राम मंदिर

राममंदिर मार्ग, गोरेगाव पश्चिम, मुंबई

मुंबईच्या गोरेगाव येथील ऐतिहासिक राममंदिराला सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिर परिसराचा प्राचीन इतिहास राजा बिंबदेवाच्या राजवटीशी जोडलेला आहे. या इतिहासाचे दाखले ‘बिंबाख्यान’ या ग्रंथामध्ये सापडतात. या परिसरातील संशोधनात सापडलेले दहाव्या ते अकराव्या शतकातील शिलाहारकालीन अवशेष या भागाचे ऐतिहासिकत्व सिद्ध करतात. या ऐतिहासिक परिसरात एकोणिसाव्या शतकात हे राममंदिर उभारण्यात आले. मात्र त्याच्या एकंदर ऐतिहासिक महत्त्वामुळे येथील मुख्य रस्त्याला ‘राममंदिर मार्ग’ आणि येथे नव्याने उभारलेल्या रेल्वे स्थानकाला ‘राममंदिर रेल्वे स्थानक’ असे नाव देण्यात आले आहे.

गोरेगाव परिसराचा इतिहास खूप प्राचीन आहे व तो राजा बिंबदेवाच्या राजवटीपर्यंत मागे जातो. पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार संदीप दहिसरकर यांनी २०११ मध्ये राममंदिर परिसरात केलेल्या संशोधनात या भागाचे ऐतिहासिकत्व सिद्ध करणारे अनेक महत्त्वपूर्ण अवशेष शोधून काढले. या संशोधनादरम्यान येथे दहाव्या ते अकराव्या शतकातील दुर्मिळ अशी प्राचीन शिल्पे, शिवलिंग आणि मंदिराचे दगडी खांब आढळून आले. येथील विहिरीच्या साफसफाईमध्ये आणि खोदकामात प्राचीन मंदिराचे दगडी अवशेष आणि मूर्तींचे भाग सापडले. या विहिरीच्या तळाशी एक भग्न शिवशिर म्हणजेच शिवाचे मस्तकही होते. येथील व्यवस्थापनाने अकराव्या किंवा बाराव्या शतकातील एक शिलाहारकालीन स्तंभशीर्ष (स्तंभाचा वरचा भाग) काळजीपूर्वक जतन करून ठेवले आहे. या स्तंभाच्या वरच्या भागाची ठेवण आणि त्याच्या रचनेवरून मूळ मंदिर पूर्णपणे दगडी पायावर उभे राहिलेले एक भव्य आणि जुने शिवमंदिर असावे, असा निष्कर्ष निघतो. हा काळ थेट राजा बिंबदेवाच्या उत्तर कोकणातील आगमनाचा आणि त्याच्या राजवटीचा काळ मानला जातो.

