परळी वैजनाथ हे नाव उच्चारताच, बारा ज्योतिर्लिंगांच्या शृंखलेतील प्रभू वैजनाथाचे सात्त्विक आणि तेजस्वी रूप डोळ्यांसमोर तरळते. तथापि, हे तीर्थक्षेत्र शिवशंभूंसोबतच विघ्नहर्ता गणेशाच्या विविध रूपांतील वास्तव्याने पावन झालेले एक पवित्र स्थान आहे. परळीच्या या पुण्यभूमीत गणरायाची प्राचीन मंदिरे ठिकठिकाणी विखुरलेली आहेत आणि विशेष म्हणजे या क्षेत्राच्या चारही दिशांना गणेशाची मुखे असलेली ही मंदिरे आहेत. यापैकी दक्षिणमुखी गणेश मंदिर हे येथे येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील वैशिष्ट्य असे की या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही बिनसोंडेची आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैजनाथ मंदिराच्या परिसरात प्रवेश करतानाच गणेशाच्या अस्तित्वाची जाणीव होते. मुख्य मंदिरातील नंदीच्या गर्भगृहात, नंदीजवळच एक गणेशमूर्ती विराजमान आहे. प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी आत जाण्यापूर्वी या गणेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. पश्चिमेकडे मुख असलेल्या या गणेशाला वंदन करून भाविक मुख्य गर्भगृहाकडे मार्गस्थ होतात. त्यानंतर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन बाहेर पडताना, कासव गाभाऱ्यात उजव्या हाताला पूर्वेकडे मुख असलेली दुसरी गणेशमूर्ती लक्ष वेधून घेते. याशिवाय मंदिर परिसरातही गणेशाचा हा पहारा कायम असल्याचे दिसते. हरिहर तीर्थाच्या पायऱ्यांवर दक्षिणाभिमुख आणि मंदिराच्या महाद्वारावर पूर्वेकडे पाहणाऱ्या अशा एकूण चार प्राचीन गणेशमूर्ती वैजनाथ मंदिराच्या चारही बाजूंना आहेत.
या मंदिरापासून काही अंतरावर संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिरासमोर अत्यंत जागृत आणि प्राचीन असे दक्षिणमुखी गणेश मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीचे रूप वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. हा गणेश बिनसोंडेचा आहे. तसेच एखाद्या मल्लाप्रमाणे बैठक मारून बसलेली येथील मूर्ती भव्य आणि तेजस्वी भासते. परळी क्षेत्री येणारे भाविक सर्वप्रथम या मल्लरुपातील गणेशाचे दर्शन घेतात, अशी येथील पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की दैत्यराज विघ्नासुराचा वध करण्यासाठी या ठिकाणी गणेशाचा अवतार झाला. ब्रह्मदेव आणि महाजुंभेशीचा पुत्र असलेला विघ्नासुर हा अतिशय देखणा होता, म्हणून त्याचे नाव ‘सुंदर’ असे ठेवण्यात आले होते. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे त्याला अपार शक्ती मिळाली होती. ज्याला तो आलिंगन देईल त्याचा मृत्यू ओढवेल, असे सामर्थ्य त्याला प्राप्त झाले होते. पण या शक्तीचा त्याला गर्व झाला आणि त्याने ऋषीमुनींचा, लोकांचा छळ मांडला. त्याच्या या क्रूर कर्मामुळेच त्याचे नाव विघ्नासुर पडले. त्याच्या त्रासाला कंटाळून जेव्हा ऋषीमुनींनी ब्रह्मदेवाला साकडे घातले, तेव्हा त्यांनी शंकराची आराधना करण्याचा मार्ग सुचवला. भगवान शंकराने पार्वतीच्या पोटी जन्म घेणारा पुत्रच या असुराचा वध करेल, असा दिलासा दिला.
याच काळात, सुरक्षिततेसाठी भगवान शंकराने माता पार्वतीला प्रभाकरक्षेत्र म्हणजेच आताच्या परळीला मुक्कामी ठेवले होते. परळी परिसरातील पद्म सरोवराकाठी (म्हणजेच पूस, घाटनांदूर परिसरात) माता पार्वती विश्रांती घेत असताना, विघ्नासुर ब्राह्मणाच्या वेशात तिथे पोहोचला व त्याने पार्वतीच्या पोटी प्रवेश करून जन्माला येणाऱ्या बाळाचे शीर कापून टाकले. त्याच वेळी दुसरीकडे गजासुराशी युद्ध करून, त्याचे मस्तक घेऊन भगवान शंकर परळीत पोहोचले. शिराविना जन्माला आलेले बालक पाहून पार्वती दुःखी झाली, तेव्हा शंकराने गजासुराचे ते हत्तीचे मस्तक बाळाच्या धडाला जोडून त्याला सजीव केले. पुढे याच बालकाने चौदा विद्या आणि चौसष्ट कला अवगत करून शस्त्रसज्ज होत विघ्नासुराशी घनघोर युद्ध केले आणि त्याचा नाश केला. ज्या गणेशाने हे पराक्रम गाजवले, तोच हा परळीचा दक्षिणमुखी गणेश होय.
वैजनाथ मंदिरापासून साधारणतः १०० मीटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रांगणाभोवती आवारभिंत आहे. आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात मंदिरासमोर भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे म्हणून दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक लांब सभामंडप व त्यापुढे प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मूळ गर्भगृहापुढे नंतरच्या काळात हा सभामंडप बांधल्याचे जाणवते. या सभामंडपात प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत डावीकडे व उजवीकडे लांब अशी कक्षासने आहेत. सभामंडपात मध्यभागी लोखंडी रेलिंग लावल्याने दर्शनाला जाण्यासाठी व परत येण्यासाठी असे दोन मार्ग तयार झाले आहेत. मंदिराचे गर्भगृह आकाराने लहान आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीत गणेशाची शेंदूरचर्चित भव्य मूर्ती आहे. या मंदिराच्या शिखरावर गणेशाच्या विविध रूपांतील मूर्ती आहेत.
या मंदिरात दररोज श्रींची पूजा-अर्चा, अभिषेक आणि सायंकाळी आरती व महाप्रसाद होतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटेपासून या गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव आणि माघ महिन्यातील गणेश जयंती हे दोन्ही उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. याप्रसंगी महापूजा, कीर्तन आणि लघुरुद्राच्या मंत्रघोषाने परिसर दुमदुमून जातो.