संत सुपोजी महाराज मंदिर

पळशी सुपो, ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर, सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले पळशी सुपो हे गाव संत सुपोजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले एक जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते. विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात मागील तीनशे वर्षांपासून ‘भाग मांडण्याची’ आणि सकारात्मक ‘कौल’ घेण्याची अनोखी परंपरा जोपासली गेली आहे. संत सुपोजी महाराज यांच्या नावावरूनच या गावाला पळशी सुपो हे नाव पडल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारनेही या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देऊन या मंदिराचा गौरव केला आहे.

सुपोजी महाराज या गावात केव्हा आले, याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. असे सांगितले जाते की सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी ते आई पुनामाता आणि बहीण पद्मामाता यांच्यासह सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट अरण्यातून संचार करत येथे आले. या गावाजवळ त्यांच्या आईला तहान लागली तेव्हा सुपोजी महाराजांच्या घोड्याच्या टाचेच्या प्रहाराने येथे पाण्याची विहीर निर्माण झाली. गोड पाण्याच्या या विहिरीला गडिपी विहीर असे म्हणतात. या गावातील अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सुपोजी महाराजांनी येथेच वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

बुलडाण्यातील आसलगाव बाजारापासून सहा कि.मी. अंतरावर सुपोजी महाराजांच्या मंदिराची कमान आहे. येथून चार कि.मी. अंतरावरील धानोरा येथे महासिद्ध महाराजांचे मंदिर आहे. या कमानीपासून तेवढ्याच अंतरावर सुपोजी महाराजांचे देवालय आहे. नजीकच्या मोकळ्या जागेत वाहने उभी करता येतात. मंदिर परिसरात हार-प्रसाद, खेळणी तसेच अन्य वस्तूंची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत.

मंदिरासमोर प्रशस्त मंडप आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तसेच बाहेर पडण्यासाठी प्रत्येकी दोन प्रवेशद्वारे आहेत. अलीकडेच मंदिर परिसरातून थेट गर्भगृहासमोर येण्यासाठी दर्शनबारीही उभारण्यात आली आहे. मंदिर परिसरात एक विहीर आहे. खुल्या सभामंडपात उजवीकडे विठ्ठल-रखुमाईचे छोटे मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपात विणेकरी अखंड वीणावादन करत असतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नवसाचे नारळ टांगलेले असतात. गर्भगृहात फुलांनी सजवलेल्या चौथऱ्यावर पाच चांदीचे मुखवटे आहेत. येथे मध्यभागी सुपोजी महाराजांचे स्थान आहे. या चौथऱ्यावर लावण्यात आलेल्या चांदीच्या पत्र्यावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. येथे दोन्ही बाजूंना हंस कोरण्यात आले आहेत. या चौथऱ्याखाली पंचधातूचा नागफणा आहे आणि नजीकच विठ्ठल-रखुमाईच्या छोट्या मूर्ती आहेत. मंदिर परिसरात एक पाळणा ठेवण्यात आला आहे. अनेक दाम्पत्ये येथे अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलतात. नवसपूर्ती झाल्यानंतर बालकांना या पाळण्यात ठेवण्याची प्रथा आहे. मंदिराच्या गर्भगृहावर पांढऱ्या रंगाचे मोठे शिखर आहे. त्यावर शिखरांच्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत. त्यावर आमलक व कळस विराजमान आहेत. परिसरात भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी भक्तनिवास आहे. भक्तनिवासाच्या तळमजल्यावर मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे कार्यालय तसेच भंडाऱ्यासाठी उभारण्यात आलेली सभागृहे आहेत. येथील स्वयंपाकगृहात भंडाऱ्याचा स्वयंपाक केला जातो. येथे दर शनिवारी आरतीनंतर भाविकांना भंडाऱ्याचे वाटप करण्यात येते.

