खटाव तालुक्यातील भूषणगडापासून जवळ असलेले गुरसाळे हे येथे असणाऱ्या पाच ज्योतिर्लिंगांमुळे प्रसिद्ध आहे. सोमेश्वर, गुप्तलिंग, रामलिंग, भावलिंग व शिवलिंग अशी त्यांची नावे आहेत. यापैकी सोमेश्वर व रामलिंग ही मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण व मोठी असून इतर मंदिरे लहान आहेत. याशिवाय या मंदिरांच्या परिसरात पन्नासहून अधिक विरगळी व या मंदिरांवर शेकडो शिल्पे आहेत. या मंदिरांची रचना, स्थापत्यकला, काही जुन्या बांधकामांचे अवशेष यांच्या अभ्यासावरून या गावाला चालुक्य आणि शिलाहार काळापासूनचा इतिहास असल्याचे सांगितले जाते.
या परिसरातील पाच ठिकाणांपैकी मुख्य ठिकाण आहे हेमाडपंती रचनेचे सोमेश्वराचे मंदिर. एक मीटर उंच चौथऱ्यावर असलेल्या या प्राचीन मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मूळ वास्तूमध्ये काहीसा फरक पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. या मंदिराला दोन सभामंडप आहेत. त्यापैकी बाहेरील सभामंडप नंतर बांधल्याचे जाणवते. सभामंडपाच्या दर्शनी बाजूस संत तुकाराम महाराज व समर्थ रामदास स्वामी यांचे पुतळे आहेत. या सभामंडपात एक दगडी नंदी असून त्याला पितळी पत्र्याने मढविले आहे. येथील दुसरा सभामंडप भरीव दगडातील असून त्याची रचना अर्धगोलाकार आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर कोरीवकाम आहे. गर्भगृहातील शिवपिंडी मोठी व वैशिष्ट्यपूर्ण असून तिची उंची एक मीटर इतकी आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूस महादेवाची पितळेची मूर्ती आहे. येथील अर्धगोलाकार सभामंडपाखाली एक भुयार असून त्याच्या लहान छिद्रातून भुयारात असलेली शिवपिंडी दिसते, त्याला गुप्तलिंग असे म्हणतात. सोमेश्वर मंदिराखाली असणाऱ्या या गुप्तलिंगाची सोमेश्वराबरोबरच रोज पूजा केली जाते. गावातील पाचपैकी सोमेश्वर मंदिरात दोन ज्योतिर्लिंग आहेत.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सोमेश्वराची मोठी यात्रा भरते. सोमेश्वराची मूर्ती मंदिराच्या आवारात पालखीत ठेवली जाते. तिची विधिवत पूजा केली जाते. संध्याकाळी मंदिरात खिरीचा प्रसाद बनवला जातो. संपूर्ण गावात प्रसाद वाटला जातो. त्यानंतर गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा सोहळा महाशिवरात्रीच्या आधी षष्ठीपासून सुरू होतो. ज्या भाविकांनी नवस केले आहेत, त्याच्याकडून देवाला शेले, पागोटे व पगड्या अर्पण केल्या जातात. माघ अमावस्येच्या तिसऱ्या दिवशी सोमेश्वराचा रथोत्सव असतो. यावेळी सोमेश्वराची पंचधातूची मूर्ती १६ खांबी रथात ठेवली जाते व सोमेश्वराची मोठी मिरवणूक निघते.
गावातील दुसरे महत्त्वाचे मंदिर आहे रामेश्वराचे. हे मंदिर गावाच्या एका बाजूला असून साधारणतः ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिरासमोर चौकोनी आकाराची एक विहीर असून तिची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारातून विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. यातील आठ ते दहा पायऱ्यांवर विहिरीच्या चारही बाजूला फिरता येईल असा कठडा आहे. या कठड्याच्या वरील बाजूच्या भिंतीवर बारा कोनाडे असून त्यांभोवती कोरीव काम केलेले आहे. या कोनाड्यांत आज मूर्ती नसल्या तरी त्यापैकी एका कोनाड्यात असलेली भैरवाची मूर्ती आजही चांगल्या अवस्थेत आहे.
रामेश्वर मंदिरावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे व नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूला अनेक मैथुन शिल्पे आहेत. सभामंडपाच्या आतील खांबांवर कोरीव नक्षीकाम केलेले दिसते. या सभामंडपाच्या उजव्या बाजूला शेषशाही विष्णूची सुंदर मूर्ती आहे. यामध्ये विष्णूला चार हात असून पायाजवळ गरुड व नाभीतून निघालेल्या कमळात ब्रह्मदेव विराजमान आहेत. गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग आहे. गावातील पाच स्थानांपैकी रामेश्वराचे हे तिसरे महत्त्वाचे स्थान आहे.
चौथे महत्त्वाचे ठिकाण आहे भावलिंग. गावाजवळील एका टेकडीवर हे स्थान आहे. येथे शंकराची अंदाजे सात मीटर उंचीची मूर्ती आहे. गळ्यात रुद्राक्षांची माळ, उजव्या हातात त्रिशूळ व डावा हात आशीर्वाद मुद्रेत ती आहे. मूर्तीच्या पायाजवळ लहानसे मंदिर आहे. दुरूनही हे ठिकाण नजरेस पडते. या मंदिराच्या गाभाऱ्यात एक मोठा दगड आहे. या दगडाबद्दल आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी गाईच्या खुरामध्ये अडकलेला एक दगड या ठिकाणी तिच्या पायामधून पडला. त्यानंतर त्या दगडाचा आकार वाढू लागला. त्या दगडाची वाढ थांबविण्यासाठी येथील शंकराची मूर्तीची त्यावर स्थापना करण्यात आली. त्यामुळे तो दगड उंचीने वाढणे थांबले; परंतु आडवा वाढू लागला.
येथील पाचवे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे या गावातील शिवलिंग मंदिर. हे मंदिर गावापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेवर आहे. या मंदिरात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलीलामृताचे वाचन आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पारायणे होतात. पूर्वापार प्रथेनुसार श्रावणातील चौथ्या सोमवारी सोमेश्वराची पालखी या मंदिरापर्यंत येते. येथील शिवलिंगाला अभिषेक करण्यात येतो. खिरीच्या प्रसादाचा भाविकांना भंडारा देण्यात येतो. मग ही पालखी सोमेश्वर मंदिराकडे परत जाते.