आदि शंकराचार्य भगवद्पाद यांनी भारताच्या चारही दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि श्रृंगेरी असे चार मठ स्थापन केले. त्यांना श्रद्धावान हिंदूंसाठी दक्षिणामूर्ती किंवा खुद्द शिवस्वरूप मानले जाते. याशिवाय त्यांनी कांचीच्या कामकोटीपीठाचीही स्थापना केली. मुंबईतील माटुंगा येथे कामकोटीपीठाशी संलग्न असलेला शंकर मठ आहे, तर चेंबूर या उपनगरात श्रृंगेरीच्या दक्षिणाम्नाय शारदा पीठाची शाखा आहे. देवी शारदामाता, आदि शंकर आणि महागणपती यांना हे मठ-मंदिर समर्पित आहे. हा मंदिर-मठ मुंबईतील असंख्य सनातनी भाविकांसाठी आस्थेचे केंद्र आहे आणि तो सनातन वैदिक धर्मसंस्कृतीची ध्वजा फडकत ठेवतो.
आदि शंकराचार्य हे थोर तत्त्वज्ञ होते. त्यांनी सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा अशा ‘आस्तिक’ आणि बौद्ध, जैन, लोकायत अशा ‘नास्तिक’ दर्शनांचे पद्धतशीर खंडन करून केवलाद्वैत तत्त्वज्ञानाची भक्कम पायावर मांडणी केली. हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य आणि कौमार (कार्तिकेयांची उपासना करणारा पंथ) या सहा हिंदू पंथाच्या अनुयायांना एकत्रित करण्याचे लोकसंग्राहक कार्य केल्यामुळे ‘षण्मठस्थापकाचार्य’ म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
त्यांनी आदित्य, अंबिका, विष्णू, गणनाथ आणि महेश्वर या तत्कालीन पाच लोकप्रिय देवतांची एकत्र पूजा करण्याचा समन्वयी मार्ग पंचायतन पूजेच्या माध्यमातून दाखवून दिला. त्यांच्या कार्यकाळाबद्दल अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाही, मात्र साधारणतः इ.स. ७८८ ते ८२० हा त्यांचा काळ मानला जातो.
केवलाद्वैत म्हणजे एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य, जीवात्मा त्याहून भिन्न नाही आणि इतर सर्व विश्व मिथ्या आहे या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक आणि “पूर्वज वेडा होता म्हणून आपणही वेडे असायला पाहिजे असा काही नियम नाही” (नहि पूर्वजो मूढ आसीदित्यात्मनि मूढेन भवितव्यमिति किंचिदस्ति प्रमाणम् – ब्रह्मसूत्र २.१.११) अशा स्पष्ट शब्दांत धर्मसुधारणावाद प्रतिपादन करणारे ते युगकर्ते वेदान्ती होते. आद्य शंकराचार्य यांचा जन्म केरळातील अलवाये शहरानजीकच्या कलटी नामक गावात झाला होता. त्यांचे कुळ कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मणांचे होते. त्यांचा जन्म, कार्यकाळ आदी बाबी विवाद्य असल्याने त्यांचे ग्रंथ हेच त्यांचे खरे जीवनचरित्र मानले जाते. ‘अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद। षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात।’ या श्लोकात त्यांचे चरित्र सांगितले जाते. याचा अर्थ असा आहे की “त्यांनी आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन,
बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य आणि ३२ व्या वर्षी महाप्रस्थान केले.” हिंदू धर्मात ‘श्रीमद्भगवद्गीता’, ‘उपनिषदे’ आणि ‘ब्रह्मसूत्र’ यांना प्रस्थानत्रयी असे म्हणतात. आपल्या ३२ वर्षांच्या जीवनकालात आचार्यांनी प्रस्थानत्रयीवरील भाष्यांखेरीज सुमारे ४०० स्फुट ग्रंथ लिहिले. ‘दक्षिणामूर्ती’, ‘हरिमीडे’, ‘आनंदलहरी’ आणि ‘सौंदर्यलहरी’ ही त्यांनी रचलेली स्तोत्रे विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्या तत्त्वज्ञानाची परंपरा अखंड चालू राहावी यासाठी त्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि श्रृंगेरी असे भारताच्या चारही दिशांना मठ स्थापन केले. बाराशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या मठाच्या गादीवर इ.स. १३६१ मध्ये विद्यारण्य स्वामी आरूढ झाले आणि या मठातील शारदा मंदिर त्यांनीच बांधले. हरिहर आणि बुक्क हे दोन योद्धे बंधू विद्यारण्य स्वामींचे शिष्य होते, त्यांना विजयनगरचे साम्राज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.
