स्वामी स्वरूपानंद मठ

पावस, ता. व जि. रत्नागिरी

आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाच्या सोऽहं साधनेचा पुरस्कार करत, शिष्यांनाराम कृष्ण हरीहा गुरुमंत्र देणारे स्वामी स्वरूपानंद यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील मठ राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. ज्ञानेश्वरीतील भावार्थ सोप्या मराठीत सांगणाऱ्या, आध्यात्मिक साधनेतून उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक येथे येत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात, नीरव शांतता अनुभवत, स्वतःला विसरून, येथे आत्मिक समाधान मिळते, असे येथे येणाऱ्या भाविकांचे अनुभव आहेत.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पावस गावात १५ डिसेंबर १९०३ रोजी जन्मलेल्या स्वामी स्वरूपानंद यांचे मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबोले. पावस येथे प्राथमिक आणि रत्नागिरीत माध्यमिक शिक्षण घेतलेले स्वामी स्वरूपानंद पुढील अध्ययनासाठी मुंबईतील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले. लहानपणापासून पारमार्थिक संस्कार झालेले स्वामी स्वरूपानंद अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होते. आध्यात्मिकविषयांचे वाचन, श्रवण, मनन सुरू असतानाच लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला. गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीत सहभाग घेणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांनी तरुणांना स्वावलंबनपूर्वक राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी १९२३ मध्ये पावस येथेस्वावलंबनाश्रमही शाळा सुरू केली. या शाळेत विद्यार्थ्यांना हातकताई, हातमागावर खादी विणण्याचे प्रशिक्षण देतानाच मल्लखांब, व्यायाम, तसेच लाठी चालवण्याचेही प्रशिक्षण दिले जात असे. येथे राष्ट्रीय मेळावे प्रवचनेही होत असत.

सरकारी रोषाच्या भीतीने विद्यार्थी संख्या घटत गेल्याने ही शाळा बंद करून ते पुण्याला गेले. तेथील टिळक महाविद्यालयातून त्यांनी वाङ्मयविशारद पदवी घेतली. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. येरवडा कारागृहात असताना त्यांची भेट आचार्य जावडेकर, एस. एम. जोशी, शंकरराव देव आदींशी झाली. तेथील वास्तव्यादरम्यानच्या एकांतवासाचा उपयोग ध्यान अभ्यासासाठी करतानाच त्यांनी तेथे सद्गुरू स्तवनपरनवरत्नहारहे नऊ ओव्यांचे काव्य रचले.

दरम्यानच्या काळात स्वामी स्वरूपानंद यांच्यात मुमुक्षुत्व उत्पन्न होऊन सद्गुरूकृपेची तळमळ जाणवू लागल्याने त्यांचे मामा त्यांना नाथ सांप्रदायिक आत्मसाक्षात्कारी पुरुष असलेले बाबा महाराज वैद्य यांच्याकडे घेऊन गेले. बाबा महाराजांकडून नाथ पंथाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे स्वरूपानंद असे नामकरण करण्यात आले. तेथून त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीस सुरुवात झाली. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी विपुल ग्रंथनिर्मिती केली, तसेच असंख्य भाविकांना सोऽहं नामाची दीक्षा दिली. १९३३ मध्ये त्यांना मलेरिया झाल्यावर त्यांचे अनुयायी असलेल्या डॉ. बाबा देसाई यांनी त्यांना पावसमधील त्यांच्या घरात वास्तव्य करण्याची विनंती केली. तेव्हापासून १९७४ पर्यंत ते देसाई यांच्या अनंत निवासमध्ये राहिले.

कालांतराने शरीरत्याग करण्याची भावना निर्माण झाल्याने त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक जागा निश्चित करून तेथे एक गुहा बनविण्यात आली. ही गुहा कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या डोंगरावरून आणलेल्या दगडाने बंद करण्यात आली होती. १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामींनी येथे संजीवन समाधी घेतली. स्वामींनी आधी सांगितल्याप्रमाणे पद्मासन स्थितीत त्यांचा देह ठेवण्यात आला. या समाधी सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. जेथे समाधी आहे, तेथे हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. त्याआधी १९७२ मध्ये येथे स्वरूपानंद आश्रमाची स्थापना करण्यात आली. १९६७ मध्ये स्थापन झालेल्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे येथील व्यवस्था आजही पाहिली जाते.

गजबजलेल्या परिसरापासून वस्तीपासून दूर, शांत निसर्गरम्य भागात हे मंदिर आहे. दुरूनच मंदिराचे आकर्षक शिखर नजरेस पडते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या दिशेने पुढे जाताना दोन्ही बाजूला स्वामींनी रचलेल्या ओव्या वाचत, येथील शांतता अनुभवत महाद्वारापर्यंत आपण पोचतो. महाद्वाराच्या परिसरात आकर्षक सजावट आहे. महाद्वाराच्या पायऱ्यांनजीक दोन्ही बाजूंना गजराजांची शिल्पे आहेत. संतमंडप (येथील सभामंडप संतमंडप म्हणून परिचित आहे) गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. संतमंडपात दोन्ही बाजूंने १६ खांब असून त्यावर संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ यांच्या मूर्ती आणि काही संत महापुरुषांच्या प्रतिमा आहेत. समोरच गर्भगृहात फुलांनी सजवलेले स्वामींचे समाधीस्थळ आहे. येथील समाधी शिळेवर चांदीच्या मखरात स्वामींचा चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला आहे. मुखवट्यासमोर पादुका समाधी शिळेच्या मागील बाजूस विठ्ठलरखुमाईच्या वस्त्रालंकारित मूर्ती आहेत. समाधी शिळेच्या खालच्या बाजूस ध्यानगुंफा आहे. येथे स्वामींनी प्रत्यक्ष समाधी घेतली होती.

