मुंबईतील बोरिवली पूर्व भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून एक उंच आणि भव्य मंदिर आहे. हे मंदिर त्रिमंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर पंथभेद आणि संकुचित धार्मिक विचार दूर करून धर्मनिरपेक्षतेला महत्त्व देण्यासाठी उभारले गेले आहे. विविध जाती आणि धर्मांमधील अदृश्य भिंती पाडून लोकांमध्ये शांतता, एकता, शाश्वत आनंद आणि आध्यात्मिक समज वाढवणे हा या मंदिराचा मुख्य हेतू आहे. हे मंदिर कोणत्याही एका विशिष्ट पंथापुरते मर्यादित नाही. जैन, शैव आणि वैष्णव या तिन्ही प्रमुख प्रवाहांचा मिलाफ घडवून आणणारे हे एक सामायिक ठिकाण मानले जाते.
त्रिमंदिराची मूळ संकल्पना जैन आध्यात्मिक विचारवंत दादा भगवान यांनी मांडली होती. ते उत्स्फूर्त आत्मसाक्षात्काराचे विज्ञान म्हणजेच ‘अक्रम विज्ञान’ या चळवळीचे प्रवर्तक होते. दादा भगवान यांचे मूळ नाव अंबालाल मूलजीभाई पटेल असे होते. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९०८ रोजी गुजरातमधील तरसाली येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांनी आध्यात्मिक ओढ होती. त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर व्यवसायासाठी ते मुंबईत आले. मुंबई बंदरातील कोरड्या गोद्यांची म्हणजेच ड्राय डॉक्सची देखभाल करणाऱ्या ‘पटेल अँड कंपनी’मध्ये त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले. जून १९५८ मध्ये सुरत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, अशी त्यांची अनुभूती होती. या अनुभवानंतर त्यांनी १९६० च्या दशकात ‘अक्रम विज्ञान’ चळवळीची स्थापना केली. २ जानेवारी १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांनी हे कार्य पुढे चालू ठेवले.
दादा भगवान यांच्या मते, माणसाने स्वतः देव आणि धर्माचे तुकडे केले आहेत, परंतु प्रत्यक्षात सर्वच देवी-देवतांनी आत्मज्ञान आणि आत्म्याच्या शुद्धतेवर भर दिला आहे. म्हणूनच एकाच छताखाली सर्व प्रमुख देवांची स्थापना करून लोकांना कोणत्याही भेदभावाशिवाय भक्ती आणि मनःशांती मिळवून देणे हे या मंदिराचे मूळ उद्दिष्ट आहे. या ठिकाणी जागतिक धार्मिक सलोख्याचा प्रसार केला जातो. सर्व देवदेवता आपल्याला आत्म्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठीच मार्गदर्शन करतात, याच तत्त्वज्ञानावर आधारित या त्रिमंदिराची उभारणी झाली आहे. ‘दादा भगवान फाउंडेशन’च्या माहितीनुसार, ‘अक्रम विज्ञान’ हा सांसारिक जीवनाचा त्याग किंवा कडक आत्मसंयमाची मागणी करणाऱ्या पारंपरिक मार्गांपेक्षा वेगळा आहे. हा आत्मसाक्षात्काराचा एक सोपा आणि थेट मार्ग मानला जातो. आत्मज्ञानाच्या पारंपरिक मार्गांमध्ये लोकांना संसाराचा, भौतिक संपत्तीचा त्याग करावा लागतो. आत्मनियंत्रणाचा अभ्यास करावा लागतो. अक्रम विज्ञानात याची आवश्यकता नसते. या विज्ञानानुसार, जेव्हा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या कृपेने आत्म्याचे अज्ञान पूर्णतः दूर होते,
तेव्हा आंतरिक रुपात मौलिक परिवर्तन सुरू होते. आत्मज्ञान प्राप्तीच्या प्रक्रियेस ज्ञानविधी असे म्हटले जाते. या माध्यमातून केवळ दोन तासांत आत्म्याचे ज्ञान प्राप्त होते असा दावा आहे. ज्ञानभक्ती हे अक्रम विज्ञाचे मूलतत्त्व आहे. संपूर्णपणे समर्पण करून सीमंधर स्वामी आणि त्याचे माध्यम असलेले दादा भगवान यांच्याप्रती ज्ञानभक्ती व्यक्त करणे हा या विज्ञानाचा मुख्य गाभा आहे.
