिष्ठानावर (जोता) हे मंदिर उभारण्यात आले आहे. अधिष्ठानाला उपन, अंतरपट्ट, कुमुद तसेच करवतीच्या दात्यांसारखा उभार असलेला आणखी एक कुमुद, कीर्तिमुख हंस थर असे अनेक थर आहेत. कर्णरथावरील देवळ्यांवर दिक्पालांची शिल्पे आहेत. प्रतिरथावरील देवळ्यांमध्ये अप्सरांची शिल्पे आहेत. भद्ररथावरील देवळ्यांमध्ये सप्तमातृका, चामुंडा, कार्तिकेय, नटराज, वराह, नरसिंह तसेच सूर्याच्या मूर्ती आहेत. मंदिरावर युद्धप्रसंगांबरोबरच, सिंह, हत्ती यांसारख्या प्राण्यांची शिल्पे तसेच रामायण महाभारतातील प्रसंगही कोरलेले आहेत. मंदिराच्या सुशोभनासाठी कमळ, कुंभ, मकर, पानेफुलेवेलबुट्ट्या ही शुभचिन्हे वापरण्यात आली आहेत. मंदिराच्या दक्षिण उत्तरेकडील बाह्यांगावर खजुराहोसारखी शृंगारशिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचा जंघा (भिंत) दोन स्तरांमध्ये विभागला गेला आहे. खालील स्तरात मूर्ती ठेवण्यासाठी देवकोष्ठे असून वरच्या स्तरात शिल्प नसलेल्या अनेक रिकाम्या देवड्या आहेत. महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच शिल्पमंदिरे आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील या वडेश्वर महादेव मंदिराचा समावेश आहे.

उपयुक्त माहिती:

  • सिल्लोडपासून २६ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ९० किमी अंतरावर
  • सिल्लोड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home