दहिवली बु., ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
कोकणातील वैभवात भर घालणारे चिपळूण तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथील त्रिमुखी वरदान मानाई देवीचे मंदिर हे येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील वेगळेपण असे की या पूर्ण मंदिराचे बांधकाम एखाद्या रथाप्रमाणे केलेले आहे. महाराष्ट्र व दाक्षिणात्य संस्कृती व स्थापत्यशास्त्राच्या सुंदर मिलाफाने ही वास्तू तयार झालेली आहे. मंदिराचे बांधकाम तामिळनाडूतील सेलम येथून आणण्यात आलेल्या काळ्या पाषाणातून (Salem Stones) केलेले आहे. ही देवी गावातून लग्न होऊन गेलेल्या स्त्रियांची (माहेरवाशिणी) पाठराखण करणारी व त्यांच्या हाकेला साद देणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले दहिवली बु. हे कोकणातील एक समृद्ध गाव मानले जाते. चिपळूण तालुक्यातील सावर्डे रेल्वेस्थानकापासून दोन किमी अंतरावर हे गाव आहे. दक्षिणेकडून बारमाही वाहणाऱ्या कापशी नदीचा तीर तसेच उत्तरेकडील उंच डोंगरांनी या गावाला वेढलेले आहे. या गावात डोंगराच्या पायथ्याशी ३५० वर्षांपूर्वीचे त्रिमुखी वरदान मानाई देवीचे मंदिर हे जागृत व कोकणातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते. तीन मुखे असलेली देवीची मूर्ती ही देशात दुर्मिळ समजली जाते. देवीवर असणारी भाविकांची श्रद्धा व येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या गृहीत धरून राज्य सरकारनेही तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्गाचा दर्जा देऊन या मंदिराचा गौरव केलेला आहे.
डोंगर उतारावर असलेल्या एका सपाट जागेवर त्रिमुखी वरदान मानाई देवीचे हे मंदिर आहे. मंदिराचे प्रांगण हे साधारणतः चार ते पाच फूट उंच आहे. पायऱ्यांवरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर मंदिराच्या दोन्ही बाजूला सुंदर उद्यान विकसित केलेले दिसते. यामध्ये विविध फूलझाडे व शोभेची झाडे आहेत व त्यामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला हत्तींची दोन मोठी शिल्पे आहेत. पुण्यातील प्रतिबालाजी मंदिर ज्या कारागिरांनी बांधले त्यांनीच हे मंदिरही बांधले आहे. त्यासाठी केरळहून आलेले ४० कारागीर तीन महिने अहोरात्र काम करीत होते. या मंदिराची रचना रथाप्रमाणे आहे. त्यामुळे रथाला जशी चाके असतात, तशी मंदिराच्या दोन्ही बाजूला दगडांतून पाच–पाच चाके कोरलेली दिसतात. तसेच रथावर असलेल्या ध्वजांप्रमाणे येथील शिखरांवर भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत. येथील सर्व दगडी कामाला स्टोन स्प्रे फिनिशिंग केल्यामुळे हे बांधकाम अखंड दगडात कोरल्यासारखे वाटते.
दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिर साधारणतः तीन फूट उंचीच्या जोत्यावर बांधलेले आहे. त्यामुळे पाच पायऱ्या चढून दर्शनमंडपात प्रवेश होतो. येथील दर्शनमंडप हा खुल्या प्रकारातील असून त्यात असलेल्या चार खांबांवर वरच्या बाजूला एक मुख्य व चार कोपऱ्यांवर चार अशी पाच शिखरे आहेत. दर्शनमंडपाच्या दोन्ही बाजूला बाहेरून दगडी चाके कोरलेली आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला कोरीव काम केलेल्या दगडी मखरात मानाई देवी व भैरी यांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. सभामंडप प्रशस्त असून तो पूर्ण मोकळा आहे. येथील सर्व स्तंभ हे भिंतीत आहेत. या सभामंडपावरही एक मुख्य शिखर व लहान लहान अनेक शिखरे आहेत. सभामंडपाच्या बाहेरील बाजूला उजवीकडे दोन व डावीकडे दोन अशी चार चाके कोरलेली आहेत.
सभामंडपात गर्भगृहाच्या डावीकडे काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती व त्यासमोर शिवपिंडी आहे. सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह बांधण्यात आलेले आहे. या गर्भगृहातील वैशिष्ट्यपूर्ण दगडी मखरामध्ये डावीकडून वरदान देवी, वाघजाई, गुढाई व बाजी यांच्या मूर्ती आहेत. यापैकी मुख्य मूर्ती असलेली वरदान देवीची मूर्ती इतर मूर्तींपेक्षा मोठी असून तिला तीन मुखे व सहा हात आहेत. लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा यांचे हे एकत्रित रूप मानले जाते. तिन्ही मुखांवर सुंदर कलाकुसर केलेले मुकुट, दगडांतच कोरलेले वस्त्रालंकार, सहा हातांमध्ये असलेली विविध आयुधे व शिल्पांकित पाठशिळा असे वरदान देवीचे हे रूप आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतींवरही कलाकुसर असून येथील भिंतींमध्ये कोरलेली दगडी चाके ही खऱ्याखुऱ्या रथाची चाके भासावीत इतकी सुंदर जाणवतात. याशिवाय बाहेरील भिंतींवर माहूरगडावरील रेणुकामाता, वणी येथील सप्तशृंगी माता, तुळजापूरची तुळजा भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई यांची उठावचित्रे (म्युरल्स) आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला येथील प्राचीन मूर्ती एका रांगेत मांडून ठेवलेल्या आहेत.
कोकणातील प्रत्येक गावच्या यात्रेचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य असते. त्याप्रमाणेच दहिवली येथील या मंदिरात दर तीन वर्षांनी भरणारी समायात्रा ही येथील खास यात्रा आहे. या यात्रेची परंपरा शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. ज्या वर्षात अधिक महिना असतो त्या वर्षाच्या पौष पौर्णिमेला येथे तीन दिवसांची यात्रा भरते. पौष त्रयोदशीला यात्रेच्या पहिल्या दिवशी वरदान–मानाई, गुढाई, वाघजाई, भैरी, बाजी यांच्या मूर्ती असलेली पालखी संपूर्ण गावातून फिरवली जाते. यावेळी ऐनाचे ५० फूट उंचीचे झाड तोडून ते सोलून त्याची लाट बनविली जाते. दुसऱ्या दिवशी ही लाट पंचक्रोशीतील गावागावांतून नाचविली जाते. सुवासिनींकडून ठिकठिकाणी या लाटेचे पूजन केले जाते. देवीच्या मंदिरासमोर असलेल्या २५ फूट उंचीच्या लाकडी खांबावर बगाडाच्या खोबणीमध्ये ही लाट बसविली जाते. पौर्णिमेच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी मानकरी आणि त्यानंतर भक्तगणांना या बगाडावर चढविले जाते. यावेळी ढोल–सनईची साथ दिली जाते. सर्व भाविक एका सुरात देवीला साकडे घालतात म्हणून या यात्रेला समायात्रा असे म्हटले जाते. ‘समा’ म्हणजे सर्वांनी मिळून देवाला घातलेली साद, असे मानले जाते. नोकरी–व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले येथील ग्रामस्थ आवर्जून यात्रेसाठी उपस्थित राहतात. तीन वर्षांतून होत असल्याने यात्रेचे आकर्षणही अधिक असते.