मंदिरानजीकच स्वामींचे जन्मघर आहे. जुन्या कोकणी पद्धतीचे ओटीपडवीचे हे कौलारू घर नित्यनेमाने शेणाने सारवले जाते. येथे स्वामींची आकर्षक मूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूंना त्यांच्या प्रतिमा आहेत. येथे स्वामींची जुनी छायाचित्रे, तसेच ज्ञानेश्वरांचा जीवनपट उलगडवून सांगणारे चित्रमय प्रदर्शनही आहे. जन्मघराच्या मागच्या बाजूला एक तुळस आणि जुनी खोल आयताकृती विहीर आहे. या घराच्या बाजूला असलेल्या एका खोलीत स्वामींची मूर्ती असून बाजूला दोन छोट्या दीपमाळा आहेत. येथे राधाकृष्ण, श्रीरामलक्ष्मणसीताहनुमानाच्या आकर्षक मूर्ती, तसेच ज्ञानेश्वरांची प्रतिमा आहे. मंदिराच्या आवारात स्वामींचे शिष्य रघुनाथ वासुदेव ऊर्फ भाऊराव देसाई यांचा पुतळा आहे.

मंदिरात नित्यनेमाने काकड आरती, समृद्ध पूजा, तसेच शेजारती होते. दुपारी सायंकाळी होणाऱ्या आरतीनंतर भाविकांना खिचडीचा महाप्रसाद दिला जातोयेथे आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा उत्सव होतो. श्रावण वद्य नवमी ते द्वादशीपर्यंत स्वामींचा पुण्यतिथी उत्सव होतो. त्यावेळी ७२ तास अखंड राम कृष्ण हरीचा नामजप महाप्रसाद होतो. मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते द्वादशीपर्यंत स्वामींचा जन्मदिन सोहळा होतो. पौष वद्य पंचमी ते द्वादशी या कालावधीत स्वामींचे गुरू गणेशनाथ महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव होतो. तेव्हा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह होतो. फाल्गुन वद्य प्रतिपदा ते रंगपंचमीदरम्यान होणाऱ्या मंदिराच्या वर्धापनदिन सोहळ्यात रोज सायंकाळी प्रवचन होते.

मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर मंडळाचे निःशुल्क भक्त निवास आहे. (संपर्क : ९३५९९५९०७९) येथील तळमजल्यावर निःशुल्क आरोग्य केंद्रही चालवण्यात येते. मंदिर परिसरात महिला सबलीकरणासाठी शिवणकाम भरतकाम वर्गही चालवले जातात. पावस एसटी स्थानकाच्या पुढे एक पूल ओलांडून गेल्यावर उजव्या हाताला स्वामींनी सुमारे ४० वर्षे वास्तव्य केलेले अनंत निवास आहे. त्याच्या प्रवेशद्वाराबाहेर स्वामींची प्रतिमा, थोर साधूसंत, सिद्ध पुरुषांच्या प्रतिमा, तसेच देवदेवतांच्या मूर्ती आहेत. आत प्रवेश केल्यावर ओटी डाव्या बाजूला स्वामींची खोली आहे. एकावेळी एका व्यक्तीलाच या खोलीत प्रवेश करता येतो. आत स्वामींची मूर्ती तसेच जुनी छायाचित्रे आहेत. येथे स्वामींनी वापरलेल्या अनेक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. या वास्तूमध्येच स्वामींना निर्गुणनिराकार श्रीमहाविष्णूच्या सगुण रूपाचा साक्षात्कार झाल्याचे बोलले जाते. येथेच स्वामींनी सर्वाधिक लिखाण केले. त्यामध्ये श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी, श्रीभावार्थगीता, श्रीअभंग अमृतानुभव, संजीवनी गाथा (अभंग संग्रह), चांगदेव पासष्टी आदी अनुवादित ग्रंथांचा समावेश आहे. या खोलीतच श्रीधरस्वामी, गगनगिरी महाराज, भालचंद्र महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आदींनी स्वामींची भेट घेतली होती.

उपयुक्त माहिती:

  • पावस एसटी स्थानकापासून किमी, तर रत्नागिरीपासून १७ किमी अंतरावर
  • मुंबई, पुणे, रत्नागिरी येथून पावससाठी एसटी सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ, कार्यालय : ०२३५२ २३७२५८, २३७१५८
  • Email : swamiseva39@gmail.com
Back To Home