जैन धर्मातील ज्ञानीपुरुष, ‘अक्रम विज्ञानाचे’ (आत्मसाक्षात्काराचे विज्ञान) संस्थापक दादा भगवान यांच्या संकल्पनेतून देशभरात अनेक ठिकाणी त्रिमंदिरे उभारण्यात आली आहेत. मोक्ष प्राप्त करण्याकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मतभेदांमध्ये गुंतलेल्या लोकांना सर्वधर्मसमभावाचा संदेश देऊन मोक्षमार्ग दाखवणाऱ्या या त्रिमंदिरांपैकी एक भव्य मंदिर ठाण्यातील माजिवडा येथे वसले आहे. या भव्य मंदिराच्या संकुलात जैन धर्म, शैव आणि वैष्णव पंथांतील देवतांबरोबरच अन्य धर्मीयांच्या देवताही विराजमान आहेत. धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मंदिरात सर्व जाती-पंथांतील भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
दादा भगवान हे गुजरातमधील एक आध्यात्मिक नेते होते. त्यांचे मूळ नाव अंबालाल मूलजीभाई पटेल. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९०८ रोजी गुजरातमधील तरसाली गावात झाला. ते स्वतंत्र विचाराचे होते. पदवीधर वगैरे झाल्यानंतर आपणांस आयुष्यात कोणाच्या हाताखाली नोकरी करावी लागू नये, यासाठी त्यांनी दहावीनंतर शिक्षण सोडले. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्मात रुची होती. तरुणपणी व्यवसायानिमित्ताने ते मुंबईत आले. मुंबई बंदरातील सुक्या गोदीची (ड्राय डॉक्स) देखभाल करणाऱ्या पटेल अँड कंपनीत ते ठेकेदार म्हणून काम करीत होते. ते सांगितले जाते की जून १९५८ मध्ये सुरत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ते बसले असता अचानक त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यांनी साठच्या दशकात ‘अक्रम विज्ञान’ या धार्मिक चळवळीची स्थापना केली.
दादा भगवान फाऊंडेशनच्या संकेतस्थळानुसार, अक्रम विज्ञान हा आत्मज्ञान प्राप्त करण्याचा थेट आणि जलद मार्ग आहे. आत्मज्ञानाच्या पारंपरिक मार्गांमध्ये लोकांना संसाराचा, भौतिक संपत्तीचा त्याग करावा लागतो. आत्मनियंत्रणाचा अभ्यास करावा लागतो. अक्रम विज्ञानात याची आवश्यकता नसते. या विज्ञानानुसार, जेव्हा ज्ञानीच्या कृपेने आत्म्याचे अज्ञान पूर्णतः दूर होते, तेव्हा आंतरिक रूपात मौलिक परिवर्तन सुरू होते. आत्मज्ञान प्राप्तीच्या प्रक्रियेस ज्ञानविधी असे म्हटले जाते. या माध्यमातून केवळ दोन तासांत आत्म्याचे ज्ञान प्राप्त होते असा दावा आहे. ज्ञानभक्ती हे अक्रम विज्ञानाचे मूलतत्त्व आहे. ज्ञानभक्ती म्हणजे सीमंधर स्वामी यांच्याप्रती आणि त्यांचे माध्यम दादा भगवान यांच्याप्रती ज्ञानातून मुक्ती मिळवण्यासाठी पूर्ण समर्पण.
जैन धर्मानुसार सीमंधर स्वामी हे जिवंत तीर्थंकर असून ते महाविदेह क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या जगात विराजमान आहेत. जैन धर्मीयांची अशी श्रद्धा आहे की सीमंधर स्वामींचा जन्म सतरावे तीर्थंकर कुंथुनाथ आणि अठरावे तीर्थंकर श्रीअरहनाथ यांच्या काळात झाला. त्यांचे भौतिक शरीर सुमारे १५०० फूट उंच आहे.
त्यांचे वय आता एक लाख पन्नास हजार वर्षे इतके आहे आणि ते अजून एक लाख पंचवीस हजार वर्षे जगतील. दशरथ राजाने सीमंधर स्वामींकडून दीक्षा घेतली होती. दादा भगवान फाऊंडेशनतर्फे बांधण्यात येणाऱ्या त्रिमंदिरांत सीमंधर स्वामींची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते.
त्रिमंदिर ही एक क्रांतिकारी धार्मिक संकल्पना मानली जाते. समाजात सर्वधर्मसमभावाची भावना रुजवण्यासाठी जैन धर्म, शैव आणि वैष्णव पंथातील देवदेवतांसह अन्य धर्मांतील देवदेवतांना एकाच व्यासपीठावर समान श्रद्धेने सन्मानित करणे, हा या मंदिरांच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. दादा भगवान यांची शिकवण अशी आहे की ‘लोकांनी स्वतःच देव आणि धर्मास विभाजित केले आहे. कोणत्याही एका देवाची निवड करण्यापेक्षा आपण सर्व धर्मांचे मूळ सिद्धांत समजून घेऊन त्यांचे आचरण केले पाहिजे. सर्व देवतांनी आपणांस आत्मा आणि आत्मसाक्षात्काराचे महत्त्व सांगितले आहे.’ या विचारांवर आधारित अशी अनेक मंदिरे आज अनेक ठिकाणी उभी आहेत. मुंबईच्या बोरीवली या उपनगरातील पूर्व भागात काजूपाडा येथे भव्य त्रिमंदिर आहे. त्यानंतर मुंबई-ठाणे परिसरातील या आणखी एका भव्य त्रिमंदिराची उभारणी अलीकडेच माजिवडा परिसरात करण्यात आली.
