तारकेश्वर गड

महिंदा, ता. आष्टी, जि. बीड

हिंदू धर्मातील शैव व वैष्णव संप्रदायातील वाद आणि ऐक्य यांचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. एकेकाळी शैव व वैष्णव संप्रदायातील वितुष्ट मिटावे म्हणून तत्कालीन सम्राटांना शिव व विष्णूची एकत्र मंदिरे उभी करावी लागली. पुढे ही परंपरा अनेक रूपांत चालू राहिली. सर्व देव एकच आहेत हे तत्त्व रुजवतानाच, ‘सर्वठाई एकच परमात्मा’ ही शिकवण देणारा आणि भेदभावाचा निषेध करणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. या संप्रदायाची शक्तिपीठे असलेली अनेक धार्मिक स्थळे बीड जिल्ह्यात शेकडो वर्षांपासून कार्यरत आहेत. आष्टी तालुक्यातील तारकेश्वर गड हे त्यांपैकीच एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. ‘धाकटी पंढरी’ म्हणून या गडाची ख्याती आहे.

श्री तारकनाथ हे तारकेश्वर गडाची मूळ ओळख होत. ते नाथ संप्रदायातील चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक होते. गडावर त्यांची समाधी असल्याने हे देवस्थान सुमारे तेराव्या ते चौदाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. पुढे संतश्रेष्ठ नारायण महाराजांना दृष्टांत झाल्यावर त्यांनी या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि येथे वारकरी संप्रदायाचे शक्तिपीठ निर्माण केले. नारायण बाबांना वाचासिद्धी प्राप्त होती, असे मानले जाते. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाने भाविकांचे कल्याण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. आपल्या जीवनकाळात त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. गडावर वारकरी शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले. नाथ संप्रदायातील गुरु-शिष्य परंपरेने आजही गडावर वारकरी संप्रदायाचे अखंड कार्य सुरू आहे. गावापासून काही अंतरावर हे देवस्थान वसलेले आहे. देवस्थानच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात मधोमध दोन नक्षीदार स्तंभांच्या वरील अर्धचंद्राकृती कमानीला पितळी घंटा टांगलेली आहे. घंटेच्या एका बाजूला तारकेश्वराचे मंदिर आहे, तर दुसऱ्या बाजूला तारकनाथ व नारायण बाबांची समाधी मंदिरे आहेत. तारकेश्वर मंदिर सुमारे दोन फूट उंच चौथऱ्यावर आहे. चौथऱ्यावर मंदिरासमोर वज्रपीठावर नंदीची मूर्ती आहे. अष्टकोनी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारास एक पायरी आहे. द्वारशाखांवर वेलबुट्टीची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. मंदिरात जमिनीवर मोठी शिवपिंडी आहे आणि त्यावर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. वितानावर सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराच्या छतावर द्रविडी शैलीतील चार थरांचे अष्टकोनी शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरात कुट व शाल रचना आहेत. शिखरावर पानाफुलांची नक्षी आहे आणि शीर्षभाग घुमटाकार आहे. घुमटावर स्तूपिका व स्तूपिकेवर कळस आहे.
या मंदिरासमोर काही अंतरावर तारकनाथांचे समाधी मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपात चार गोलाकार स्तंभ आहेत व त्यापुढे अर्धखुला सभामंडप आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी पाच नक्षीदार स्तंभ आहेत. त्यांच्या बाजूला गजराज शिल्पे आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपापेक्षा गर्भगृह उंचावर आहे व त्याच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर कलश व इतर शुभचिन्हे अंकित आहेत. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती व त्यापुढे तारकनाथ महाराजांच्या समाधीचा चौथरा आहे. चौथऱ्यावर तारकनाथ महाराजांची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या भिंतींवर काचेची मिनाकारी सजावट केलेली आहे. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आणि गर्भगृहाच्या छतावर उंच गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालील अर्धभागात पद्मदलमंडळ आणि वरील भागात स्तंभनक्षी आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व कळस आहेत.

या मंदिराच्या बाजूला संत नारायण महाराजांचे समाधी मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर व झडपांवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहात जमिनीवर संत नारायण महाराजांच्या समाधीचा चौथरा आहे व त्याच्या मागे वज्रपीठावरील मखरात नारायण महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या छतावर पिरॅमिड आकारातील उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले शिखर आहे. गर्भगृहाच्या छतावर उरुशृंगी प्रकारचे चौकोनी शिखर आहे. शिखरात चारही बाजूंना असलेल्या देवकोष्ठकांत विविध देवमूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.

मंदिराच्या प्रांगणात संत नारायण महाराजांच्या रोजच्या वापरातील वस्तूंचे प्रदर्शन केंद्र आहे. केंद्रातील वस्तू भाविकांना पाहता याव्यात म्हणून काचेच्या भिंती लावल्या आहेत. प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष व पुष्पवृक्षांच्या वाटिका आहेत. प्रांगणात वारकरी शिक्षण संस्था, विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि भक्तनिवास आदी कारणांसाठी तीन मजल्यांची इमारत उभारण्यात आली आहे. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या गोशाळेत सुमारे २०० देशी गाई आहेत. गडावर दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, आषाढी व कार्तिकी एकादशी, चैत्रपाडवा, रामनवमी, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव साजरे केले जातात. ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात एकादशी, गुरुवार, सोमवार, पौर्णिमा आणि अमावस्या आदी दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरात प्रतिदिवशी नियमित अन्नछत्र चालते.

उपयुक्त माहिती:

  • आष्टी येथून ३८ किमी अंतरावर
  • बीड येथून ६८ किमी अंतरावर
  • आष्टी येथून एसटीची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सोय आहे
  • संपर्क: मंदिर कार्यालय, मो. ८११२७७५५५५

तारकेश्वर गढ़

महिंदा, ताल. आष्टी, जिला. बीड

Back To Home