लिंगेश्वर महादेव मंदिर

भोन, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे पयोष्णी नदीच्या तीरावर लिंगेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे. हे मंदिर श्रीराम यांच्या जन्मापूर्वीचे पौराणिक स्थान मानले जाते. ‘पयोष्णी माहात्म्य’ पुराणातील संदर्भांनुसार, शृंग ऋषींनी येथे महादेवाची स्थापना करून तपश्चर्या केली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजा दशरथाने या पावन भूमीत पुत्रकामेष्टी यज्ञ केला, ज्याच्या फलश्रुतीतून श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रूघ्न यांचा जन्म झाला. पूर्ववाहिनी पूर्णा नदीच्या काठावरील हे शिवालय विदर्भातील अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते.

विदर्भातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावर ‘धूपेश्वर महादेव’ (हरसोडा, मलकापूर तालुका, बुलढाणा), ‘वांगेश्वर महादेव’ (तेल्हारा, बुलढाणा) आणि ‘लिंगेश्वर महादेव’ (भोन) ही महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. विदर्भातील आपल्या संपूर्ण प्रवासात पश्चिम वाहिनी असलेली पूर्णा नदी भोन या गावाजवळ पूर्व वाहिनी होते. त्यामुळे या स्थानाला पौराणिक काळापासून विशेष महत्त्व आहे. ‘पयोष्णी माहात्म्य’ या पुराणात भोन गावचा उल्लेख ‘भूवन’ असा करण्यात आला आहे. विभांडक ऋषींचे पुत्र तसेच कश्यप ऋषींचे नातू असलेल्या श्रृंग ऋषींनी येथील पूर्ववाहिनी पूर्णा नदीच्या तीरावर लिंगेश्वर महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी येथे कठोर तपश्चर्या केली. इक्ष्वाकू कुलातील अयोध्येचा राजा दशरथ याला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तीन राण्या होत्या. कौसल्येपासून राजा दशरथ याला शांता नावाची कन्या झाली. (शांता हिला कौसल्याची बहीण वर्षिणी आणि तिचा पती, अंगराज्याचा राजा रोमपाद यांनी दत्तक घेतले होते. पुढे श्रृंग ऋषींशी तिचा विवाह झाला.) मात्र, वंश चालवण्यासाठी दशरथाला पुत्रसंतती नव्हती. त्यामुळे राजा दशरथाने ऋष्यशृंग (श्रृंग) ऋषींच्या मुख्य पौरोहित्याखाली अश्वमेध यज्ञ तसेच पुत्रकामेष्टि यज्ञ केला. हा पुत्रकामेष्टी यज्ञ लिंगेश्वर मंदिरात पार पडला. या यज्ञादरम्यान अग्नितून अवतीर्ण झालेल्या महापुरुषाने राजा दशरथाला संतान देणारे, देवनिर्मित पायस दिले. राजा दशरथाने हे पायस आपल्या तिन्ही पत्नींना वाटून दिले. या पायस प्रसादाच्या योगे राजा दशरथाला कौसल्या, सुमित्रा व कैकेयीपासून राम, लक्ष्मण भरत व शत्रुघ्न हे चार पुत्र झाले, असे पौराणिक कथांमध्ये नमूद आहे. भोनजवळ विभांडक ऋषींनी यज्ञानिमित्त वास्तव्य केले होते, अशीही मान्यता आहे.

हे मंदिर असलेल्या भोन या गावात उत्खननादरम्यान आढळलेल्या सम्राट अशोकलाकालीन बुद्ध स्तूपामुळेही या गावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील पुरातत्त्व विभागाच्या डॉ. भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वाखाली या गावात २००२ मध्ये झालेल्या उत्खननादरम्यान हा स्तूप आढळला. सम्राट अशोकाने देशभऱात ८४ हजार स्तूप निर्माण केले होते. त्यापैकीच हा स्तूप असल्याचे सांगण्यात येते. या स्तूपाभोवती प्रदक्षिणा पथही आढळला. उत्खननादरम्यान अश्मयुगीन मानवी हत्यारे, काही विहिरी, सातवाहन काळातील नाणी, मृण्मयी अलंकार सापडले होते.

गावापासून दहा मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे. अलिकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अंड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्येही या मंदिराचा उल्लेख आहे. पूर्वी या मंदिराभोवती दगडी तटबंदी होती. ती जीर्ण झाल्यामुळे ती नव्याने बांधण्यात आली आहे. आता तटबंदीला एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीचे स्वरूप देण्यात आले आहे. दर्शनी भागातील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना बुरुज बनवण्यात आले आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर विस्तीर्ण प्रांगण लागते. मंदिरासमोर काळ्या पाषाणात घडवलेली नंदीची प्राचीन मूर्ती आहे. अर्धखुला सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपातील स्तंभ कमानीच्या आकाराने जोडलेले आहेत. गर्भगृहातील मूळ दगडी शाळुंका नक्षीदार पितळी पत्र्याने मढविलेली आहे. या शाळुंकेमध्ये लंबगोलाकार दगडी शिवलिंग आहे. त्यावर मोठ्या नागाने छत्र धरले आहे. वरच्या भागात असलेल्या गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. गर्भगृहातील देवकोष्ठकांमध्ये गणेशासह काही देव-देवतांच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या गर्भगृहावर मोठ्या आकाराचे घुमटाकार शिखर आहे. परिसरातील चिंचेच्या वृक्षाजवळ काही समाधी आहेत. येथे गणेशाच्या मूर्तीही दिसतात. येथून काही पावलांवरच देवीचे मंदिर आहे. या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरातील सर्वात मुख्य आणि मोठा उत्सव महाशिवरात्रीला साजरा केला जातो. त्यावेळी महादेवाची विशेष पूजा, रुद्राभिषेक आणि भजनांचे कार्यक्रम रात्रभर चालतात. श्रावण महिन्यातही येथे दर सोमवारी भक्तांची मोठी मांदियाळी असते. यावेळी अनेक भाविक कावडीने पूर्णा नदीचे पाणी आणून महादेवाला अर्पण करतात. कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. त्यावेळी संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो. प्रत्येक सोमवारी, एकादशी व प्रदोषला दुपारी १२ ते २ या वेळेत येथे आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

उपयुक्त माहिती:

  • संग्रामपूर येथून २१ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून १०० किमी अंतरावर
  • संग्रामपूर येथून भोन गावापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : गौरव ठाकरे, मो. ८६६८७२७७५५,
  • विकास आपतुरकार, मो. ९५२९३४१९४४

लिंगेश्वर महादेव मंदिर

भोन, ताल. संग्रामपुर, जिला. बुलढाना

Back To Home