उमिया माता हे पार्वतीचे म्हणजेच उमेचे रूप आहे. शक्तीचे प्रतीक असलेली ही देवी जगभरातील समृद्ध अशा कडवा पाटीदार समाजाची कुलदेवता आहे. या देवीचे गुजरातमधील मूळ स्थान मेहसाणा जिल्ह्यातील उंझा येथे आहे. देशभरात विखुरलेल्या कडवा पाटीदार समाजाने विविध ठिकाणी आपल्या या कुलदेवतेची मंदिरे उभारली आहेत. मुंबईत स्थायिक झालेल्या पाटीदार समाजाने आपल्या धार्मिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी ‘उमिया माताजी मंदिर ट्रस्ट’च्या माध्यमातून गोरेगाव येथे या मंदिराची निर्मिती केली. या मंदिरात लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आणि उमेश्वर महादेवाची पिंडही विराजमान आहे.
उमिया माता हे पार्वतीचे म्हणजेच उमेचे रूप आहे. या देवीबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. त्यानुसार सतीने अग्निकुंडात देहत्याग करण्यापूर्वी, “माझ्या पुढील अवतारात शिवशंकर हेच मला पती म्हणून मिळावेत,” अशी मनोकामना केली होती. त्यानुसार पुढील जन्मी राजा हिमालयाच्या घरात उमेच्या रूपात तिचा जन्म झाला. तीने कठीण तप केले आणि त्यानंतर तिचा विवाह शिवशंकरांशी झाला. त्यानंतर उमा हिला ‘माता उमिया’ असे नाव पडले. तिला ‘अन्नपूर्णा माता’ म्हणूनही ओळखले जाते. सीताही उमिया मातेची नित्यपूजा करत असे. राजा जनकाच्या राजवाड्यातील बागेत उमिया मातेचे मंदिर होते. स्वयंवरादरम्यान सीता पूजा करण्यासाठी या बागेमध्ये गेली होती. त्या वेळी तिला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले. त्या वेळी, “प्रभू रामचंद्र हेच मला पती म्हणून लाभावेत,” अशी प्रार्थना तिने देवीसमोर केली. देवीच्या आशीर्वादामुळेच तिची मनोकामना पूर्ण झाली. पृथ्वीमध्ये अंतर्धान पावण्यापूर्वी तिने लव आणि कुश यांचा ताबा उमिया मातेकडे दिला. तेव्हापासून ते उमिया मातेची पूजा करू लागले. त्यांच्या पश्चात त्यांचे वंशजही उमिया मातेची नित्यपूजा करत असत.
कडवा पाटीदार समाजाचे मूळ सिंधू संस्कृतीमध्ये असल्याचे सांगितले जाते. हा समाज मूळचा क्षत्रिय वर्णातील होता. पुढे क्षत्रिय वर्ण तीन उपवर्णांत विभागला गेला. त्यातील कुर्मी क्षत्रिय म्हणजे शेतकरी हेच आजच्या पाटीदार समाजाचे पूर्वज होय. इ.स. १००० नंतर परकीय आक्रमकांचे हल्ले वाढल्यामुळे काही कुर्मी गट पंजाबातून उत्तर गुजरातमधील उंझा भागात स्थलांतरित झाले. त्यांपैकी पंजाबच्या गुजरानवाला येथील कराड भागातून आलेले गट स्वतःस ‘कराड कुर्मी’ म्हणू लागले,
तसेच लेऊ भागातून आलेले गट स्वतःस ‘लेऊ कुर्मी’ म्हणू लागले. पुढे ‘कराड’चा अपभ्रंश ‘कडवा’ आणि ‘कुर्मी’चा ‘कणबी’ असा झाला. सतराव्या शतकात या समाजाने राजांकडून जमिनीचे पट्टे घेण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांना ‘पाटीदार’ म्हटले जाऊ लागले. हा समाज सुरुवातीला गुजरातमधील उंझा भागात स्थायिक झाला. तिथे त्यांचे कुलदैवत असलेल्या उमिया मातेचे मोठे मंदिर आहे.