या मंदिरात नित्यनेमाने पूजा-अर्चा करण्यात येते. शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. रविवार हा सुपोजी महाराजांचा वार मानला जातो, त्यामुळे या दिवशी भाविकांची संख्या अधिक असते. सुपोजी महाराजांसमोर ‘भाग मांडण्याची’ (गुढी) परंपरा आहे. या वेळेत उजव्या बाजूला कौल मिळाल्यास मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे. सुपोजी महाराजांच्या आशीर्वादाने अनेक दुर्धर व्याधीही बऱ्या होतात, अशीही भाविकांची भावना आहे. केलेल्या नवसानुसार सुपोजी महाराजांना चांदीने बनवलेले पाळणे, डोळे, नागमूर्ती, घोडे, पावले, कान, नाक अर्पण केले जातात. नवसपूर्ती झाल्यानंतर भाविक येथे भंडारेही करतात. अनेक भाविक येथून अंगाराही घेऊन जातात. भाविकांना काळ्या पट्टीमध्ये फूल आणि अंगारा बांधून दिला जातो. भाविक तो काळ्या धाग्याने हातावर बांधतात.

या मंदिरात वर्षातून तीन वेळा ‘कुत्रोत्सव’ होतात. चंपाषष्ठी, पौष पौर्णिमा तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हे उत्सव होतात. त्यादरम्यान गावातील १८ ते ३५ वयोगटातील तरुण मंदिरासमोर मानवरूपी कुत्रे बनून डफल्यांच्या तालावर नृत्य करतात. गर्भगृहासमोर सुमारे तीन क्विंटलचा महाप्रसाद ठेवण्यात येतो. प्रवेशद्वाराजवळ स्वयंसेवक तैनात असतात. मानवरूपी कुत्रे आत ठेवलेल्या प्रसादाची लूट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मंदिरात आरती होईपर्यंत कोंडी फोडून मानवरूपी कुत्र्यांना मंदिरात शिरू न देण्याची खबरदारी स्वयंसेवक घेतात. सुमारे एक तास हे युद्धसदृश दृश्य सुरू असते. कुत्रोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक येथे येतात. त्यांना गुळाचा प्रसाद देण्यात येतो. कोंडी फुटल्यानंतर मंदिराच्या प्रसादाची लूट करण्यात येते.

पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी येथे मोठी यात्रा भरते. विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातून येणारे हजारो भाविक या यात्रेदरम्यान सुपोजी महाराजांचे दर्शन घेऊन नवस फेडतात. अनेक भाविक आदल्या दिवसापासूनच येथे मुक्कामी येतात. या उत्सवानिमित्त येथे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. येथील ‘काठी उत्सव’ ही प्रसिद्ध आहे. या उत्सवात रंगीत कापडांनी सजवलेल्या देवाच्या काठीची गावातून मिरवणूक काढण्यात येते. ही काठी मंदिरात आल्यावर या उत्सवाची सांगता होते. नवसपूर्ती झालेले भाविक मंदिराच्या परिसरातील शेतात भंडारे देतात. भाविक आपल्या शक्तीप्रमाणे वरण-भात, वांग्याची भाजी, भाकरी, दालभट्टीचे भंडारे देतात. अनेक भाविक येथे गव्हापासून बनवलेला तसेच शेणाच्या गोवऱ्यांमध्ये भाजलेला रोडगा भंडाऱ्यात देतात. या यात्रेदरम्यान परिसरात विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारी अनेक दुकाने थाटली जातात. या यात्रेत मिळणारी भगरीची शेव तसेच गावरान तुपापासून बनवलेला शिंगाड्याच्या पिठाचा दराफा प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या जळगाव जामोद, मुक्ताईनगर, नांदुरा येथील आगारांतून विशेष बसेसही सोडण्यात येतात.

उपयुक्त माहिती:

  • जळगाव जामोद येथून १२ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८२ किमी अंतरावर
  • जळगाव जामोद येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६३७७२७५९३, ९७६३५६७१५१

संत सुपोजी महाराज मंदिर

पल्शी सुपो, ताल। जलगांव जामोद, जिला. बुलढाणा

Back To Home