मुंबईच्या पूर्व नगरातील चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी परिसरात काली मातेचे मंदिर वसले आहे. हे मंदिर मुंबईतील चेंबूर, मानखुर्द परिसरात स्थायिक झालेल्या बंगाली नागरिकांच्या आस्थेचे एक प्रमुख केंद्र आहे. बंगालच्या संस्कृती, कला आणि आध्यात्मिक जीवनात काली मातेच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चेंबूरमधील या काली मातेच्या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजा साजरी केली जाते. हा या परिसरातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. या मंदिराच्या समोरच प्रभू श्रीरामांना समर्पित असलेले मंदिर आहे.
हिंदू पुराणांनुसार, काली, तारा, त्रिपुरसुंदरी (षोडशी), भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दशमहाविद्या मानल्या जातात. यामध्ये कालीमातेला पहिले स्थान आहे. हिंदू धर्मात ही देवी काळ, प्रलय आणि मृत्यूची देवी मानली जाते. शाक्त आणि तांत्रिक परंपरेत या देवीची प्रामुख्याने उपासना केली जाते. प्राचीन ग्रंथ आणि पुराणांमध्ये देवी कालीच्या रौद्र आणि कल्याणकारी रूपाचे अनेक उल्लेख आढळतात. ‘ब्राह्मण’ ग्रंथांमध्ये ‘दीर्घजिव्ही’ नामक देवीचा उल्लेख आहे. ‘मुंडक उपनिषदा’त यज्ञाच्या सात जिव्हा असलेल्या स्वरूपात कालीचे वर्णन केलेले आहे. ‘कृष्ण यजुर्वेदा’च्या कठ शाखेशी संबंधित असलेल्या ‘काठक गृह्यसूत्रा’त कालीस प्रामुख्याने विवाहविधीत पूजली जाणारी देवता म्हटलेले आहे.
‘महाभारता’च्या सौप्तिक पर्वात काली ही कृष्णवर्णीय, रक्तरंजित डोळे आणि मुख असलेली व हाती पाश धारण केलेली दाखवलेली आहे.
या ग्रंथाच्या आधारे, मूळ प्रकृती आदिमाया भगवती महालक्ष्मीने तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून महाकाली आणि महासरस्वती ही दोन रूपे निर्माण केली. महाकाली ही जशी संहारिणी आहे, तशीच ती विश्वजननी आणि पोषिणीही आहे, असे मानले जाते. ‘कालिका पुराण’ आणि ‘महानिर्वाण तंत्र’ यांसारख्या तंत्रग्रंथांमध्ये काली पूजेचे विधी, तिचे ध्यान आणि तिचे आहात्मिक महत्त्व स्पष्ट केले आहे. काली मातेची श्रीकाली, महाकाली, भद्रकाली, श्मशानकाली, चामुंडाकाली, सिद्धीकाली, गुह्यकाली आणि दक्षिणाकाली अशी अष्टरूपे आहेत. शाक्त आणि तंत्रमार्ग या जादूटोणा व मंत्र–तंत्रास महत्त्व असलेल्या वाममार्गी पंथातही कालीपूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बंगालची या विद्यांसाठी विशेष ख्याती असल्याचे सांगितले जाते.
मध्ययुगीन काळात बंगालमध्ये शाक्त आणि तांत्रिक परंपरांचा मोठा प्रसार झाला. अठराव्या शतकात पश्चिम बंगालमधील नाडियाचे जमीनदार असलेले राजा कृष्णचंद्र रॉय (इ.स. १७१० ते १७८२) हे शक्ती परंपरेचे पाईक होते. राजा कृष्णचंद्र रॉय हे कला, साहित्य आणि संस्कृतीचे आश्रयदाते होते.