गोरेगाव पूर्वेकडील चुरी वाडी (विश्वेश्वर नगर रोड) येथील उमिया माताजी मंदिराची स्थापना २०१० च्या सुमारास झाली. आधुनिक आणि पारंपरिक भारतीय मंदिर स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या बांधकामात राजस्थानी बलुआ पाषाणाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. मंदिरास मोठी आवारभिंत आहे. आवारास उंच व भव्य असे प्रवेशद्वार आहे. येथील द्वारस्तंभांवर कोरीव नक्षीकाम केलेले आहे, तसेच त्यावर द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरास संगमरवरी फरसबंदी केलेले प्रांगण आहे. मंदिर उंच जगतीवर बांधलेले आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या सभामंडपावर पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे. मंदिरात तीन गर्भगृहे आहेत आणि त्यांवर उंच शिखरे आहेत.
या शिखरांवर चक्राकार पद्धतीचा आमलक आहे. त्यावर सोनेरी कलश आहे. बारा पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कठड्यावर मोठी गजशिल्पे आहेत. मंदिराचा मुखमंडप, तसेच सभामंडपास अनेक स्तंभ आहेत. सभामंडपातील सुंदर कोरीव नक्षीकाम केलेल्या या स्तंभांवर सूरसेवकांच्या विविध मुद्रांमधील प्रतिमा, तसेच मकरतोरणे कोरलेली आहेत. सभामंडपाचे घुमटाकार वितानही सुंदर नक्षीने सुशोभित केलेले आहे. त्याच्या मध्यभागी बिलोरी काचांचे मोठे झुंबर टांगलेले आहे. अंतराळातील सुंदर कोरीव देवकोष्टकांत गणपती व हनुमानाच्या संगमरवरी मूर्ती विराजमान आहेत.
मंदिराच्या मुख्य गर्भगृहासमोर उंच संगमरवरी चौथऱ्यावर सिंहाची मोठी मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहास कोरीव स्तंभांचे संगमरवरी प्रवेशद्वार आहे. या स्तंभांच्या खालच्या बाजूस द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आत उंच वेदीवर उमिया मातेची मूर्ती विराजमान आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज व उभ्या स्वरूपात आहे. देवीने खड्ग, ढाल, चक्र आणि त्रिशूळ धारण केलेले आहे. उंची वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी येथे देवीस शृंगारलेले आहे. तिच्या पाठीमागे गोमाता उभी आहे.
या गर्भगृहाच्या डावीकडील उपगर्भगृहासमोर संगमरवरी चौथऱ्यावर गरुडाची मूर्ती आहे. या उपगर्भगृहात लक्ष्मी-नारायणाच्या सुबक मूर्ती विराजमान आहेत. उजवीकडील उपगर्भगृहासमोरील चौथऱ्यावर नंदीची मूर्ती विराजमान आहे. या गर्भगृहात उमेश्वर महादेवाची मोठी पिंड प्रतिष्ठापित आहे. या शिवपिंडीवर तांब्याच्या नागदेवतेने फणा उभारलेला आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीवरील देवकोष्टकात पार्वती माता विराजमान आहे. नजीकच एका चौथऱ्यावर शंकराचा मोठा पितळी मुखवटा आहे. सण-उत्सवांच्या वेळी हा मुखवटा शिवलिंगावर चढवला जातो.
या देवालयात सकाळी ७ ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३ ते रात्री ९ या कालावधीत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथे रोज सकाळी ९ वाजता साग्रसंगीत आरती केली जाते. उन्हाळ्यात सायंकाळची आरती ७ वाजता, तर हिवाळ्यात ६ वाजता होते. नवरात्र उत्सव हा या मंदिरातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा उत्सव असतो. आश्विन नवरात्रात नऊ दिवस येथे विशेष पूजा, हवन आणि गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. या काळात संपूर्ण मुंबईतून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. याचप्रमाणे येथे शाकंभरी नवरात्र आणि ललिता पंचमी या दिवशी देवीस विशेष शृंगार केला जातो. येथे शिवरात्रीस, तसेच श्रावणातील सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिर परिसरात भाविकांसाठी ‘उमिया माताजी मंदिर गेस्ट हाऊस’ आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी मोठा हॉल आहे. येथे विवाहादी कौटुंबिक सोहळे पार पडतात.