याशिवाय राममंदिर परिसरात सापडलेली गद्धेगळ, म्हणजेच जमिनीची सीमा किंवा राजाज्ञा दर्शवणारा दगडी शिलालेख, हा परिसर प्राचीन काळापासून एक प्रमुख केंद्र असल्याचे दर्शवतो. या ऐतिहासिक वास्तुरचनेच्या पुराव्यांना लिखित ग्रंथांचीही जोड आहे. रघुनाथ पुतळाजी राणे यांनी १८७७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘बिंबाख्यान’ या बखरीत आणि इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी १९२४ मध्ये ‘महिकावतीची बखर’ या नावाने संपादित केलेल्या या ‘बिंबाख्याना’ची प्रत, या दोन्ही ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजा बिंबदेव यांच्या काळातील मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक रचनेचे सविस्तर वर्णन आढळते. त्यानुसार, गोरेगाव आणि त्याच्या आसपासचा भाग ऐतिहासिक नोंदींमध्ये ‘पहाडी’ किंवा ‘गोरेगाव’ या नावाने ओळखला जात होता. हा भाग तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात राजा बिंबदेवाच्या राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता. राजा बिंबदेवाने महिकावती येथे आपली राजधानी स्थापन केल्यानंतर या संपूर्ण परिसराचे प्रशासकीय विभाजन केले. त्याने विविध समाजातील लोकांना आणि ब्राह्मणांना येथे आणून वसवले. राजा बिंबदेवाच्या काळात या भागात उभारली गेलेली मंदिरे आणि राजाश्रय मिळालेली देवस्थाने यांचा समावेश या परिसरातील धार्मिक केंद्रांमध्ये होतो. महिकावतीच्या बखरीतील साष्टी प्रांतातील गावांचे महसुली वर्गीकरण आणि मंदिरांना दिलेल्या जमिनींच्या दानांचे वर्णन यांचे थेट पुरावे या अवशेषांच्या रूपाने समोर येतात. राजा बिंबदेवाने जेव्हा या बेटांवर आपली सत्ता स्थापन केली, तेव्हा त्याने आधीपासून चालत आलेल्या या सामाजिक आणि धार्मिक रचनांचा स्वीकार करून त्यांना राजाश्रय दिला. ‘बिंबाख्यान’ आणि ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथांमध्ये या राममंदिराचा उल्लेख नाही. मात्र त्यातील अन्य लिखित नोंदी आणि राममंदिर परिसरात प्रत्यक्ष सापडलेले वास्तुरचनेचे जुने अवशेष मिळून राजा बिंब आणि गोरेगाव यांच्यातील ऐतिहासिक संबंध सिद्ध होतात, असे इतिहासकारांचे मत आहे.

अशा या ऐतिहासिक भूमीत या राममंदिराची स्थापना सन १८३५ मध्ये झाली. त्या काळी चारही बाजूंना शेतजमीन, माळरान आणि दाट झाडी असलेला हा भाग अत्यंत शांत होता. स्थानिक शेतकरी आणि कामकरी वर्गाला ईश्वरोपासनेसाठी एक हक्काचे ठिकाण मिळावे म्हणून या मंदिराची पायाभरणी अत्यंत साध्या स्वरूपात करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात हे मंदिर केवळ एक लहान कौलारू छप्पर आणि साध्या भिंती असलेल्या खोलीसारखे होते. या खोलीत प्रभू श्रीरामाची पूजा केली जात असे. मुंबईच्या उत्तरेकडील विस्तारामुळे या मंदिराचा संपर्क व्यापक लोकसंख्येशी आला आणि त्याचे धार्मिक महत्त्वही वाढत गेले. काळाच्या ओघात मूळ मंदिराची वास्तू जीर्ण झाली आणि छताची दुरवस्था झाली. त्यामुळे एका मोठ्या पुनर्बांधणीची आवश्यकता भासू लागली.

ही निकड ओळखून गोरेगावातील प्रसिद्ध आणि तत्कालीन नामांकित कंत्राटदार भिकोबा लक्ष्मण गोरेगावकर आणि हरिश्चंद्र जगन्नाथ गोरेगावकर यांनी सन १८९७ मध्ये या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार केला. गोरेगावकर बंधू केवळ व्यावसायिक कंत्राटदार नव्हते, तर ते सामाजिक आणि धार्मिक कार्यातही नेहमी अग्रेसर होते. भिकोबा गोरेगावकर यांनी अत्यंत कुशल कारागिरांची मदत घेतली. मुंबई आणि परिसरात त्यावेळी गाठीच्या प्लेगच्या (ग्रंथिक सन्नीपात) साथीने थैमान घातले होते. वस्त्यांच्या वस्त्या उजाड होत होत्या. अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. अशा त्या कसोटीच्या काळात गोरेगावकर बंधूंनी हे मंदिर उभारले. त्यांनी जुन्या गर्भगृहातील श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या ऐतिहासिक मूर्ती अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि सुरक्षितपणे नवीन बांधलेल्या वास्तूत स्थलांतरित केल्या. या वास्तूने पुढील सव्वाशेहून अधिक वर्षे मुंबईच्या बदलत्या हवामानातही आपले अस्तित्व भक्कमपणे टिकवून ठेवले आहे.