श्रृंगेरी हे कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यात तुंगा (तुंगभद्रेचा शीर्षप्रवाह) नदीकाठी वसले आहे. पौराणिक आख्यायिकांनुसार विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग यांची ही तपोभूमी होती. त्यांच्या नावावरून या ठिकाणाला श्रृंगेरी हे नाव प्राप्त झाले. दक्षिण हिंदुस्थानात भ्रमंती करत असताना आदि शंकराचार्य श्रृंगेरी येथे आले होते. त्यावेळी येथील निसर्गसौंदर्याने ते आकृष्ट झाले. एका आख्यायिकेनुसार या ठिकाणी त्यांना एक अद्भूत दृश्य पाहावयास मिळाले. ते म्हणजे एक बेडूक येथे प्रसवपीडेने संत्रस्त असताना, त्याला दुपारचे रणरणते ऊन लागू नये यासाठी सावलीसाठी त्याच्यावर एका नागाने आपला फणा उभारला होता. साप आणि बेडूक या नैसर्गिक शत्रूंमधील ही निर्वैर भावना पाहून आदि शंकराचार्य प्रभावित झाले आणि त्यांनी येथे मठस्थापनेचा निर्णय घेतला. हा शंकराचार्यांनी स्थापन केलेला पहिला मठ होय.
बाराशे वर्षांची परंपरा असलेल्या या मठाच्या गादीवर सन १३६१ मध्ये आरूढ झालेले जगद्गुरू विद्यारण्य स्वामी यांचे भारताच्या राजकीय इतिहासामध्ये मोठे योगदान आहे. हरिहर आणि बुक्क हे दोन सरदार बंधू त्यांचे शिष्य होते.
त्यांना विजयनगरचे साम्राज्य स्थापन करण्याची प्रेरणा विद्यारण्य स्वामी यांनीच दिली होती. विजयनगरचे सम्राट हरिहर यांच्याप्रमाणेच पुढे सत्तेवर आलेल्या अनेक राजांनी या मठाला देणग्या, नजराणे आणि अग्रहार देऊन आपला आदर व्यक्त केला आहे. यात दुसरे बाजीराव पेशवे, म्हैसूरचा राजा हैदर अली, त्याचा मुलगा टिपू सुलतान, तसेच हैदराबादचा निझाम-उल-मुल्क या शासकांचा समावेश होता. श्रृंगेरी मठाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या म्हैसूर युद्धात (इ.स. १७९०-१७९२) पेशव्यांचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने म्हणजेच पेंढाऱ्यांनी श्रृंगेरी मठाची लूट केली. या हल्ल्यातील हानीविषयीची एक नोंद रघुनाथराव पेशवे यांचे पुत्र त्र्यंबकराव यांनी मिरज येथील त्याच्या काकांना लिहिलेल्या पत्रात आहे. त्यात असे म्हटले आहे की “सैन्य तुंगा नदी ओलांडण्याआधीच लामाण आणि पिंडारी शिमोग्याला पोहोचले. त्यांनी श्रृंगेरी येथील स्वामींच्या मठाला लुटले. स्वामींचा दंड आणि कमंडलू घेतले गेले. काहीच उरले नाही. महिलांवर अत्याचार झाले. अनेक महिलांनी आत्महत्या केली. स्वामींची मूर्ती, शिवलिंग इत्यादी लुटले गेले. हत्तींचे तबेले रिकामे केले गेले आणि लामाणांनी ताब्यात घेतले. स्वामींनी उपवास करून तपस्या केली. पाच दिवस उपवास करून जीवनत्याग केला.” या घटनेनंतर टिपू सुलतानने मठाची फेरउभारणी करण्यासाठी मोठी मदत केली. तसेच टिपूने अनेकदा मठाच्या आचार्यांचा आशीर्वाद घेतल्याचेही या संकेतस्थळावर म्हटले आहे. याच मठाशी चेंबूर येथील श्रृंगेरी शंकर मठ म्हणजेच ‘श्री श्रृंगेरी शारदा विद्या केंद्र’ संलग्न आहे.
