समर्थस्थापित मारुती

उंब्रज / मसूर / शहापूरचा मारुती

ता. कराड, जि. सातारा

समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींना समर्थ संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कृष्णा वारणा नद्यांच्या खोऱ्यात ही मंदिरे आहेत. त्यामधील चाफळची दोन, शिंगणवाडी, माजगाव, उंब्रज, मसूर शहापूर ही सात स्थाने सातारा जिल्ह्यात आहेत. या सातपैकी कराड तालुक्यात तीन मंदिरे असून त्यामध्ये उंब्रजचा मारुती, मसूरचा मारुती शहापूरचा मारुती यांचा समावेश आहे. पुणेसाताराकोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाला लागून उंब्रज गाव असून या गावाच्या पूर्वेकडे मसूर शहापूर येथील मंदिरे आहेत.

समर्थ रामदास स्वामी यांनी १६४९ मध्ये उंब्रज येथे स्थापन केलेला मारुतीप्रताप मारुतीम्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरातील मूर्ती चुना, वाळू, ताग यापासून घडविलेली आहे. ती साधारणतः सहा फूट उंचीची असून तिला चांदीचे डोळे आहेत. मूर्तीच्या डाव्या पायाखाली दैत्याचे डोके आहे. मारुतीच्या कमरेला लंगोट, पायात तोडे, खांद्यावर दोन्ही दंडांवर रूळलेले उपरणे, डावा हात कमरेवर आणि उजवा हात डोक्यापर्यंत नेऊन उगारलेला पंजा दिसतो. शेपूट शरीराच्या मागून डोक्यावरून दंडाशी येऊन परत वर वळली आहे. असे सांगितले जाते की मारुतीची स्थापना झाल्यानंतर समर्थांनी या मठामध्ये सलग १३ दिवस कीर्तन केले होते. समर्थांच्या वापरात असलेली कुबडी आजही या मंदिरात जतन करून ठेवण्यात आलेली आहे. समर्थ अनेकदा चाफळहून उंब्रज येथे कृष्णा नदीत स्नानासाठी येत. तसेच पूजापाठ करून मंदिरात भोजन घेत असत.

केशवस्वामी हे उंब्रज येथील मठाधिपती होते. समर्थांनी या मठाची पूजा दैनंदिन उपासनेची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. केशवस्वामी यांनीच समर्थ रामदास स्वामी यांचा चाफळ येथे सुमारे ३० वर्षे असलेला अस्थिकलश कल्याणस्वामी यांच्या अस्थींचे एकत्रित विसर्जन केले होते. या मठापासून जवळ असलेल्या कृष्णा नदीच्या पात्राशेजारी केशवस्वामींची समाधी आहे. चैत्र महिन्यात रामनवमी आणि हनुमान जयंतीचा मोठा उत्सव येथे साजरा होतो. या मारुतीची स्थापना मठात झालेली असल्यामुळे येथील मंदिराला कळस नाही. दररोज सकाळी ते रात्री १०.३० पर्यंत मंदिरातील मारुतीचे दर्शन घेता येते.

उंब्रजपासून १२ किमी अंतरावर मसूर हे गाव आहे. मसूर गावातील स्थापित मारुती वीर मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. १६४६ मध्ये समर्थांनी याची स्थापना केली होती. चुन्यापासून तयार केलेली सुमारे दीड मीटर उंचीची पूर्वाभिमुख मूर्ती येथे आहे. अकरा मारुतींमधील ही सर्वांत देखणी मूर्ती असल्याचे सांगितले जाते. प्रसन्न मुद्रा, डोक्यावर मुकुट, गळ्यात माळ, खांद्यावर जानवे असे मूर्तीचे स्वरूप आहे. मारुतीने डाव्या पायाखाली जंबुमाळी दैत्याला दाबून धरलेला आहे. सध्या या मंदिराची दैनंदिन पूजाविधीची जबाबदारी सज्जनगड येथील श्रीरामदास स्वामी संस्थानाकडे आहे.

एका आख्यायिकेनुसार, मसूरमध्ये खूप वजनदार मुसळ घेऊन फिरणारा एक पैलवान होता. त्याला मुसळराम पैलवान असे नाव पडले होते. समर्थांनी त्यालाच मसूरच्या मठाचा अधिपती केला होता. येथील एका यवन अधिकाऱ्याने मुसळरामाला मारण्याचा कट रचला होता. समर्थांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी येथे येऊन स्वतः त्या अधिकाऱ्याला चोप दिला होता.