या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व केवळ धार्मिक किंवा पुरातत्वीय क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाही, तर त्याने मुंबईच्या भौगोलिक आणि प्रशासकीय रचनेवरही आपली छाप उमटवली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या नगररचना नकाशांमध्ये आणि महसूल विभागाच्या दस्तऐवाजांमध्ये या मंदिराच्या समोरील रस्त्याचा उल्लेख ‘राममंदिर मार्ग’ असाच करण्यात आला होता. हा रस्ता गोरेगाव आणि ओशिवरा या दोन महत्त्वाच्या भागांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी आणि गोरेगाव या दोन स्थानकांदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एका नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्याचे ठरवले तेव्हा स्थानिक रहिवासी, इतिहासप्रेमी आणि लोकप्रतिनिधींनी या ऐतिहासिक मंदिराचे नाव स्थानकाला देण्याची मागणी केली. त्यामुळे २२ डिसेंबर २०१६ रोजी जेव्हा या नवीन स्थानकाचे उद्घाटन झाले, तेव्हा या स्थानकाचे नाव ‘राममंदिर रेल्वे स्थानक’ असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.

एका बाजूला उंच इमारती व एका बाजूला रेल्वे स्थानक अशा परिसरात मध्यभागी हे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात अनेक प्राचीन वृक्ष असल्यामुळे हा परिसर हिरवागार व शांत भासतो. या प्रांगणात आधी रामेश्वर महादेवाचे मंदिर व शेजारी राममंदिर आहे. या दोन्ही मंदिरांच्या समोर एक प्राचीन दीपस्तंभ आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या दोन्ही मंदिरांची रचना आहे. रामेश्वर मंदिराच्या दर्शनी भागात दोन प्राचीन स्तंभ आहेत. त्यापुढे मोकळ्या मंडपात भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे. मुख्य मंदिरासमोर अर्धखुला सभामंडप आहे. या मंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीमध्ये दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांत डावीकडे गणेशाची पाषाणमूर्ती व उजवीकडे सूर्यदेव कोरलेले आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी रामेश्वर महादेवाची प्राचीन पिंड आहे. या पिंडीच्या मागील देवकोष्टकात पार्वती देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. रामेश्वर महादेव मंदिराला लागूनच राममंदिर आहे. या मंदिराची रचनाही रामेश्वर महादेव मंदिराप्रमाणे आहे. मात्र या मंदिराच्या समोरील बाजूला हनुमंताचे मंदिर आहे. या मंदिरात हनुमंताची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहात वज्रपीठावर राम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या तिन्ही मूर्तींच्या मस्तकांवर मुकुट आहेत. दोन्ही मंदिरांना घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहेत.

सन १८९७ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून येथे रामनवमीचा उत्सव अत्यंत थाटामाटात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नऊ दिवसांच्या काळात मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी विशेष पूजा, अभिषेक आणि आरती केली जाते. स्थानिक आणि नामवंत कीर्तनकार तसेच भजनी मंडळे मंदिरात येऊन आपली सेवा रुजू करतात. रामनवमीच्या मुख्य दिवशी दुपारी बरोबर १२ वाजता श्रीरामाचा जन्मोत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. उत्सवाच्या काळात मंदिरात महाप्रसादाचे वाटप केले जाते. दररोज सकाळी साडेपाच ते साडेदहा व सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • राममंदिर रेल्वे स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
  • बोरिवली एस.टी. बसस्थानकापासून १३ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून येथे येण्यासाठी बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२-२८७१ ३१४१

राम मंदिर

राम मंदिर रोड, गोरेगांव वेस्ट, मुंबई

Back To Home