जगास वैश्विक बंधुभाव आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देणारे ‘योद्धा संन्यासी’ स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाची एक शाखा खार येथे स्थित आहे. हा मठ रामकृष्ण संप्रदायाच्या मुंबईतील सर्वात जुन्या केंद्रांपैकी एक आहे. येथे विवेकानंदांचे गुरू व जगविख्यात सत्पुरुष रामकृष्ण परमहंस आणि त्यांच्या पत्नी शारदादेवी यांचे वैश्विक मंदिर आहे. विस्तीर्ण आणि शांत परिसरात वसलेला हा मठ आज मुंबईतील विशेषकरून बंगाली भाविकांचे एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून कार्यरत आहे.
कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या आहे. माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रुचेल व पचेल ते घ्यावे, अशी विचारसूत्रे मांडणारे रामकृष्ण परमहंस हे एक थोर कालीभक्त होते. पश्चिम बंगालमध्ये कामारपुकुर नावाच्या खेड्यात १८ फेब्रुवारी १८३६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव गदाधर होते, तर वडिलांचे नाव क्षुदिराम व आईचे नाव चंद्रमणीदेवी होते.
त्यांचे शालेय शिक्षण एक-दोन इयत्ता इतकेच झाले होते. वयाच्या विसाव्या वर्षी ते कोलकात्यानजीकच्या दक्षिणेश्वर या खेड्यातील कालीमाता मंदिरात पुजारी म्हणून रुजू झाले. तत्पूर्वी त्यांनी कोलकात्यातील केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली होती.
इ.स. १८५९ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. शारदामणी हे त्यांच्या पत्नीचे नाव होते. विवाहासमयी त्या सहा वर्षांच्या होत्या. मात्र या दांपत्याने लौकिकार्थाने वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी शारदामणी जेव्हा दक्षिणेश्वर येथे आल्या, तेव्हा रामकृष्णांनी त्यांची जगन्माता या नात्याने पूजा केली होती. त्या सर्वार्थाने त्यांच्या सहधर्मिणी होत्या. निस्सीम कालीभक्त असलेल्या रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. दक्षिणेश्वर येथे मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असताना गदाधरांची ईश्वरभक्ती अत्युत्कट झाली होती. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात आणि ध्यानधारणा करीत. पुढे त्यांचे रात्र व दिवस यांचे भानही नष्ट होत गेले. तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे. त्यांचा भाचा हृदय त्यांना दोन घास भरवत असे. “आई, दर्शन दे” असा त्यांचा सततचा आक्रोश होता.
एके दिवशी त्यांनी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्ग घेतले. ते खड्ग ते स्वतःच्या मानेवर चालवणार, एवढ्यात त्यांना जगन्मातेने दर्शन दिले. या वेळी त्यांचे वय पंचवीस वर्षे होते. यानंतरचे त्यांचे सर्व दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले.
दीक्षागुरूंप्रमाणेच त्यांचे आणखी दोन गुरू होते. त्यातील भैरवी ब्राह्मणी या संन्यासिनीने त्यांनी तंत्रमार्गाची दीक्षा दिली. इ.स. १८६४ मध्ये तोतापुरी या संन्याशाने त्यांना वेदांताची शिकवण दिली. पुढे इ.स. १८६६ मध्ये त्यांनी गोविंद राय यांच्यामुळे इस्लाम धर्माची साधना केली. तसेच शंभुचरण मल्लिक यांच्यामुळे त्यांचा बायबलशी परिचय झाला. “आपणांस येशू ख्रिस्ताने दर्शन दिले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला”, असे रामकृष्णांनी म्हटले आहे. या सर्व अनुभवांमधून सारे धर्म एका परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत हे त्यांचे मत बनले.
ब्राह्मो समाजाचे नेते केशवचंद्र सेन यांनी रामकृष्णांवर लिहिलेल्या लेखामुळे कोलकात्यातील सुशिक्षितांना रामकृष्णांची प्रथम ओळख झाली. रामकृष्ण भक्तगणांशी तासनतास संवाद साधत असत.