त्यांच्या कारकीर्दीत बंगालमधील सांस्कृतिक क्षेत्रात एक उल्लेखनीय पुनरुज्जीवन घडून आले. ब्राह्मणांना उदार आश्रय देण्यासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या कृष्णचंद्र यांनी आपल्या जहागिरीच्या क्षेत्रात वर्णव्यवस्था आणि जातिनियमांची काटेकोर अंमलबजावणी केली होती. त्यांनी अनेक मंदिरे बांधली आणि यज्ञांचे आयोजन केले. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून राजकीय जागृती आणि धार्मिक पुनरुत्थानास हातभार लावला, त्याच धर्तीवर राजा कृष्णचंद्र रॉय यांनीही बंगालमध्ये कालीपूजेला व्यापक सामूहिक स्वरूप दिले. याच बरोबर रामप्रसाद सेन आणि रामकृष्ण परमहंस यांसारख्या संतांनी काली मातेचे रूप बंगाली जनमानसात अत्यंत साध्या आणि घरगुती स्वरूपात रुजवले. यामुळे आजही बंगाली समाजात प्रत्येक शुभ कार्यात आणि वार्षिक उत्सवात काली पूजेला सर्वोच्च स्थान दिले जाते. या काली मातेच्या उपासनेतून प्रेरणा घेऊन बंगालमध्ये श्यामा संगीत हा संगीताचा प्रकार रूढ झालेला आहे. ब्रिटिश वसाहतकाळात बंगाली क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देणारी काली ही आधुनिक काळात स्त्रीअधिकाराच्या चळवळीचेही प्रेरणास्थान बनलेली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी काली मातेची मंदिरे आहेत. ‘काली बारी’ म्हणून ती ओळखली जातात. त्यातीलच एक प्रसिद्ध मंदिर चेंबूर येथे आहे.
चेंबूरच्या गजबजलेल्या आर. सी. मार्गावर हे मंदिर वसलेले आहे. मंदिरासमोर मोठे मोकळे प्रांगण आहे. त्यात सिमेंटचे छत असलेला मोठा सभामंडप उभारण्यात आलेला आहे. त्यातील उजवीकडील भिंतीवर स्वामी विवेकानंद, भगवान शंकर, रामकृष्ण परमहंस, तसेच कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिर आणि स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या बेलूर मठाच्या उठावशिल्प प्रकारच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. या पुढे मंदिराचा दोन बाजूंनी खुला असलेला आणि संगमरवरी फरसबंदी केलेला उपसभामंडप आहे. त्याच्या भिंतीवरही अशाच प्रकारच्या ब्रह्मा-विष्णू-महेश, तसेच रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा आहेत. मंदिराच्या गर्भगृहात उंच संगमरवरी वेदीवर संगमरवरी स्तंभ आणि घुमटाकार शिखर असलेल्या मखरामध्ये कालीमातेची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. काली मातेच्या मूर्ती या नेहमी निळ्या वा काळ्या रंगात असतात. येथे ती कृष्णवर्णी आणि चतुर्भुज स्वरूपात आहे. तिचा वरचा उजवा हात अभयमुद्रेत आहे आणि खालचा हात वरदमुद्रेत आहे.
वरच्या डाव्या हातात तिने खड्ग धारण केले आहे, तर खालच्या डाव्या हातात नरमुंड आहे. तिने गळ्यात नरमुंडमाला धारण केलेली आहे. प्राचीन मूर्तीशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे येथे तिने जिव्हा बाहेर काढलेली आहे. एरवी रक्तरंजित असलेल्या जिव्हेस येथे सोनेरी रंग दिलेला आहे. या मूर्तीस साडी नेसवलेली असून तिला मण्यांच्या माळा, मोत्यांचे हार, बाजूबंद, बांगड्या यांनी शृंगारलेले आहे. तिच्या मस्तकी चमचमत्या मण्यांचा मोठा मुकुट आहे. याच बरोबर येथे श्रीकृष्ण, दुर्गामाता यांच्याही मूर्ती आहेत. मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूस कालीभक्त रामकृष्ण परमहंस आणि उजव्या बाजूस रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदा माता यांची छायाचित्रे आहेत.