जैन परंपरेनुसार, सीमंधर स्वामी हे सध्या ‘महाविदेह क्षेत्र’ नावाच्या दुसऱ्या विश्वात राहणारे जिवंत तीर्थंकर आहेत. त्यांचा जन्म १७ वे तीर्थंकर कुंथुनाथ आणि १८ वे तीर्थंकर अर्हनाथ यांच्या काळात झाला होता, असे मानले जाते. त्यांचे भौतिक रूप सुमारे १५०० फूट उंच आहे. त्यांचे सध्याचे वय सुमारे १,५०,००० वर्षे आहे आणि ते आणखी १,२५,००० वर्षे जिवंत राहतील, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. पौराणिक कथांनुसार, राजा दशरथानेही त्यांच्याकडून दीक्षा घेतली होती. ‘दादा भगवान फाउंडेशन’तर्फे बांधण्यात आलेल्या सर्व त्रिमंदिरांमध्ये सीमंधर स्वामी हेच मुख्य दैवत आहेत आणि त्यांची येथे अत्यंत भक्तीभावाने पूजा केली जाते.
त्रिमंदिर ही एक क्रांतिकारी धार्मिक संकल्पना मानली जाते. यात सर्व मुख्य धर्मांना समान स्थान दिले जाते. दादा भगवान यांची शिकवण अशी आहे की ‘लोकांनी स्वतःच देव आणि धर्मास विभाजित केले आहे. कोणत्याही एका देवाची निवड करण्यापेक्षा आपण सर्व धर्मांचे मूलसिद्धांत समजून घेऊन त्यांचे आचरण केले पाहिजे. सर्व देवतांनी आपणांस आत्मा आणि आत्मसाक्षात्काराचे महत्त्व सांगितले आहे.’ या विचारांवर आधारित अशी अनेक मंदिरे आज अनेक ठिकाणी उभी असून त्यातील एक त्रिमंदिर बोरिवली येथे आहे.
हे त्रिमंदिर पारंपरिक आणि आधुनिक वास्तुरचनेचा एक सुंदर नमुना आहे. मंदिराभोवती एक मजबूत दगडी तटबंदी आहे. या तटबंदीतील मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात मंदिरासमोर विविध प्रकारची शोभेची व फुलझाडे लावलेली आहेत. याशिवाय प्रांगणामध्ये भाविकांना बसण्यासाठी अनेक बाकांची सोय केली आहे. प्रांगणातून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर संगमरवरी दगडातील दोन मोठे गजराज म्हणजेच हत्तींची शिल्पे आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात डाव्या बाजूला दोन लहान मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये पद्मावती देवी आणि पद्मनाभ भगवान यांच्या मूर्ती विराजमान आहेत. उजव्या बाजूला असलेल्या दोन लहान मंदिरांमध्ये साईबाबा आणि अंबामाता यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. प्रांगणातून सहा पायऱ्या चढून वर आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच मुखमंडपापाशी सिंहांची शिल्पे दिसतात.
येथील स्तंभांवर बारीक कोरीव काम केलेले आहे. या विशाल प्रवेशद्वारावर द्वारपालांच्या मूर्ती आहेत. या संपूर्ण वास्तूत तीन मुखमंडप, मुख्य सभामंडप, तीन अंतराळ आणि तीन गर्भगृहे आहेत.
येथील मुख्य सभामंडपाच्या छताला मध्यभागी एक मोठे बिलोरी झुंबर टांगलेले आहे. मध्यभागी असलेल्या मुख्य गर्भगृहात जैन धर्माचे वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी विराजमान आहेत. डाव्या बाजूच्या गर्भगृहात शिव संप्रदायाचे संगमेश्वर महादेव आहेत, तर उजव्या बाजूच्या गर्भगृहात वैष्णव संप्रदायाचे योगेश्वर कृष्ण विराजमान आहेत. मुख्य गर्भगृहात श्री सीमंधर स्वामींची भव्य मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडात घडवलेली आहे. ही मूर्ती ध्यानस्थ म्हणजेच पद्मासन मुद्रेत एका उंच वज्रपीठावर बसलेली आहे. स्वामींच्या मूर्तीला सुवर्ण आभूषणे आणि मुकुटाने सजवले आहे. त्यांच्या अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांमध्ये चंद्रायण यक्ष आणि पंचांगुली यक्षिणी देवीच्या मूर्ती आहेत.
