गणपती म्हणजे विघ्नहर्ता… भक्तांना संकटातून सोडवणारी देवता! कोकण किनारपट्टी आणि गणपतीचे नाते हे अतूट आहे. कोकणात अनेक ठिकाणे अशी आहेत की जेथे या गणपतीचा अधिवास आहे. येथील गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. उत्सव संपल्यावर भाविक येथील समुद्रकिनाऱ्यावर गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. परंतु दापोली तालुक्यातील बुरोंडी हे एक असे गाव आहे, जेथे समुद्रातून गणपती आला आणि मंदिरात स्थानापन्न झाला. जेव्हापासून हा गणपती गावात आला तेव्हापासून या गावची भरभराट होत आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले एक गाव. या गावातील बहुसंख्य लोक हे कोळी व खारवी समाजाचे आहेत. या समाजाचा येथील समुद्रावरच उदरनिर्वाह चालतो. मच्छीमारी हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय. असे सांगितले जाते की एकदा या गावातील दुर्वास, नंदकुमार साखरकर आणि इतर दोघे असे एकाच कुटुंबातील चार जण आपल्या बोटीतून मच्छीमारीसाठी हर्णे बंदराजवळील खोल समुद्रात गेले होते. ही घटना २००६ सालची. पाण्यात जाळे टाकत असताना त्यांना तेथे लाकूड तरंगताना दिसले. कुतूहल म्हणून त्यांनी ते लाकूड बोटीत ओढून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या लक्षात आले की ती गणपतीची सुंदर लाकडी मूर्ती आहे. त्यांनी ही मूर्ती बोटीत घेतल्यावर त्यांना वाटले की कोणी ही मूर्ती पाण्यात विसर्जित केली असेल, म्हणून त्यांनी मूर्तीची पूजा केली व ती पुन्हा पाण्यात सोडून दिली.
समुद्रात जाळे टाकून झाल्यानंतर साखरकर बंधू पुन्हा काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना आपल्या बोटीजवळ तीच मूर्ती तरंगतांना दिसली. त्यानंतर ते आणखी खोल समुद्रात गेल्यावर जाळे टाकताना त्यांना धक्काच बसला. पुन्हा तीच मूर्ती त्यांच्या बोटीजवळ तरंगत होती. हा दैवी संकेत समजून त्यांनी ही मूर्ती बोटीत घेतली. ही मूर्ती जीर्ण अथवा भंग झालेली आहे का याची पाहणी केली असता या मूर्तीवर साधा ओरखडाही नव्हता. अखंड लाकडापासून घडविलेली व तीन मुखे असलेली ही गणपतीची मूर्ती होती. शेवटी ही मूर्ती आपल्या गावात घेऊन जावे, असा निश्चय करून या बंधूंनी आपल्या गावातील घरात ही मूर्ती आणली.
साखरकर बंधूंनी गावातील ग्रामस्थांना एकत्र करून समुद्रात घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेऊन गावातील श्री सावरदेवाच्या प्राचीन मंदिरात माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. मीटरभर उंचीची, शिसवीच्या लाकडाची, गणपतीची ही उभी मूर्ती तीन तोंडांची आहे. मूर्तीला सहा हात आहेत. त्यांपैकी उजव्या हातांमध्ये पाष, शस्त्र आणि मोडलेला दंत आहे तर डाव्या हातांमध्ये पाष, शस्त्र आणि लाडू आहे. गणपतीच्या कमरेवर मेखला, गळ्यात हार व शरीरावर असलेले इतर दागिने लहान–लहान नक्षीकामांतून साकारले आहेत. मूर्तीच्या पायाजवळ उजव्या बाजूला मूषक आहे.
ही मूर्ती समुद्रात सापडल्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यावर अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला होता; परंतु गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केल्याने अखेर नमते घेत सरकारने या गावातच ही मूर्ती ठेवण्याची गावकऱ्यांची इच्छा मान्य केली. काही वर्षांपूर्वी सावरदेव मंदिरापासून काही अंतरावर बुरोंडी गावातच नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात ही मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. दरवर्षी माघी उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामध्ये सकाळी पाच वाजता काकड आरती होऊन उत्सवाला सुरुवात होते. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. त्यानंतर संपूर्ण गावातील भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.