दादा भगवान यांचे २ जानेवारी १९८८ रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. दादा भगवान यांच्या परमशिष्या डॉ. निरूबेन अमीन, तसेच दीपकभाई देसाई यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. दीपकभाई यांना या संप्रदायामध्ये आत्मज्ञानी असे म्हटले जाते.
त्यांच्याच प्रेरणेने माजिवडा येथील हे मंदिर उभे राहिले आहे. या मंदिराचा भूमिपूजन सोहळा रविवार, ता. ३० जुलै २०२३ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ दरम्यान दीपकभाई यांच्या हस्ते पार पडला. सुमारे अडीच वर्षे मंदिराचे काम अविरत सुरू होते. या मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दीपकभाई आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली.
पारंपरिक आणि आधुनिक वास्तुरचनेचा उत्तम नमुना असलेल्या या त्रिमंदिराची संरचना देशभरातील अन्य त्रिमंदिरांसारखीच आहे. या मंदिराभोवती उंच आवारभिंत आहे. त्यातील मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्राकारात प्रवेश होतो. मंदिराची वास्तू दुमजली आहे व ती संगमरवरी पाषाणात बांधलेली आहे. तिच्या दुसऱ्या मजल्यावर मुख्य मंदिर वसलेले आहे. एकूण ४१ संगमरवरी पायऱ्या चढून या मुख्य मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. कोरीव नक्षीकाम असलेले स्तंभ, फांसणा तसेच नागर शैलीतील उंच शिखरे ही त्रिमंदिर रचनेची खास वैशिष्ट्ये या मंदिरातही दृग्गोचर होतात.
प्रांगणात मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर चार छोटी देवालये आहेत.
छोटा खुला सभामंडप आणि घुमटाकार छत असलेले गर्भगृह अशा या देवालयांत पद्मावती देवी, अष्टभुजा अंबा, पद्मनाभ भगवान, तसेच साईबाबा यांच्या संगमरवरी मूर्ती विराजमान आहेत. मुख्य मंदिराची संरचना तीन मुखमंडप, मुख्य सभामंडप आणि तीन अंतराळ व गर्भगृहे अशी आहे. येथील स्तंभांवर बारीक कोरीव काम केलेले आहे. मुख्य सभामंडप त्रिमंदिर शैलीला साजेसा असा प्रशस्त व भव्य आहे. त्याच्या छतावर मोठी बिलोरी झुंबरे टांगलेली आहेत. मध्यभागी असलेले मुख्य गर्भगृह जैन तीर्थंकर सीमंधर स्वामी यांना समर्पित आहे. डाव्या बाजूच्या गर्भगृहात शैव संप्रदायाचे उपास्य दैवत असलेल्या शंकराचे शिवलिंग आहे, तर दुसऱ्या बाजूच्या गर्भगृहात वैष्णव संप्रदायाचे लाडके दैवत असलेले योगेश्वर कृष्ण विराजमान आहेत.
मुख्य गर्भगृहाच्या अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर मंदिराच्या प्रथेनुसार दादा भगवान यांच्या भव्य प्रतिमा आहेत. अंतराळातील देवकोष्ठकांत पार्श्वनाथ भगवान, महावीर भगवान, अजितनाथ भगवान, ऋषभनाथ भगवान तसेच चांद्रायण यक्ष देव यांच्या मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहात सीमंधर स्वामींची संगमरवरी दगडात घडवलेली भव्य मूर्ती प्रतिष्ठापित आहे. ही मूर्ती ध्यानस्थ म्हणजेच पद्मासन मुद्रेत उंच वज्रपीठावर विराजमान आहे.
मूर्तीला सुवर्णालंकार आणि सुवर्णमुकुटाने शृंगारले आहे. मूर्तीच्या वर चांदीचे मोठे छत्र आहे.
शिव संप्रदायाच्या गर्भगृहाच्या समोर संगमरवरी नंदी आणि कासवाची मूर्ती आहे. येथील अंतराळातील देवकोष्टकांमध्ये हनुमान आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. या गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी मोठ्या आकाराचे शिवलिंग आहे आणि त्यामागील भिंतीवरील देवकोष्टकात माता पार्वतीची शुभ्र संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. योगेश्वर कृष्णाच्या गर्भगृहात वज्रपीठावर मध्यभागी हाती चक्र व शंख घेतलेली संगमरवरी कृष्ण मूर्ती आहे. त्याच्या डाव्या बाजूस श्रीनाथजीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे, तर उजवीकडे तिरुपती बालाजीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथील देवकोष्ठकांत भवानी माता आणि चक्रेश्वरी देवी यांच्या मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या तळमजल्यावर भाविक आणि साधकांसाठी एक मोठा सत्संग सभागृह आहे. या सभागृहात साप्ताहिक सत्संग आणि आध्यात्मिक चर्चांचे आयोजन केले जाते.
या मंदिरात सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते रात्री ९, तर रविवारी सकाळी ७ ते रात्री ९.३० या कालावधीत भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात रोज सकाळी ७.४५ ते ८.३० या काळात प्रक्षाल पूजन आरती होते. तर सायंकाळी ६.३० ते ७.३० या कालावधीत सायंआरती पार पडते. मंदिराच्या तळमजल्यावर दर रविवारी ५ ते ६.३० या काळात सत्संग कार्यक्रम होतो. फेब्रुवारी २०२६ पासून दर्शनेच्छुकांसाठी खुले झालेल्या या मंदिरात रोज सकाळ-सायंकाळी मोठ्या प्रमाणावर भाविक, तसेच पर्यटक येतात. रविवारच्या दिवशी मंदिर गर्दीने फुलून जाते.