महेंद्रनाथ गुप्त यांनी ‘एम’ या टोपणनावाने ‘श्रीरामकृष्ण कथामृत’ (पाच खंड, १८९७-१९३२) या ग्रंथात ते संवाद संकलित केले आहेत. या ग्रंथाचे इंग्रजी रूपांतर स्वामी निखिलानंदांनी ‘द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण’ (१९४४) या नावाने केले आहे. त्यांच्या शिष्यवर्गातील जगप्रसिद्ध शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंद हे होते. १५ ऑगस्ट १८८६ या दिवशी श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेतली. त्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार नरेंद्र (स्वामी विवेकानंद) आणि त्यांच्या दहा-बारा गुरुबंधूंनी घरादाराचा त्याग केला. ते सर्व जण एका छोट्या जुन्या घरात एकत्र राहू लागले. तोच वराहनगर मठ होय आणि हाच पहिला रामकृष्ण मठ होय. या मठातच त्यांनी विधीपूर्वक संन्यास घेतला. त्यावेळी त्यांनी ‘विविदिशानंद’ हे नाव धारण केले होते.
स्वामी विवेकानंद यांची जगाला आणि भारतालाही ओळख झाली ती त्यांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत केलेल्या भाषणाने. या परिषदेत भारतातून बौद्ध धर्माचे प्रतिनिधी धर्मपाल, जैन धर्माचे वीरचंद गांधी, ब्राह्मो समाजाचे प्रतापचंद्र मजुमदार आणि बी. बी. नगरकर तसेच थिऑसॉफिकल सोसायटीच्या डॉ. ॲनी बेझंट या देखील सहभागी झाल्या होत्या. ११ सप्टेंबर १८९३ रोजी या परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी पहिले पाच मिनिटांचे भाषण केले.
“माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका” या त्यांच्या सहा शब्दांनीच त्यांनी ती परिषद जिंकली. या परिषदेच्या सतरा दिवसांच्या कालावधीत स्वामी विवेकानंद यांनी सहा महत्त्वाची भाषणे दिली. स्वामी विवेकानंद यांनी धर्माबरोबरच शिक्षण, राजकारण, समाजकारण, स्त्रियांची उन्नती आणि जनसामान्यांचा विकास अशा अनेक विषयांवर आपले मूलगामी विचार व्यक्त केले आहेत. जगामध्ये यानंतर श्रमिकांच्या सत्तेचा उदय होणार आहे हे भविष्यदर्शी उद्गार त्यांनी इ.स. १८९८ मध्ये काढले होते. त्यानंतर रशियामध्ये बोल्शेविकांची क्रांति झाली. धर्मग्रंथ आणि कर्मकांड, देवदेवता आणि उपासनामार्ग, तत्त्वज्ञानविचार आणि चर्च, मशिदी किंवा मंदिरे या साऱ्या गोष्टी केवळ दुय्यम आणि साधनरूप आहेत. धर्म संकुचित असता कामा नये. पशुत्वाशी नाते असणाऱ्या तामस प्रवृत्तीच्या माणसापासून ते ईश्वरी अवतार वाटावा अशा महापुरुषापर्यंत सर्वांना आपल्या छायेखाली घेणारा व्यापक विश्वधर्म जगाला दिला पाहिजे या विचारांतून त्यांनी १ मे १८९७ रोजी ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली. ‘रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ या दोन्ही परस्परांशी निगडित अशा संस्था आहेत.
यातील मठ ही प्रामुख्याने संन्याशांची पारंपरिक संस्था आहे तर मिशन ही सामाजिक-धार्मिक कार्य करणारी संस्था आहे. जगभरातील युरोप, रशिया, दक्षिण अमेरिका, जपान, आफ्रिका, कॅनडा तसेच अमेरिकेत आज रामकृष्ण मिशन व मठाची अनेक केंद्रे कार्यरत आहेत. यातीलच एक महत्त्वाचे केंद्र मुंबईतील खार येथे आहे.
रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांनी भारतमातेची सेवा करण्यासाठी जे आदर्श घालून दिले त्या मार्गावर चालणाऱ्या या मठाची स्थापना १८ फेब्रुवारी १९२३ रोजी सांताक्रूझ येथे एका भाड्याच्या घरामध्ये झाली होती. त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे इ.स. १९२५ मध्ये सध्याच्या जागेवर हा मठ स्थानांतरित करण्यात आला. २७ जून १९६५ रोजी या मठाच्या भव्य वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. विविध वृक्षांनी आणि बागबगिच्याने सुहोभित अशा विस्तीर्ण प्रांगणात हा मठ वसलेला आहे. मठाला उंच आवारभिंत आहे. आवाराच्या लोखंडी प्रवेशद्वाराच्या सिमेंटच्या स्तंभांवर दोन्ही बाजूला दोन देवकोष्टके आहेत. त्यात एकीकडे गणेशाची तर दुसरीकडे हनुमानाची छोटी संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. समोरच मठाची राजवाड्यासारखी दिसणारी भव्य दगडी वास्तू उभी आहे.
