मुंबईतील शीव–कोळीवाडा परिसरातील गुरू तेगबहादूर नगर म्हणजेच जीटीबी नगर हा भाग ‘छोटा पंजाब’ म्हणून ओळखला जातो. या जीटीबी नगरमध्ये गीता भवन हरि मंदिर हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर येथे हिंदू निर्वासित स्थायिक झाले. त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात या मंदिराला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. या मंदिराची स्थापना ‘सनातन धर्म सभा’ या संस्थेतर्फे करण्यात आली होती. जीटीबी नगरच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असलेले हे मंदिर वैष्णव, शैव आणि शाक्त देवतांना समर्पित आहे. येथील रामनवमी, जन्माष्टमी आणि नवरात्र हे उत्सव जीटीबी नगरमधील महत्त्वाचे उत्सव मानले जातात.
या मंदिराचा इतिहास देशाच्या फाळणीशी निगडित आहे. सन १९४७ मध्ये झालेल्या फाळणीनंतर पाकिस्तानातून असंख्य हिंदू आणि शीख निर्वासित भारतात आले. त्यांमधील काही कुटुंबांनी मुंबईचा रस्ता धरला. सिंध प्रांतातून आलेल्या निर्वासितांचे पुनर्वसन खासकरून कल्याण जवळ असलेल्या उल्हासनगर परिसरात करण्यात आले. विशेषतः शीख आणि पंजाबी हिंदूंची व्यवस्था शीव-कोळीवाडा परिसरात करण्यात आली. या ठिकाणी प्रारंभी तत्कालीन सरकारने येथील लष्कराच्या जुन्या बराकींमध्ये या विस्थापितांची तात्पुरती निवासव्यवस्था केली होती. या ठिकाणाला सैनिकी छावणी वा कोळीवाडा कँप असे म्हटले जाई.
कालांतराने येथे पुनर्वसन वसाहती स्थापन करण्यात आल्या. पुढे या भागाला शीखांचे नववे गुरू तेगबहादूर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव देण्यात आले.
या नव्या भूमीत जगण्याचा नव्याने संघर्ष सुरू असताना या समाजाला धार्मिक आणि सांस्कृतिक आधाराची आवश्यकता जाणवत होती. त्यातूनच काही निर्वासित कुटुंबांनी आपल्यासोबत वाचवून आणलेल्या देवमूर्ती एकत्र केल्या. त्यांनी एक साधे प्रार्थनास्थळ उभारून तेथे १३ एप्रिल १९५० रोजी या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. याच सुमारास येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन ‘सनातन धर्म सभा’ या संस्थेची स्थापना केली. पुढे सन १९५३ मध्ये भारत सरकारकडून मंदिरासाठी जमीन उपलब्ध झाली. निर्वासितांकडून मंदिरासाठी निधी जमा करण्यात आला. अनेकांनी आर्थिक योगदानाबरोबरच शारीरिक श्रमदानही दिले. यातून मंदिराच्या वास्तूचा विस्तार करण्यात आला. यानंतर सन १९८० मध्ये ‘सनातन धर्म सभेने’ मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, राधा-कृष्ण आणि शंकर-पार्वती यांच्या संगमरवरी सुबक मूर्तींची स्थापना केली. यानंतर वीस वर्षांनी म्हणजे सन २००० मध्ये झालेल्या नूतनीकरणानंतर हरि मंदिराला सध्याचे भव्य स्वरूप प्राप्त झाले.
एका तीन मजली भव्य इमारतीमध्ये हे मंदिर वसले आहे. सभामंडप आणि त्यात विविध देवतांची गर्भगृहे असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाला रुंद असे तीन खणी प्रवेशद्वार आहे. येथील स्तंभांवर कोरीव नक्षीकाम आहे. या स्तंभांच्या शीर्षभागी देवसेविकांच्या मूर्ती आणि मकरतोरण आहे. सभामंडप अत्यंत प्रशस्त आहे. या सभामंडपात संगमरवरी फरसबंदी आहे. त्याच्या मध्यभागी मोठा नक्षीदार गालिचा अंथरलेला आहे. एका बाजूला कीर्तन-प्रवचनासाठीचे व्यासपीठ आहे. सभामंडपाच्या समोरच एक मुख्य आणि दोन उप अशी एकूण तीन गर्भगृहे आहेत. या गर्भगृहांच्या समोर मकरतोरण असलेले स्तंभ आहेत. या रचनेमुळे येथे अंतराळाचा आभास निर्माण होतो. येथील संगमरवरी देवळ्यांमध्ये हनुमान आणि गणेश यांच्या संगमरवरी मूर्ती विराजमान आहेत. सभामंडपातून गर्भगृहांना प्रदक्षिणा मार्ग आहे. या गर्भगृहांच्या चौकटी बिलोरी काचांच्या नक्षीने सजवलेल्या आहेत. त्यांच्या द्वारचौकटीदेखील कोरीव नक्षीकामाने सुशोभित केलेल्या आहेत.
