श्रीदत्त मंदिर

इटखेड, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा

भारतीय परंपरेत भगवान श्रीदत्त हे गुरुस्वरूपातील महत्त्वाचे दैवत मानले जातात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप असलेल्या श्रीदत्तांच्या वास्तव्याने अनेक स्थाने पवित्र झाली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील इटखेड हे गाव अशाच जागृत देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जाते. पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावाला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. गावात श्रीदत्तांचे प्राचीन मंदिर आहे. विशेष म्हणजे शेगावच्या श्री गजानन महाराजांनीही या स्थानी येऊन दर्शन घेतल्याची नोंद आढळते. दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. याप्रसंगी परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

या स्थानाची आख्यायिका अशी की पाचशे वर्षांपूर्वी या गावात परशुराम भिसे नावाचे गृहस्थ राहत असत. श्रीदत्तांचे निस्सीम भक्त असलेले भिसे दर पौर्णिमेला माहूर येथे दर्शनासाठी जात. मात्र, वार्धक्यामुळे त्यांना तेथे जाणे अशक्य होत होते. एके दिवशी माहूर येथे गेले असता त्यांनी ‘मला यापुढे दर्शनासाठी येणे शक्य होणार नाही’ असे श्रीदत्तांना सांगितले. त्यावेळी श्रीदत्तांनी प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. ‘तुला यापुढे येथे येण्याची गरज नाही, मी स्वतःच तुझ्यासोबत येतो’ असे म्हणाले. त्यानुसार ते भिसे यांच्यासोबत गावात येण्यासाठी निघाले. भिसे पुढे चालत होते आणि त्यांच्या मागून देव येत होते. गावातील पूर्णा नदीच्या पात्राजवळ आल्यावर देव नक्की आपल्या मागून येत आहेत का हे पाहण्यासाठी भिसे यांनी मागे वळून पाहिले. त्याक्षणीच श्रीदत्त थांबले आणि त्यांनी येथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी या परिसरात बोरवन होते. पावसाळ्यात पूर्णा नदीचे पाणी या स्थानापर्यंत येत असे. त्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये दत्तात्रयांची सेवा करणे कठीण होत असे. या अडचणीमुळे भिसे यांनी श्रीदत्तांना साकडे घातले. तेव्हा देवाने त्यांना पुन्हा दर्शन दिले आणि गावात येण्याची त्यांची विनंती मान्य केली. कालांतराने येथे मंदिर बांधण्यात आले. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्येही या मंदिराची माहिती देण्यात आली आहे. मूळ मंदिर १८५६ मध्ये बांधण्यात आले होते आणि १९५६ मध्ये त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. अलीकडेच झालेल्या आणखी एका जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या मंदिरासमोर छोटे प्रांगण आहे. सभामंडप आणि मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात मध्यभागी गर्भगृह आहे आणि येथे कमानीच्या आकाराने जोडलेल्या स्तंभांच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर दत्तांचे स्थान आहे. या स्थानाला येथे ‘विशेष’ असे म्हणतात. या स्थानासमोर असलेल्या लाकडी आसनावर पहिल्या रांगेत पितळी घोडे आहेत. ते काही भाविकांनी नवसाच्या पूर्ततेनंतर अर्पण केलेले आहेत. त्यामागील बाजूस दत्तात्रयांच्या पादुका व शंख आहे. मागील बाजूस दत्तात्रयांची त्रिमुखी पंचधातूची मूर्ती, मुखवटा तसेच तीर्थाचा कलश आहे. स्थानाच्या वरच्या बाजूला असलेल्या छताच्या भागात साखळदंडावर पूर्वी नवसाचे ‘भार’ लावले जात असत. आता येथे एका कापडात नारळ, विड्याची दोन पाने, खारीक, बदाम व एक रुपयाचे नाणे गुंडाळलेले असते. गर्भगृहाच्या मागील बाजूस श्रीदत्तात्रेयांचा शयनकक्ष आहे. रात्री आरती झाल्यावर देवाला येथे निजवले जाते. या कक्षात श्रीदत्तात्रेयांचा पलंग आहे. त्यावर दत्तपादुका, प्रतिमा, शंख, मोरपीस व नारळ ठेवण्यात आले आहेत. उजवीकडे दंड आहे. पलंगाच्या उजव्या बाजूकडील भिंतींवर दत्तात्रयांचे कपडे ठेवण्यात आले आहेत, त्यांना येथे ‘गलफ’ असे म्हणतात.

या मंदिरावर सुंदर शिखर आहे. शिखराच्या खालील बाजूस चौकोनी स्तरामध्ये कमानीच्या आकारात देवकोष्ठक असून या स्तराच्या वरच्या भागात कळसाच्या प्रतिकृती आहेत. त्यावरच्या भागातही खालीलप्रमाणेच रचना आहे. त्यावरील भागात कमलपुष्पाची रचना आणि त्यावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे. या मंदिराजवळच मंदिराच्या विश्वस्त मंडळाने बांधलेले सभागृह आहे. पूर्णा नदीच्या पात्राजवळ देवाचे मूळ स्थान आहे. मंदिराजवळच्या शेतातून येथे येण्यासाठी पायवाट आहे. एका औदुंबराच्या वृक्षासमोर असलेल्या सभामंडपात हे स्थान आहे व त्यावर भगवे कापड आहे. लहान मुलांचे जावळ काढण्यासाठीही अनेक भाविक येथे येतात.

गावातील मंदिरात दर गुरुवारी अनेक भाविक दर्शनासाठी येतात. भूतबाधा झालेल्या व्यक्तीला येथे आणल्यास ती व्याधी नष्ट होते, या समजुतीतून संबंधित व्यक्तीला येथे आणण्यात येते. त्यावेळी येथे कापूर जाळला जातो. येथे बुधवारी, शुक्रवारी, रविवारी, पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी श्रीदत्तात्रेयांना पूर्णा नदीचे जल व पंचामृताने स्नान घालण्यात येते. दत्त जयंतीनिमित्त आठ दिवस व गंगा दशहराच्या निमित्त दहा दिवस स्नान घालण्यात येते. दर पौर्णिमेला येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यांपैकी अनेक भाविक येथे अन्नदानही करतात. त्यावेळी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. हनुमान जयंतीच्या दिवशी गावात दत्तात्रयांचे आगमन झाल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे या दिवशीही येथे उत्सव होतो. दत्तजयंतीनिमित्त या मंदिरात भागवत सप्ताह होतो आणि आठव्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होते. या उत्सवादरम्यान आठही दिवस येथे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. येथे गोकुळाष्टमीही उत्साहात साजरी केली जाते.

उपयुक्त माहिती:

  • संग्रामपूर येथून २६ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ९२ किमी अंतरावर
  • संग्रामपूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

श्री दत्त मंदिर

इतखेड, ताल. संग्रामपुर, जिला. बुलढाणा

Back To Home