तिच्या दर्शनी भागाच्या छतावर राजस्थानी शैलीची छाप असलेल्या घुमटाकार छत्र्या आहेत. उंच जगतीवर ही वास्तू उभारलेली आहे. सहा दगडी पायऱ्या चढून मठाच्या अधिष्ठानावर प्रवेश होतो. पुढे मठाचे चौरसाकार रुंद प्रवेशद्वार आहे. येथून मठाच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. मोठमोठ्या खिडक्या, प्रकाशमान वातावरण आणि जमिनीवर सुंदर गालिचे असे या सभामंडपाचे स्वरूप आहे. सभामंडपात रामकृष्ण मठाच्या विविध स्वामींच्या तसबिरी लावलेल्या आहेत. याचबरोबर येथे प्राचीन भारतीय समाज आणि संस्कृतीचा प्रवास रेखाटणारी अनेक चित्रे लावलेली आहेत. सभामंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर आतील भिंतीवर एक मोठे वडाच्या झाडाचे भित्तीचित्र आहे. त्याच्या बाजूला असलेल्या पाटीवर “श्मशानेर बुके आमरा रोपण करेछि पंचवटी ताहारि तलाय मिलाब आमरा जगतेर शतकोटि!” असे लिहिले आहे. याचा अर्थ “स्मशान घाटाच्या मधोमध आम्ही पंचवटीची रोपे लावली आहेत. त्यांच्या सावलीत या जगातील शंभर कोटी लोकांना आम्ही एकत्र आणू” असा होतो.
पुढच्या बाजूला असलेल्या प्रशस्त अशा गर्भगृहात उंच संगमरवरी वेदीवर रामकृष्ण परमहंस यांची मूर्ती विराजमान आहे.
संगमरवरी पाषाणात घडवलेली आणि काषायवस्त्रातील या मूर्तीच्या उजव्या बाजूला शारदामाता यांची तर डावीकडे स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा आहे. साधेपणातील सौंदर्य आणि शांतता जपणाऱ्या या मंदिराच्या शेजारी भक्तनिवास आहे. येथून काही अंतरावर एका मोठ्या दुमजली इमारतीच्या वरच्या भागामध्ये शारदामाता यांचे मंदिर आहे. ३ जुलै २०१२ रोजी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. येथे डावीकडे असलेल्या जिन्याने वर गेल्यानंतर गच्चीवर मध्यभागी मोठा चौथरा बांधलेला आहे. येथे उंच वेदीवर शारदामाता यांची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे शारदामाता यांचे पवित्र अवशेष ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जाते. या गर्भगृहाच्या वर घुमटाकार शिखर आहे. त्यावर आमलक आणि शीर्षस्थानी ओंकार असलेला कलश आहे.
या मंदिरात पहाटे ५ ते सकाळी ११:३० आणि दुपारी ४ ते ८:३० या कालावधीत भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी आरती होते. सकाळची आरती पहाटे पाच वाजता होते. सायंकाळची आरती हिवाळ्यामध्ये संध्याकाळी ६:४५ ते ७:१५ आणि उन्हाळ्यात रात्री ७:१५ ते ७:४५ या कालावधीत होते. येथे एप्रिल ते ऑक्टोबर या काळात रोज सायंकाळी ६ वाजता आणि नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांत सायंकाळी ५:३० वाजता रामनाम संकीर्तन होते. या मठात सर्व जाती, पंथ आणि धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. या मठातर्फे साजरा केला जाणारा दुर्गोत्सव मुंबईतील विशेषकरून बंगाली जनांचे खास आकर्षण आहे. बंगाली परंपरेनुसार येथे दुर्गापूजा केली जाते. या सोहळ्यात हजारो बंगाली आणि महाराष्ट्रीय भाविक सहभागी होतात. या निमित्ताने येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. याशिवाय येथे एकादशी, महाशिवरात्री, रामनवमी इत्यादी उत्सवही धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. रामकृष्ण मठातर्फे मंदिर परिसरात एक भव्य धर्मार्थ रुग्णालय चालवले जाते.