काली मातेच्या या मंदिराच्या बाजूलाच शंकराचे छोटेसे मंदिर आहे. तेथे संगमरवरी चौथऱ्यावर पाषाणाची नंदी आणि कूर्ममूर्ती आहे. गर्भगृहात भूतलावर संगमरवरी शाळुंकेच्या आकारामध्ये पाषाणाची शिवपिंड विराजमान आहे. या पिंडीवर नागराजाने फण्याचे छत्र धरले आहे आणि त्यावर पितळी गलंतिका आहे. शिवपिंडीनजीक त्रिशूळ आहे. गर्भगृहातील देवळ्यांमध्ये शंकर-पार्वती तसेच गणेशाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
कालीमातेच्या मंदिरासमोर असलेला रस्ता ओलांडून गेल्यानंतर समोरच श्रीरामाचे भव्य मंदिर आहे. ‘सनातन धर्म सभा’ या संस्थेने उभारलेल्या बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर हे मंदिर वसलेले आहे. सन १९५२ मध्ये सनातन धर्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने उभारलेल्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा ११ फेब्रुवारी १९९७ रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर स्वामी विशुद्धानंद यांच्या हस्ते करण्यात आली. या वास्तूस असलेल्या आवारभिंतीमध्ये मंदिराची मोठी स्वागतकमान आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. त्याच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दंडधारी द्वारपालांची शिल्पे आहेत. प्रशस्त आकार, चकचकीत संगमरवरी फरशा, छतावर झुंबरे आणि विद्युतदीप असे या सभामंडपाचे स्वरूप आहे. त्याच्या भिंतीवर वरच्या भागात महिरपी चौकटीमध्ये विविध देव-देवतांची मनोवेधक चित्रे लावलेली आहेत. समोरच्या भागात डाव्या आणि उजव्या बाजूस दोन मोठ्या घुमटाकार देवळ्या आहेत. डावीकडील देवळीमध्ये भूतलावरील अष्टकोनी खड्ड्यामध्ये शिवपिंड विराजमान आहे. चांदीच्या पत्र्याने मढवलेली उंचसर शाळुंका आणि त्यात बाणलिंग असलेल्या या पिंडीवर चांदीच्या नागराजाने फण्याचे छत्र धरले आहे.
त्यावर गलंतिका आहे. या शिवपिंडीसमीप पार्वती आणि गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. त्याचप्रमाणे देवळीतील देवकोष्टकात शंकर-पार्वती, तसेच गणेशाची मूर्ती आहे. येथील उजवीकडील देवळीमध्ये मोठ्या मखरात हनुमानाची वस्त्रालंकारांनी शृंगारलेली संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. तिच्यासमोर हनुमानाची एक पितळी मूर्ती आहे. या मूर्तीच्या मखराच्या बाजूस भगवान झुलेलाल यांची मूर्ती आहे, तर एका देवळीत ब्रह्मदेवाची मूर्ती विराजमान आहे.
मंदिरात एक मुख्य आणि दोन उप असे तीन गाभारे आहेत. त्यातील मधल्या गाभाऱ्यात उंच अधिष्ठानावर प्रभू श्रीरामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांच्या उंच संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. ‘भक्तीवेदान्त स्वामी प्रभुपाद’ प्रणित ‘आन्तरराष्ट्रीय श्रीकृष्णाभावनामृत संघा’च्या (इस्कॉन) मंदिरातील परंपरेनुसार या मूर्तींची घडण आहे. त्याच परंपरेनुसार या मूर्तींचा शृंगार केलेला आहे. येथे श्रीरामाच्या मूर्तीसमोर हनुमानाची नमस्कारमुद्रेतील मूर्ती, तसेच श्रीराम-जानकी-लक्ष्मण यांच्या छोट्या पितळी मूर्ती आहेत. येथील उजवीकडील उपगर्भगृहात सिंहारूढ मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे दुर्गामाता अष्टभुजा स्वरूपात आहे.
तिने विविध अस्त्रे धारण केली आहेत आणि ती सिंहारूढ आहे. डावीकडील उपगर्भगृहात इस्कॉन मंदिर परंपरेतील राधा-कृष्णाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
या श्रीराम मंदिरात भाविक सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथे धर्मप्रचाराच्या हेतूने सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात रामचरितमानस आणि सुंदरकांड पारायण, हनुमान चालिसा पठण, भजन-कीर्तन यांचा समावेश असतो. मंदिरात रामनवमी, कृष्णजन्माष्टमी, हनुमान जयंती, नवरात्रोत्सव, विजयादशमी, महाशिवरात्र आदी विविध सण आणि उत्सव धार्मिक परंपरेनुसार साजरे केले जातात.
कालीमातेच्या मंदिरात भाविक सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या काळात देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. दुर्गापूजा (शारदीय दुर्गोत्सव) हा या मंदिरातील एक मोठा उत्सव होय. आश्विन महिन्यातील या उत्सवात चारही दिवस देवीची विशेष पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, भोग प्रसाद आयोजित केला जातो. येथे कार्तिक अमावस्येला मध्यरात्री कालीमातेची विशेष पूजा आणि होम केला जातो. याशिवाय या मंदिरात दुर्गापूजेनंतर साजरी केली जाणारी जगद्धात्री पूजाही बंगाली परंपरेनुसार केली जाते. मंदिरात दुर्गापूजा आणि कालीपूजेच्या काळात मोठ्या प्रमाणात दर्शनेच्छुकांची गर्दी होते.