सोनाजी महाराज मंदिर

सोनाळा, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा

विदर्भाच्या पावन भूमीला लाभलेली संतांची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. या परंपरेतील एक तेजस्वी नाव म्हणजे संत सोनाजी महाराज. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे या थोर संताचे समाधी मंदिर स्थित आहे. ‘भगवंताच्या चरणी पूर्णतः समर्पित झाल्यानेच खरी आत्मशांती लाभते,’ हा मौलिक विचार सोनाजी महाराजांनी आपल्या जीवनातून जनसामान्यांना दिला. शिवशंकर आणि हनुमानाचे परम भक्त असलेल्या या महात्म्याच्या जीवनप्रवासातील अनेक अद्भूत प्रसंग आजही विदर्भात मोठ्या श्रद्धेने सांगितले जातात. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेशातूनही अनेक भाविक नतमस्तक होण्यासाठी येतात.

सोनाजी महाराजांचा जन्म सुमारे तीनशे वर्षांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात एका गवळी कुटुंबात झाला. बालपणीच पितृछत्र हरपल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना मामाच्या सुके परिवाराकडे सोनाळा येथे आणले. मामाच्या घरी राहूनच ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्यावर गुरे राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दिवसा वनात गुरे राखत असतानाच महाराजांच्या अंतर्मनात भक्तीचा उगम झाला. रात्रीच्या वेळी हातात दगडाचे टाळ घेऊन ‘गोविंदा-गोविंदा’चा गजर करत ते अंबाबरवा अभयारण्यातील मांगेरी महादेव, ऋषी महाराज संस्थान आणि वारी भैरवगडावरील वारी हनुमानाचे दर्शन घेत असत. त्यांच्या या अखंड नामस्मरणामुळे वारी गडाच्या राजाची झोपमोड होत असे. त्यावरून संतापून राजाने त्यांना एकदा किल्ल्यात कोंडून ठेवले होते, अशीही एक लोककथा प्रचलित आहे.

महाराजांच्या आध्यात्मिक शक्तीचा प्रत्यय गावातील लोकांना अनेकदा आला. ते रात्री कोठे जातात हे पाहण्यासाठी काही लोकांनी त्यांच्यावर पाळत ठेवली असता, त्यांना सोनाजी महाराजांसोबत दोन वाघ चालताना दिसले. भीतीपोटी लोकांनी विचारणा केल्यावर महाराजांनी ते वाघ आपले सोबती असल्याचे शांतपणे सांगितले. मांगेरी महादेवाच्या स्थानी त्यांनी पाण्याने दिवा प्रज्वलित केला आणि महादेवाची आरती झाल्यावर भक्तांना प्रसादासाठी शेणाचे ‘पो’ (शेणाचे थापलेले गोळे) दिले. ज्यांनी हे पो फेकून दिले त्यांना पश्चात्ताप झाला, मात्र ज्यांनी ते घरी नेले, त्यांना शेणाचे रूपांतर सोन्यात झाल्याचे त्यांना दिसले. अशा अनेक चमत्कारांमुळे महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली. नागपूरचे रघुजीराजे भोसले यांच्या आजारी पुत्राला महाराजांनी केवळ आपल्या स्पर्शाने आणि आशीर्वादाने बरे केले. त्यावेळी महाराजांच्या सांगण्यानुसार त्या राजपुत्राने शुद्धीवर आल्यावर अंबाडीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि उडदाच्या डाळीचे वरण असा साधा आहार मागितला. भोसले घराण्याने या उपकाराची परतफेड म्हणून दिलेले गावजेवण आजही एका मोठ्या परंपरेच्या रूपात जपले गेले आहे.

सोनाजी महाराजांच्या महासमाधीनंतर सोनाळा येथे त्यांच्या भव्य समाधी मंदिराची उभारणी करण्यात आली. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले सोनाळा हे जिल्ह्यातील एक मोठे गाव आहे. पूर्वी हे गाव एका परगण्याचे मुख्यालय होते असे सरकारी गॅझेटियरमध्ये नमूद आहे. हे गाव वाघ, लांडगे, अस्वल, हरिण आदी प्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबाबरवा अभयारण्याने वेढलेले आहे. गावातील बसस्थानकापासून काही अंतरावर हे मंदिर वसले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या वाहनतळाच्या जागेत संत सोनाजी महाराजांचा उत्सवकाळात वापरला जाणारा मोठा रथ आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून आत आल्यावर दगडी फरसबंदी केलेले प्रांगण लागते. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. अर्धखुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात अंतराळासमोर असलेल्या चौथऱ्यावर हनुमानाची संगमरवरी मूर्ती व कासवमूर्ती आहेत.

सभामंडपापेक्षा उंच असलेल्या अंतराळासाठी चार पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडील भिंतीवर असलेल्या देवकोष्ठकात शिवशंकरांची मूर्ती आहे आणि त्यांच्या मांडीवर पार्वतीमाता व गणेश बसलेले आहेत. उजवीकडील भिंतीवर असलेल्या देवकोष्ठकात गोपाळकृष्णाची मूर्ती आहे व त्याच्या बाजूला गोपिका आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर दोन्ही बाजूला द्वारपालशिल्प व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी असलेल्या सोनाजी महाराजांच्या समाधीस्थानावर चांदीच्या पादुका व त्यामागे त्यांची मूर्ती आहे. महाराजांच्या मूर्तीच्या मागे असलेल्या भिंतीतील देवकोष्ठकात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर मोठे घुमटाकार शिखर आहे. मंदिराची बाहेरील भिंतीला अनेक कोन आहेत. त्यावर सरस्वती, हनुमान, साधू व हत्ती अशी चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या आवारात एक शिवमंदिर असून येथे दत्तात्रेयांचीही मूर्ती आहे.

या मंदिरात दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला पाच दिवसांची मोठी यात्रा भरते. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विदर्भातील सर्वात मोठा मानला जाणारा रथोत्सव होय. पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता मोठ्या उत्साहात हा सजवलेला लाकडी रथ गावातून निघतो. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढून या रथाचे स्वागत केले जाते. या यात्रेदरम्यान भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो. सुमारे १२१ क्विंटल ज्वारीच्या भाकरी, ३५ क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण आणि अंबाडीची भाजी असा हा महाप्रसाद हजारो भाविक ग्रहण करतात. समाधी मंदिराच्या या पवित्र परिसरात केवळ ही यात्राच नव्हे, तर रामनवमी, गोकुळाष्टमी आणि आषाढी एकादशीची पायदळ वारी यांसारखे आध्यात्मिक उपक्रमही प्रतिवर्षी साजरे केले जातात. राज्य सरकारनेही या मंदिराचा ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देऊन गौरव केलेला आहे.

उपयुक्त माहिती:

  • संग्रामपूर येथून १६ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ११० किमी अंतरावर
  • संग्रामपूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : प्रल्हाद कुटे, मो. ९६६५६६४२९८,
  • प्रकाश बोधिरकर, मो. ९४०३२५४७३२

सोनाजी महाराज मंदिर

सोनाला, ताल. संग्रामपुर, जिला. बुलढाणा

Back To Home