माटुंगा येथील शंकर मठाच्या स्थापनेनंतर ५३ वर्षांनी येथे या मठ-मंदिराची स्थापना झाली. मठातील शिलालेखानुसार श्रृंगेरी मठाचे जगद्गुरू भारतीतीर्थ स्वामी यांच्या हस्ते ८ मे १९९२ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० या काळात वैदिक परंपरेनुसार या मठ-मंदिरात महागणपती, आदि शंकर आणि शारदांबा यांच्या पंचधातूंच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेपूर्वी येथे जलधिवास आणि धान्यधिवास अशी अनेक अनुष्ठाने करण्यात आली होती.
मंदिराच्या कुंभाभिषेकानंतर शंकराचार्यांच्या हस्ते मंदिरावरील सुवर्णकलशाची पूजा केली गेली. त्यानंतर हेलिकॉप्टरने या मंदिरावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. मठ-मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्षी जगद्गुरूंनी येथे ‘चातुर्मास्य व्रता’चे पालन केले होते.
दक्षिण भारतीय धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य परंपरेचा मुंबईतील एक महत्त्वाचा वारसा असलेल्या या मठ-मंदिराची वास्तू उंच आणि सममितीय रचनेतील आहे. या वास्तूच्या रचनेवर द्रविड स्थापत्य तसेच कर्नाटक व तमिळनाडूतील मठ स्थापत्य शैलीचा मोठा प्रभाव आहे. अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुख्य प्रवेशद्वार, सभामंडप आणि गर्भगृह ही तीनही केंद्रे एका सरळ रेषेत यावीत हा भारतीय मंदिर स्थापत्यातील एक महत्त्वाचा नियम येथे पाळलेला आहे. उंच जगतीवर अधिष्ठित असलेल्या या मंदिरास सात पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवर गजपृष्ठाकाराचे पत्र्याचे छत आहे. येथून सोनेरी पुष्परचनेने सुशोभित केलेले छत असलेल्या अर्धमंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपाच्या प्रवेशकमानीच्या वर गुरुपरंपरेतील जगद्गुरूंची चित्रमाला आहे. या चित्रमालेत आदि शंकराचार्यांपासून श्रृंगेरी पीठाच्या आजच्या जगद्गुरूंपर्यंतची अखंड परंपरा दर्शविण्यात आली आहे.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारास विशाल पितळी दरवाजे आहेत. त्याच्या वरच्या भागात पितळी पत्र्यावर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचा सभामंडप तीन मजली आणि प्रशस्त आहे. दुसऱ्या मजल्यावर बाल्कनीसारखी रचना आहे. त्याच्या भिंतींवर मठाशी संबंधित असलेल्या विविध महापुरूषांची आणि जगद्गुरूंची चित्रे-छायाचित्रे लावलेली आहेत. सभामंडपात नैसर्गिक प्रकाश यावा यासाठी वरच्या भागात काचांची तावदाने लावलेली आहेत. चकचकीत संगमरवरी फरशी बसवलेल्या या सभामंडपाच्या समोरील भागात मध्यभागी मंदिराचे मुख्य गर्भगृह आहे.
सभागृहाच्या भूतलाहून चार पायऱ्या उंच असलेल्या अधिष्ठानावर हे गर्भगृह स्थित आहे. त्याच्या प्रवेशद्वारास कोरीव नक्षीकाम केलेली सोनेरी द्वारचौकट आहे. या गर्भगृहात उंच वेदीवर ज्ञान, विद्या, वाणी, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांची अधिष्ठात्री मानण्यात येणाऱ्या देवी शारदांबेची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. आदि शंकराचार्यांनी श्रृंगेरी येथे शारदेची प्रतिष्ठापना करून ज्ञानसंप्रदायास धार्मिक अधिष्ठान दिले होते. त्याच परंपरेचे प्रतिबिंब येथेही दिसते. या मुख्य गर्भगृहाच्या डाव्या बाजूस असलेल्या उपगर्भगृहात महागणपतीची मूर्ती, तर उजवीकडील उपगर्भगृहात आदि शंकराचार्यांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
या मंदिरात सकाळी ६ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८.३० या कालावधीत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात श्रृंगेरी मठाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रम, होम, अनुष्ठाने, पूजा आदी विधी केले जातात. येथे देवीसमोर नित्यनेमाने श्रीचक्रपूजा, सहस्रनाम अर्चना आदी विधी होतात. याचप्रमाणे येथे शंकराचार्य जयंती, गणेश जयंती, नवरात्र आदी सण अत्यंत धार्मिक वातावरणात व उत्साहाने साजरे केले जातात. वैदिक परंपरेचे जतन करणाऱ्या या मंदिरात रोज सकाळी आणि सायंकाळी परिसरातील भाविकांची गर्दी असते.