परमेश्वराला अनेकविध नावांनी ओळखले जात असले तरी तो अनादी अनंत असल्याने त्याला विशिष्ट नावाची आवश्यकता वाटत नसावी. कदाचित यामुळेच अनेक गावांतील देवांना गावाच्या नावापुढे ‘ईश्वर’ जोडून त्या गावाचा स्वामी या अर्थाने नाव दिले जाते. त्याचप्रमाणे केज तालुक्यातील तांबवा गावातील महादेवाला ‘तांबवेश्वर महादेव’ या नावाने ओळखले जाते. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. या गावाचे एक वैशिष्ट्य असे की येथे शेकडो वर्षांपासून कडुलिंबाचे एकही झाड उगवलेले नाही. तसेच येथे कडुलिंबाच्या लाकडाचा वापर केला जात नाही.
येथील पुजारी हे मंदिर अनादिकाळापासून अस्तित्वात असल्याचे सांगतात, परंतु अभ्यासकांच्या मते मात्र हे मंदिर चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असावे. या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की प्रभू श्रीरामांच्या वनवासाच्या काळात या ठिकाणी वास्तव्य होते. त्या वेळी आपल्या नित्य पूजेसाठी त्यांनी ही शिवपिंडी स्थापन केली. या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका अशी की, या गावात हजारो वर्षांपासून कडुलिंबाचे एकही झाड उगवले नाही. विशेष म्हणजे, गावात कोणीही कोणत्याही प्रयोजनासाठी कडुलिंबाच्या लाकडाचा वापर करीत नाही. त्यामुळे गावात घरबांधणी, फर्निचर, कृषी अवजारे, खेळणी अथवा चौरंग-पाट, इतकेच काय तर बैलगाडीसाठीही कडुलिंबाच्या लाकडाचा वापर वर्ज्य आहे. याउलट असे सांगितले जाते की, गावात कुणाला सर्पदंश झाला तर कडुलिंबाच्या
पाल्याचा वापर करून सापाचे विष उतरवले जाते. सन १९६५ मध्ये या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर अलीकडील काळात मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हा मंदिराचे बरेचसे काम सिमेंट काँक्रिटमध्ये करण्यात आले.
हे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी व लोकवस्तीत वसलेले आहे. मंदिरापासून काही अंतरावर वाहनतळाची सोय आहे. येथून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर विशाल प्रवेशद्वार व तटबंदी दिसते. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. येथून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला घरे व दुकाने आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेले हे मंदिर रस्त्यालगत आहे. सभामंडपाला दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिर रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे दोन्ही प्रवेशद्वारांना प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. प्रवेशद्वारांच्या झडपा व द्वारशाखा लाकडी आहेत आणि त्यांवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. दोन्ही प्रवेशद्वारांच्या मधील भिंतीत वातायने आहेत. प्रवेशद्वारे व खिडक्यांवर महिरपी कमानी आहेत. सभामंडप समोरील बाजूने बंदिस्त आहे, तर डाव्या व उजव्या बाजूने तो खुला आहे.
सभामंडपात बाह्य बाजूला स्तंभ आहेत. सभामंडपात वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहाच्या डावीकडे असलेल्या मखरात वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाई, लक्ष्मी-नारायण, श्रीकृष्ण व साधुसंतांच्या मूर्ती आहेत. मखरात समोरील बाजूला सात नक्षीदार वामन स्तंभ आहेत. स्तंभांवर सहा अर्धचंद्राकृती कमानी आहेत. सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे व त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे.
प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारावर महिरपी तोरण आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर शिवपिंडी आहे. या पिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे.
गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालील तीन थरांत प्रत्येकी बारा देवकोष्ठके आहेत व त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या चौथ्या थरात स्तंभनक्षी, शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भक्तनिवास, धर्मशाळा आणि अन्नछत्र अशा विविध कार्यांसाठी करण्यात येतो. मंदिराच्या मागील बाजूला विस्तीर्ण प्रांगणात वीरगळ, सती शिळा व इतर प्राचीन मूर्ती आहेत. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या वाहनतळावर मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराची रचनाही सभामंडप व गर्भगृह अशीच आहे. येथील गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या वेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. या निमित्ताने देवाचा पालखी सोहळा आयोजित केला जातो व देव पालखीतून ग्रामप्रदक्षिणेला निघतात. हजारो भाविक ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळीत पालखी सोहळ्यात सहभागी होतात. श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिरात चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, आषाढी व कार्तिकी एकादशी, दसरा-दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. या सर्व उत्सवांदरम्यान मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.