असे सांगितले जाते की मसूर येथे रामदास स्वामींनी चार वर्षे मोठ्या थाटामाटात रामनवमीचा उत्सव साजरा केला. या उत्सवाच्या मिरवणुकीत एका वृक्षाची मोठी फांदी आड येत होती. तेव्हा समर्थांनी आपल्या सेवेत असणाऱ्या अंबाजी नावाच्या मुलाला या फांदीच्या शेंड्याकडे बसून ती तोडण्यास सांगितले. त्याने आपल्या गुरूंची आज्ञा मानून फांदी तोडायला सुरुवात केली. त्यावेळी तोडलेल्या फांदीसह अंबाजी विहिरीत पडला. अंबाजी विहिरीत पडलेला पाहताच सर्वांनी गर्दी केली. त्या वेळी समर्थांनी विहिरीच्या काठाशी उभे राहूनअंबाजी, सर्व कल्याण आहे ना?’ असा आवाज दिला. त्यावर त्या खोल विहिरीतूनकल्याण आहेअसे अंबाजीचे उत्तर आले. तेव्हापासून हा शिष्य कल्याण या नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे कल्याणस्वामी हे रामदासांचे पट्टशिष्य ठरले. समर्थ संप्रदायामध्ये कल्याणस्वामींचे स्थान हे रामदास स्वामींच्या खालोखाल मानले जाते.

कराड तालुक्यातील तिसरे मारुती मंदिर शहापूर येथे आहे. ‘चुन्याचा मारुतीम्हणून ते प्रसिद्ध आहे. उंब्रजपासून १२ किमी अंतरावर असलेले हे मंदिर अकरा मारुतींमध्ये क्रमानुसार प्रथमस्थानी आहे. १६४४ साली या मारुतीची समर्थांनी स्थापना केली होती. या मारुतीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मारुतीची उत्सवमूर्ती जोपर्यंत चाफळ येथील श्रीराम मंदिरात जात नाही, तोपर्यंत तेथील रामजन्मोत्सव सुरू होत नाही. या मारुतीला त्या उत्सवात मानाचे स्थान असते.

या ठिकाणाची आख्यायिका अशी की चाफळ परिसरात वास्तव्य असताना समर्थ रामदास स्वामी शहापूर येथील सतीबाई कुलकर्णी हिच्या घरीजय जय रघुवीर समर्थअसे म्हणत रोज भिक्षा मागण्यासाठी येत असत. परंतु सतीबाईंना रामाचे नाव घेतलेले आवडत नसे, त्यामुळे ती नाराजीनेच समर्थांना भिक्षा देत असे. कारण तिचा असा समज होता की रामाचे नाव केवळ अंतकाळीच घेतले जाते. त्यामुळे घरात काहीतरी विपरित घडेल, अशी तिला काळजी वाटत असे.

एके दिवशी नेहमीप्रमाणे समर्थ तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेले, परंतु बराच वेळ होऊनही सतीबाई बाहेर आली नाही. चौकशी केली असता समजले की तिचा नवरा बाजीपंताला विजापूरच्या बादशहाने महसुलाच्या कामात चूक झाली म्हणून पकडून नेले होते. तेव्हा समर्थांनी तिला आश्वासन दिले की मी आजपासून ११ दिवसांमध्ये त्याला सोडवून आणेन. त्यानुसार समर्थ विजापूरला बादशहाकडे गेले. हिशेबातील चूक दाखवून त्यांनी बाजीपंतांची सुटका केली. तेव्हापासून सतीबाईने समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करण्याचा निश्चय केला. त्यामुळे तिला कधी कधी चार चार दिवसांचा उपवास घडू लागला. हे समजल्यावर समर्थांनी त्या दाम्पत्याला अनुग्रह देऊन रामनामाचा जप करण्यास सांगितले. शहापुरात मारुतीच्या मूर्तीची स्थापना करून या मूर्तीचे तीर्थ घेऊन रोज भोजन करण्यास सांगितले. त्यासोबतच समर्थांनी स्वतःजवळ असलेली मारुतीची पंचधातूची लहान मूर्ती त्यांना दिली. हीच मूर्ती उत्सवमूर्ती म्हणून या मंदिरात मुख्य मूर्तीसमोर स्थानापन्न आहे.

उंब्रजमसूर रस्त्यावरून शहापूरकडे जाण्यासाठी फाटा आहे. येथून किमी अंतरावर शहापूर येथील नदीच्या काठावर मारुती मंदिर आहे. येथील मारुतीची मूर्ती दोन मीटर उंचीची असून मूर्तीचा चेहरा काहीसा उग्र चेहऱ्यावर मिशाही असाव्यात, असे वाटते. डोक्यावर गोंड्याची टोपी असून डाव्या पायाने दैत्याला दाबून ठेवलेले आहे. पायांत तोडे, दंडांवर बाजूबंद आणि मनगटांत कंकणे आहेत. शेपूट डोक्यावरून डाव्या गुडघ्यापर्यंत येऊन पुन्हा वर वळलेली दिसते.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून उंब्रज ४० किमी अंतरावर
  • उंब्रज ते मसूर १२ किमी, उंब्रज ते शहापूर १२ किमी
  • सातारा कराड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने सर्व मंदिरांजवळ जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home