या द्वारचौकटींवर द्वारपाल आणि सेविकांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. चौकटीच्या मंडारकावर अर्धचंद्रशिला आणि कीर्तिमुखे आहेत. मधल्या मुख्य गर्भगृहात उंच संगमरवरी वेदीवर श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि राधा-कृष्ण यांच्या संगमरवरी मूर्ती विराजमान आहेत. या सर्व मूर्ती वस्त्रालंकारांनी शृंगारलेल्या आहेत. श्रीराम मूर्तीच्या समोरच्या भागात हनुमानाची मूर्तीही विराजमान आहे. राधा-कृष्ण मूर्तीच्या समोरच्या बाजूस गणेश आणि सरस्वती यांच्या पितळी मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. या मुख्य गर्भगृहालगतच्या डावीकडील गर्भगृहामध्ये शंकर आणि पार्वती यांची मूर्ती विराजमान आहे. उजवीकडील गर्भगृहात सिंहारूढ अष्टभुजा दुर्गामाता आणि संतोषी माता यांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. या गर्भगृहासमोर २३ सप्टेंबर २००६ रोजी स्थापन केलेली एक अखंड ज्योत तेवत आहे. जम्मूतील ‘वैष्णोमाता’ मंदिरातून ही ज्योत आणण्यात आली होती. संगमरवरी पाषाणात बांधलेल्या या गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. ही शिल्पपट्टी या मंदिराचे एक खास आकर्षण मानले जाते. याचप्रमाणे या बाह्यभिंतींवरील देवकोष्टकांमध्ये गंगा, यमुना, सरस्वती, गायत्री आणि भारतमाता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.
मंदिरातील नित्य उपासना पद्धती उत्तर भारतीय सनातन धर्म परंपरेनुसार आहे. या मंदिरात पहाटे ५ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९:१५ या कालावधीत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. या मंदिरात मंगळवार, शनिवार आणि रविवारी दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. मंदिरात पहाटे ५:३० वाजता मंगल आरती होते. सकाळी ७ वाजता सर्व देवतांचा अभिषेक आणि मुख्य शृंगार आरती केली जाते. संध्याकाळी ऋतुमानानुसार साधारण ६:३० ते ७:१५ च्या सुमारास मंदिरात महाआरती होते. या आरतीमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. येथे रात्री ९ वाजता शयन आरती होते.
मंदिरात अनेक प्रमुख सण उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये काही उत्सवांना येथे विशेष महत्त्व आहे. रामनवमी हा मंदिरातील सर्वांत मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. या दिवशी मंदिरात विशेष पूजाविधी, अखंड रामनाम आणि सामुदायिक भोजनाचे आयोजन केले जाते. मंदिरात राधा-कृष्ण विराजमान असल्यामुळे जन्माष्टमीचा सणही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. येथे जन्माष्टमीपूर्वी ‘श्रीमद्भागवत कथा सप्ताह’ आयोजित केला जातो. परिसरातील अनेक कुटुंबे या सप्ताहात सहभागी होतात. नवरात्र सोहळ्यात येथे नऊ दिवस देवीची आराधना, विशेष पूजाविधी आणि ‘माता की चौकी’ असे कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध भजनमंडळे आणि कलाकार या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. हनुमान जयंतीलाही येथे मोठ्या प्रमाणावर भक्त येतात. याशिवाय महाशिवरात्री, गणेशोत्सव, दिवाळी, होळी, गुरुपौर्णिमा यांसारखे इतर अनेक धार्मिक सण आणि उत्सव येथे नियमितपणे साजरे केले जातात.