अंतराळातील इतर देवकोष्टकांमध्ये भगवान पार्श्वनाथ, भगवान महावीर, भगवान अजितनाथ आणि भगवान ऋषभदेव यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. शिव संप्रदायाच्या गर्भगृहाच्या समोर संगमरवरी नंदी आणि कासवाची मूर्ती आहे. येथील अंतराळातील देवकोष्टकांमध्ये हनुमान आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. या गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी मोठ्या आकाराचे शिवलिंग आहे आणि त्यामागील भिंतीवरील देवकोष्टकात माता पार्वतीची शुभ्र संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. योगेश्वर कृष्ण यांच्या गर्भगृहात वज्रपीठावर श्रीनाथजींची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तसेच योगेश्वर कृष्ण भगवान यांची शुभ्र संगमरवरी मूर्ती, तिरुपती बालाजी आणि गरुडमूर्ती येथे प्रतिष्ठित आहेत. मुख्य गर्भगृहाच्या बाहेरील बाजूला असलेल्या दोन स्तंभांवर दादा भगवान यांच्या मोठ्या प्रतिमा लावलेल्या आहेत.
मंदिराच्या तळमजल्यावर भाविक आणि साधकांसाठी एक मोठा सत्संग हॉल आहे. या हॉलमध्ये साप्ताहिक सत्संग आणि आध्यात्मिक चर्चांचे आयोजन केले जाते. याच भागात दादा भगवान यांच्या जीवनप्रवासावर आधारित विविध पुस्तके आणि ग्रंथांचे विक्री केंद्र आहे. तसेच येथे एक संग्रहालय आणि छोटे चित्रपटगृह देखील आहे.
या चित्रपटगृहात दादा भगवान यांच्या जीवनावरील माहितीपट गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये दाखवले जातात. मंदिराची वेळ दररोज सकाळी ७ ते रात्री ९ अशी आहे. येथे दैनंदिन स्तरावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विविध विधी पार पाडले जातात. दररोज सकाळी देवांना स्नान घातले जाते. या विधीला प्रक्षाल म्हणतात. त्यानंतर जैन तीर्थंकर, भगवान शिव आणि योगेश्वर कृष्ण या तिन्ही प्रमुख देवांना शास्त्रोक्त पद्धतीने जल आणि इतर पवित्र द्रव्यांनी विशेष अभिषेक केला जातो. मंदिरात दररोज सकाळी ८:१५ वाजता आणि सायंकाळी ६:३० वाजता आरती केली जाते.
वार्षिक उत्सवांच्या बाबतीत हे मंदिर सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण मानले जाते. येथे सर्व संप्रदायांचे प्रमुख सण एकत्र आणि मोठ्या उत्साहाने साजरे होतात. मंदिरात प्रामुख्याने गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, गणेशचतुर्थी, नवरात्र, पर्युषण पर्व, दिवाळी आणि नववर्ष हे सण सलोख्याने साजरे केले जातात. शिव परंपरेनुसार महाशिवरात्रीला शिवपिंडीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी रात्रभर चालणारे जागरण आणि भजनांचे आयोजन केले जाते. वैष्णव संप्रदायाचा प्रमुख सण असलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव येथे भव्य स्वरूपात साजरा होतो. या उत्सवाच्या वेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीला विशेष पोशाख आणि अलंकारांनी सजवले जाते आणि रात्री पाळणा तसेच दहीहंडीचा कार्यक्रम केला जातो. जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण पर्व आणि महावीर स्वामी जन्मकल्याणक काळात मंदिरात विशेष धार्मिक वाचन, ध्यान आणि तपश्चर्येचे सत्र आयोजित केले जातात. या सत्रांमध्ये जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. याव्यतिरिक्त दिवाळी, पाडवा आणि रक्षाबंधन हे पारंपरिक सणही येथे उत्साहात साजरे केले जातात. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला परम पूज्य दादा भगवान यांची जन्मजयंती येथे विशेष आध्यात्मिक शिबिरे, ‘ज्ञानविधी’ आणि साधकांसाठी सत्संग आयोजित करून मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. या विशेष सोहळ्याच्या वेळी अनेक साधक व भाविक या त्रिमंदिराला दर्शनासाठी आवर्जून भेट देतात.