हृदयात धडकी भरवणाऱ्या, तेवढ्याच निसर्गरम्य असलेल्या सह्याद्रीच्या शिखरांपैकी एका शिखरावर वसलेले टिकलेश्वर मंदिर भाविकांबरोबरच हजारो पर्यटक व गिर्यारोहकांचेही आकर्षण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील खोल दऱ्या आणि वाटेत ओबडधोबड खडक असलेला टिकलेश्वराचा डोंगर जणू शिवाचे रौद्र रूपाचे प्रतीक असल्याचा भास होतो. रत्नागिरीतील देवरुख तालुक्यात तळवडे गावातील उंच डोंगरावर असलेल्या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री, तसेच गुरुपौर्णिमेला होणाऱ्या उत्सवांच्यावेळी या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते.
देवस्थानाची कथा अशी की देवरुखजवळील हरपुडे येथील गणपत लक्ष्मण जाधव ऊर्फ स्वामी उदयानंदगिरी नावाचे महापुरुष येथील डोंगरावर तप करत. या डोंगरावर आपली समाधी बांधण्याची आज्ञा त्यांनी मूळचे बोरगाव येथील आपले परमशिष्य गणपत लक्ष्मण काताळकर ऊर्फ स्वामी विद्यानंदगिरी यांना केली. १९७० मध्ये उदयानंदगिरी यांचे देहावसान झाल्यावर विद्यानंदगिरी यांनी गुरुआज्ञेनुसार १९७२ मध्ये त्यांची समाधी बांधली. त्याच वर्षी विद्यानंदगिरी यांना साक्षत्कार होऊन डोंगरमाथ्यावर एक गुहा सापडली. दुसऱ्याच वर्षी (१९७३) तेथे दुसरी गुहाही आढळली. या दोन्ही गुहांच्या साफसफाईदरम्यान त्यांना येथे पाणी असल्याचे निदर्शनास आले. या डोंगरमाथ्यावर शंकराचे मंदिर बांधण्याचा दृष्टांत त्यांना उदयानंदगिरी महाराजांनी दिला. त्यांच्या आज्ञेनुसार विद्यानंदगिरी यांनी हे मंदिर उभारले. १९ फेब्रुवारी १९७६ रोजी मंदिराचे काम पूर्ण झाले. तळवडे, हरपुडे आणि बेलारी या तीन गावांच्या सीमेवर असल्याने मंदिराला टिकलेश्वर असे नाव देण्यात आले.
ट्रेकिंग पॉइंट म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. देवरुख–मार्लेश्वर मार्गावर टिकलेश्वरला जाण्यासाठी रस्ता आहे. टिकलेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या तळवडे गावानजीकच्या उंच डोंगरावर पांढरा रंग दिलेले हे मंदिर मुख्य रस्त्यावरूनही दिसते. तळवडे हे देवरुखपासून सुमारे चार किमी अंतरावर आहे. तळवडे गावातून हा डोंगर चढून जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. गाडीनेही वरपर्यंत जाता येते. मात्र शेवटचा एक चतुर्थांश रस्ता पायवाटेचा आहे. उभी चढण असलेला, दमछाक करणारा हा रस्ता आपल्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहतो. मात्र ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी ही साहसी पर्वणी आहे. येथे असलेल्या पायरी मार्गाने निसर्गाचा आस्वाद घेत मंदिरापर्यंत जाता येते.
खुला सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराला तीन कळस आहेत. सभामंडपाला पत्र्याचे छप्पर असून तेथे तुळशी वृंदावन आहे. गाभाऱ्यासमोर चौथऱ्यावर नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. नंदीच्या चौथऱ्याजवळ उदयानंदगिरी आणि विद्यानंदगिरी यांच्या समाध्या आहेत. गर्भगृहात शंकराची संगमरवरी पिंड असून त्यावर चांदीचा नागफणा आहे. येथे गणपती, श्रीदत्त व हनुमानाच्या मूर्तीही आहेत. मंदिराजवळ विठ्ठल–रखुमाईचेही छोटे मंदिर आहे. मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो व त्यावेळी भजन–कीर्तनासारखे कार्यक्रम होतात. गुरुपौर्णिमेलाही उदयानंदगिरी आणि विद्यानंदगिरी यांच्या शिष्यांची येथे मोठी गर्दी असते.
मंदिरात निवाऱ्यासाठी काँक्रीटचे छप्पर असलेली जागा आहे. दोन खोल्या, चूल असलेले छोटे स्वयंपाकघर, पाण्याची टाकी, तसेच स्नानगृह असलेल्या या जागेत १५ ते २० जणांच्या राहण्याची सोय आहे. पर्यटकांसोबतच अनेक ट्रेकर्स येथे राहून निसर्गसौंदर्याचा आनंद घेतात. मंदिरापासून काही पायऱ्या उतरल्यावर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक मार्ग आहे. या मार्गावर, मंदिराच्या खालील भागात दोन गुहा आहेत. एका गुहेत भवानी देवीची मूर्ती असून दुसरीत शंकराची छोटी पिंडी आहे. या दोन्ही गुहांमध्ये दगडांत कोरलेल्या स्वच्छ पाण्याच्या टाक्या आहेत व त्यांतील पाणी पिण्याजोगे आहे. या मार्गावर प्राचीन मूर्ती कोरलेले खडकही आहेत. टिकलेश्वराच्या पायथ्यापासून पदभ्रमण करत जाऊन येण्यास पाच ते सहा तास लागतात.
टिकलेश्वराच्या डोंगरावरून खाली पाहिल्यास खोल दऱ्या असलेले सह्याद्रीचे आक्राळविक्राळ रूप दिसते. पूर्व दिशेकडील मैमतगड किल्ला आणि घाटमाथ्यावरील गोठणे गावातून मार्लेश्वराकडे जाणारी वाट, तसेच जवळील कुंडी घाटाचे विहंगम दृश्य दिसते.