राज्यातील सर्वात सुंदर व रमणीय जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. वनसंपदा, बारमाही वाहणाऱ्या नद्या, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये, विपुल खाणी व कारखाने यांनी हा जिल्हा समृद्ध आहे. येथील शिल्पकला व मूर्तीकला ही प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या सर्व शिल्पसौंदर्याचा मुकुटमणी ठरावा, असे एक मंदिर वरोरा तालुक्यातील खरवड येथे असून त्यात असलेल्या ब्रह्मा–विष्णू–महेश या मूर्तींवरील कोरीव शिल्पसौंदर्यामुळे ते प्रसिद्ध आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात धानोरा आणि खरवड या दोनच गावांमध्ये ब्रह्मा–विष्णू–महेश (त्रिमूर्ती) मंदिरे आहेत. त्यापैकी मूर्ती स्थापत्याच्या दृष्टीने खरवड येथील मंदिर विशेष महत्त्वाचे मानले जाते. नागपूर–वरोरा मार्गावर वरोरानजीक ब्राह्मणी फाट्यापासून जवळ खरवड गाव आहे. गावाच्या मध्यभागी हेमाडपंती रचनेचे हे मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मा–विष्णू–महेश यांच्या प्रतिमा आहेत. पण त्या नव्याने बसविलेल्या आहेत; परंतु येथील सभामंडपात असलेल्या ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या प्राचीन मूर्ती हे येथील आकर्षण आहे. अभ्यासकांच्या मते या मूर्ती १००० ते १२०० वर्षे इतक्या प्राचीन असाव्यात. पूर्वी याच मूर्ती येथील गाभाऱ्यातील मूळ मूर्ती होत्या; परंतु त्यातील एक मूर्ती काहीशी भंगल्यामुळे या मूर्ती सभामंडपात ठेवण्यात आल्या व पूजेसाठी गर्भगृहात नवीन मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत.
सभामंडपातील या तिन्ही मूर्तींवर नखशिखांत शिल्पे कोरली आहेत. प्रत्येक मूर्ती अखंड दगडांत कोरलेली आहे. असे सांगितले जाते की या मूर्ती येथील नदीपात्रात सापडल्या होत्या. यातील पहिली मूर्ती ब्रह्मदेवाची असून ती ५ फूट ७ इंच उंचीची आहे. मूर्तीला त्रिकोणी आकाराची पाठशिळा (मूर्तीच्या मागे असलेली सपाट शिळा ज्यावर प्रभामंडळासह खालपर्यंत विविध शिल्पे कोरलेली असतात) आहे. या पाठशिळेवर वरपासून खालपर्यंत अनेक खण (कप्पे) असून त्या प्रत्येक खणात लहान–लहान प्रतिमा कोरलेल्या आहेत. प्रभामंडळात मकरमुख, हत्ती, अश्व, बैल, मेंढा इत्यादी लघुशिल्प आहेत. ब्रह्मदेवांची मूर्ती चतुर्भुज असून डावीकडील दोन हातांमध्ये वरदमुद्रा व अक्षमाळा तर उजवीकडील हातांमध्ये कमंडलू व पोथी आहेत. ब्रह्मदेवांच्या मुखावर टोकदार दाढी व आकडेबाज मिशा आहेत. डोक्यावर करंड पद्धतीचा मुकुट (रत्नजडित किंवा अशा रचनेचे ज्यामध्ये खरोखरची रत्ने नसली तरी त्यावरील कलाकुसर तशी असते) बाजुबंद, यज्ञोपवीत (जानवे), वस्त्र, शेला, तोडे असे सारेच अलंकार दगडात कोरताना कारागिराने आपले कौशल्य पणाला लावलेले दिसते.
३ मूर्तींच्या संचात मध्यभागी श्रीविष्णूंची मूर्ती आहे. ही मूर्ती ५ फूट ८ इंच उंचीची असून चतुर्भुज आहे. शंख, चक्र, गदा, पद्म या ४ आयुधांच्या प्रतिमेस आयुधांच्या क्रमामुळे ‘गोविंद’ म्हटले जाते. श्रीविष्णू मूर्तीच्या पाठशिळेवर दशावतार कोरले असून त्यात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, श्रीराम, श्रीकृष्ण, परशुराम आदींचे अतिशय बारकाईने अंकन केलेले दिसते. मूर्तीच्या पायाजवळ अनेक लहान–लहान प्रतिमा कोरलेल्या असून त्यात काही विष्णूंच्या शक्ती, चामरधारिणी, भक्त व साधक आहेत. श्रीविष्णूंच्या चेहऱ्याचा फुगीरपणा, स्मितहास्य व शांत भाव यामुळे ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण भासते.
विष्णूमूर्तीच्या शेजारी महादेवांची मूर्ती आहे. कानात मकरकुंडले, गळ्यात वैजयंतीमाळा, यज्ञोपवीत, मुकुट, कंबरपट्टा, उदरबंध, केयूर (बाजुबंद), तोडे, कडी हे सर्व पाषाणवैभव महादेवांच्या मूर्तीत पाहायला मिळते. महादेवांचा मुकुट नागबंधयुक्त असून चेहऱ्यावर काहीसे रौद्र भाव जाणवतात. कपाळावरील तिसरे नेत्र चंदनटिळ्यामुळे झाकल्यासारखे वाटते. महादेवांची ही मूर्ती ५ फूट ११ इंच उंचीची आहे. शिरावरील नागमणीमुळे ही मूर्ती इतर दोन मूर्तींपेक्षा उंच आहे. महादेवांची मूर्तीही चतुर्भुज असून हातात अक्षमाळा, नागपाश, त्रिमुखी नाग व डमरू आहेत. अंगावर सर्वत्र कोरीव रुद्राक्षांच्या माळा व त्याचेच अलंकार आहेत. महादेवांच्या पायाजवळ ८ शिल्पे असून त्यात शिवगण, चामरधारिणी स्त्री प्रतिमा, तर काही कलशधारी दिसतात. इतर गण हे नृत्य करताना कोरलेले आहेत.
या सर्व मूर्तींवरील एक इंचही जागा शिल्पकाराने रिक्त सोडलेली नाही. शब्दशः नखशिखांत शिल्पव्याप्त असलेल्या येथील मूर्ती हे या खरवड गावचे भूषण समजले जाते. असे सांगितले जाते की १९७४ साली इटलीतील एका महिलेने या मूर्ती १००,००,००० रुपयांना (एक कोटी) खरेदी करण्याची तयारी दाखवली होती; परंतु ग्रामस्थांनी त्या न विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या अप्रतिम मूर्ती आजही पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या मंदिराच्या आवारात स्वतंत्र शिव मंदिर असून या मंदिराच्या पुढे दोन नंदी आहेत. याशिवाय या परिसरात गुणा माता या संत होऊन गेल्या, त्यांचीही गावात समाधी आहे.
त्रिमूर्ती मंदिरात दरवर्षी चैत्र कृष्ण तृतिया ते चैत्र कृष्ण षष्ठी यादरम्यान उत्सव साजरा करण्यात येतो. असे सांगितले जाते की या उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून त्यामध्ये कैकाडी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नामदेव महाराज– पंढरपूर आदी संतांनी येथे कीर्तन केले आहे.