वडचीआई / वडचाई मंदिर

रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील रायपाटण परिसरात पूर्वी रायपाटण, येळवण, कोळवण, धानंपे, पाचल, कारवली, येरडव, हेरळ, परुळे, झर्ये, कुरव, कुरंग, रिंगणे, कोंडगे अशी १३ गावे होती. आता हा सर्व परिसर रायपाटण म्हणून ओळखला जातो. या १३ गावांची ग्रामदेवता म्हणून येथील जागृत वडचीआई देवी मंदिर प्रसिद्ध आहे. ‘नवसाला पावणारीअशी वडचीआई देवीची ख्याती असल्याने दररोज शेकडो भाविक येथे दर्शनाला येतात.

मंदिराची अख्यायिका अशी की पूर्वी या भागात एक मांडलिक राजा होता. एकदा राजाला मोठा यज्ञ करायचा होता. त्यासाठी त्यांनी अनेकांना निमंत्रणे धाडली परिसरातीलही सर्व गावकऱ्यांनाही जेवायला बोलावले. या सर्व पाहुण्यांची ग्रामस्थांच्या जेवणाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी राजाने आपल्या सुनेकडे सोपविली होती. यज्ञाच्या दिवशी सुनेने केवळ सव्वा शेराचा भात पातेल्यात शिजायला ठेवला, असे जेव्हा इतर दासींकडून राजाला समजले, तेव्हा संतप्त होऊन तो सुनेवर ओरडू लागला; परंतु मी जर सत्वशील असेन तर एवढा भात सर्वांना पुरेल, असे तिने राजाला परखडपणे सांगितले होते. पाहुणे जर उपाशी राहिले तर आपणास यज्ञाचे पुण्य मिळणार नाही, अशी धाकधूक राजाच्या मनात होती, पण आश्चर्य म्हणजे तोच सव्वा शेराचा भात सर्वजण जेवूनही शिल्लक होता. हे सर्वांना समजल्यावर राजाची सून ही सर्वसाधारण स्त्री नसून ती देवीचा अवतार आहे, याची खात्री पटली. त्यामुळे सर्वजण या सुनेला भेटण्यासाठी आले; परंतु राजा रागात तिला खूप बोलल्यामुळे ती गावाबाहेर एका वडाच्या झाडापाशी गेली तेथेच गुप्त झाली. राजाला जेव्हा हे समजले तेव्हा त्याला फार वाईट वाटले. त्याने कोल्हापूरच्या अंबाबाईसारखी एक मूर्ती करून घेतली तिची या वडाच्या झाडाजवळ स्थापना केली, म्हणून या देवीला वडचीआई / वडचाई हे नाव पडले.

वडचाई मंदिर केव्हा बांधले गेले याची निश्चित नोंद नसली तरी रायपाटण गाव वसले तेव्हापासूनच हे मंदिर असल्याचे सांगितले जाते. काळाच्या ओघात अनेकदा मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला. २०१८ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावच्या मध्यावर गांगणवाडी येथील विस्तीर्ण जागेत मंदिर आहे. मंदिराभोवती जांभ्या दगडाने बांधलेल्या तटातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी असून बाजूने सुंदर उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर पडते. साधारणतः तीन फूट उंच जगतीवर (जोता) असलेल्या दगडी बांधकामाच्या मंदिराला करड्या शुभ्र रंगाने रंगविलेले आहे. दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. दर्शनमंडपातील कमानीसदृश्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपापासून सभामंडपही काहीसा उंच आहे. येथील मोठ्या सभामंडपातील भिंती छतावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. येथील छतावर असलेल्या दगडी झुंबरावरील कलाकुसर विशेष वैशिष्ट्यपूर्ण भासते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक ढाल त्यात दोन तलवारी लावलेल्या आहेत. गर्भगृहातील एका चौथऱ्यावर काळ्या दगडाची देवीची सुबक मूर्ती आहे. मूर्तीला चार हात असून ती शस्त्रधारी आहे. मूर्तीसमोर असलेला चव्हाटा (स्थानिक भाषेत चौक) ही न्यायव्यवस्थेची जागा आहे. पूर्वी या चव्हाट्यावर उभे राहून न्यायनिवाडा होत असे येथे झालेले निर्णय अंतिम असत.

नारळी पौर्णिमा, नवरात्र होळी असे तीन उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. येथील नवरात्रोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. आश्विन शुक्ल प्रतिपदेला येथे गाभाऱ्यात घटस्थापना केली जाते. ती करताना थोडी माती टाकून मधोमध कुंभ ठेवला जातोत्या कुंभात १८ प्रकारची धान्ये टाकली जातात. पुढील वर्षी कोणते पीक घ्यायचे, याचा शेतकऱ्यांना अंदाज यावा, यासाठी असे केले जाते. कुंभात जे धान्य भरभर उगवेल, त्याची पेरणी करावी; त्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल, असा देवी यातून संकेत देते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याशिवाय नवरात्रोत्सवात देवीची खणानारळाने ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी असते. देवीकडे केलेला नवस पूर्ण झाल्यास नवरात्रोत्सवात देवीसमोर नंदादीप लावण्यासाठी भाविकांकडून देवीला समई भेट देण्याची पद्धत आहे.

मंदिरात होलिकोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. होळीच्या आदल्या दिवशी स्वयंभूच्या होळ्या म्हणून मंदिर परिसरात चारपाच फुटांच्या आंब्याच्या फांदीच्या होळ्या उभारल्या जातात. अशा प्रकारच्या होळ्या गावातील जुना चव्हाटा, रवळनाथ, भावकादेवी, एकवीरा देवी, विठ्ठल मंदिर येथेही उभारल्या जातात. असे सांगितले जाते की येथील शेटे मंडळी ही घाटावरील नाटोली येथून या गावी आली. येताना त्यांनी आपली नाटेश्वरी देवीही सोबत आणली होती. येथे आल्यावर त्यांनी नाटेश्वरी देवीचे वडचीआई देवीच्या स्वरूपातच विलय केला. तेव्हापासून येथील मानकऱ्यांमध्ये शेटे कुटुंबाचाही समावेश केला जातो

उपयुक्त माहिती:

  • राजापूरपासून ३३ किमी, तर रत्नागिरीपासून ८० किमी अंतरावर
  • रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • रायपाटणमध्ये निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : विनायक शेट्ये, अध्यक्ष : ९२२६८२२८७८, राजेंद्र जोशी, उपाध्यक्ष : ९२०९९४९८३२
Back To Home