सुंदरनारायण गणेश मंदिर

देवबांध, ता. मोखाडा, जि. पालघर

ठाणे व नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागी असलेला पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. कुपोषण, अनारोग्य, व्यसनाधिनता आदी समस्यांशी झुंजणाऱ्या येथील आदिवासींना धर्म, अध्यात्म्याच्या मार्गाने सुसंस्कारित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उभारण्यात आलेले गणेश मंदिर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात देवबांध येथे आहे. मंदिरानजीकच्या नदीपात्रात देवानेच बांध घातल्याच्या आख्यायिकेमुळे ‘देवबांध’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील पंचधातूचा गणेश जागृत असल्याची ख्याती आहे. शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेल्या या मंदिराची वास्तू नाशिकमधील श्रीसुंदरनारायण मंदिराची प्रतिकृती आहे.

पालघर जिल्ह्याच्या पूर्वेला असलेल्या जंगलव्याप्त, डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला मोखाडा तालुका आदिवासीबहुल आहे. वारली, कोकणा, कातकरी, ढोरकोळी, ‘क’ ठाकूर, ‘म’ ठाकूर आदी आदिवासी जमातीची येथे मोठी लोकसंख्या आहे. येथील अशिक्षित आदिवासी समाजात संस्कारक्षम शिक्षणाचे नंदनवन फुलावे, श्रद्धाळू असलेल्या या समाजाला अध्यात्म्याच्या मार्गाने सुस्कांरित करावे, या समाजातील लोकांना व्यसनमुक्त करून रोजगार उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ संघटक मोरोपंत पिंगळे यांच्या पुढाकाराने सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाच्या माध्यमातून श्रीसुंदरनारायण गणेश संस्कार केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राने उभारलेल्या या मंदिरात १२ फेब्रुवारी १९८६ रोजी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यास परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. येथे गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यापासून परिसरातील अनेक आदिवासी तसेच भाविक दर्शनासाठी येऊ लागले. हे मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या मोखाडा तालुक्यातील खोडाळा हे पर्यटनस्थळ, वाशाळा येथील पांडवलेणी, सूर्यमाळ येथील सनसेट पॉइंट, ओसरविरा येथील प्राचीन शिवमंदिर, मोखाडा येथील जगदंबामाता मंदिर प्रसिद्ध आहेत. या तालुक्यात अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले देवबांध हे निसर्गरम्य स्थान आहे. पिंजाळ नदी येथून नागमोडी वळणे घेत वाहत जाते. येथील एका भल्यामोठ्या शिळेने नदीचे अर्ध्याहून अधिक पात्र अडवलेले आहे. ही शिळा येथे नैसर्गिकरीत्या पडलेली नसून, ती पात्रात जाणीवपूर्वक आडवी ठेवल्यासारखी दिसत असल्याने देवांनीच हा शिळारूपी बांध घातला आहे, अशी आख्यायिका येथे सांगण्यात येते. काही स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, देवांनी नव्हे तर पाच पांडवांपैकी बलशाली असलेल्या भीमाने ही शिळा येथे आडवी ठेवली आहे. त्यामुळेच या परिसराला ‘देवबांध’ असे नाव पडले आहे.

निसर्गाच्या कुशीत शांत व प्रसन्न वातावरणात हे मंदिर वसलेले आहे. रस्त्याला लागून असलेल्या मंदिराच्या कमानीतून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात भाविकांसाठी बाके ठेवलेली आहेत. नदीकाठावर वसलेल्या या मंदिर परिसरात एक विहीरही आहे. अनेक खांबांवर असलेला खुला सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या मंडपावर एक मुख्य घुमट व त्या भोवती तीन छोटे घुमट आहेत. गर्भगृहाच्या वरच्या भागात एक मनोऱ्याच्या आकाराचे शिखर आहे.
गर्भगृहातील वज्रपीठावर गणेशाची पंचधातूची मूर्ती आहे. या मूर्तीच्या अंगावर कोरीव अलंकार आहेत. या चतुर्भुज मूर्तीच्या लंबोदराभोवती सर्पमेखला आहे. मूर्तीच्या मागील हातात खङ्ग आणि परशू तर पुढील उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. गणेशाच्या डाव्या हातात मोदक आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीजवळ मूषक आहे. वसंतराव दीक्षित या गणेश भक्ताने श्रीसुंदरनारायण गणेश संस्कार केंद्राला ही मूर्ती भेट म्हणून दिली होती. अनेक भाविक तसेच पर्यटक या मंदिरात येऊन येथील जागृत गणेशाचे दर्शन घेतात. येथे भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. माघी गणेशोत्सवादरम्यान गणेश जयंतीच्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याच्या दिवशी पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसोबतच मुंबई, ठाणे, रायगड व नाशिक आदी जिल्ह्यांतून दहा हजारांहून अधिक भाविक गणेशाच्या दर्शनासाठी येतात. गणेश संस्कार केंद्रातर्फे त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते.

उत्सवादरम्यान व्यसनाधीन आदिवासी व्यक्तींना शुचिर्भूत अवस्थेत येथे आणून त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीस व्यसनमुक्तीची शपथ दिली जाते. आदिवासी समाज मूलतःच श्रद्धाळू असल्याने त्याच्यावर देवासमोर घेतलेल्या या शपथेचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून येथील आदिवीसींचे प्रबोधन करून त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा कार्यक्रम संस्थेचे कार्यकर्ते करत असतात. येथे अनेक आदिवासी बांधव भजन-कीर्तन आदी कार्यक्रम करतात.
सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाच्या माध्यमातून श्रीसुंदरनारायण गणेश संस्कार केंद्रातर्फे आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जातो. आदिवासींमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत व्हावी, या हेतूने केंद्रातर्फे ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमांतर्गत परिसरातील ४० गावांना गणपतीच्या ४० मूर्तींचे वाटप केले जाते. येथे दर महिन्यातील दुसऱ्या तसेच चौथ्या रविवारी ठाणे, डोंबिवली, घोटी, इगतपुरी येथील डॉक्टर येतात. येथे परिसरातील शंभरहून अधिक गाव-पाड्यांतील रुग्णांवर विनामूल्य औषधोपचार करण्यात येतात. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना ठाणे, नाशिक येथील मोठ्या रुग्णालयांत पाठवले जाते. संस्थेतर्फे परिसरातील वनवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवले जाते. मंदिरासमोर सामुदायिक विवाहही पार पडतात. परिसरातील जंगलातील औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठीही संस्थेतर्फे प्रयत्न केले जातात. नाशिक येथील सुंदरनारायण देवस्थानाने दिलेल्या जमिनीत केंद्रातर्फे स्थानिक आदिवासींच्या सहकार्याने भात, नाचणी आदी पिके घेतली जातात. या शिवाय अत्याधुनिक तंत्राद्वारे शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठीचे प्रयोगही केंद्रातर्फे परिसरातील आदिवासी बांधवांना दाखवले जातात.

उपयुक्त माहिती

  • मोखाडा येथून १८ किमी, तर पालघरपासून ९२ किमी अंतरावर
  • मोखाडा, खोडाळा व इगतपुरी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही<
Back To Home