
रत्नागिरी तालुक्यातील सड्ये, पिरंदवणे व वाडाजून या तिन्ही गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले ग्रामदैवत सोमेश्वराचे मंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे ७०० वर्षे प्राचीन असलेले हे मंदिर शंकराचे असूनही या मंदिरात साजरा होणारा गोकुळाष्टमीचा उत्सव हे येथील वैशिष्ट्य आहे. १८६० पासून अखंडितपणे येथे हा उत्सव साजरा होतो. ‘मृत्यू यावा तर रंगमंचावर’ असे म्हणणारे प्रसिद्ध नटवर्य शंकर घाणेकर यांचे सड्ये–पिरंदवणे हे मूळ गाव… आणि येथील ग्रामदैवत सोमेश्वर मंदिराच्या रंगमंचावर प्रयोग करीत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
रत्नागिरीमधील सड्ये, पिरंदवणे व वाडाजून ही वैभवशाली परंपरा जपणारी गावे समजली जातात. रत्नागिरी–कोतवडे मार्गावर ही तीन गावे एकमेकांच्या शेजारी आहेत. त्यातील पिरंदवणे गावात ग्रामदैवत सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा प्राचीन इतिहास ज्ञात नसला तरी ते ७०० वर्षांपूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. पिरंदवणे येथे रस्त्याला लागून या मंदिराची कमान आहे.
कमानीतून आत गेल्यावर सोमेश्वर मंदिर व शेजारीच जोगेश्वरी देवीचे मंदिर दिसते. २०१० मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पाच जांभ्या दगडांच्या दीपमाळा, तर एक काळ्या पाषाणातील मोठी दीपमाळ आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हा सभामंडप अर्धमंडप स्वरूपाचा असून बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळात अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती व गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या शेजारी श्रीगणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील शिवलिंग व त्याच्या मागे महादेवाचा पितळी मुखवटा आहे.
येथे साजरे होणारे उत्सव, परंपरा व पारंपरिक खेळांसह जुन्या गाण्यांचा वारसा या गावांनी जपून ठेवलेला आहे. सोमेश्वर मंदिरात वर्षभर विविध उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. त्यापैकी गोकुळाष्टमी उत्सव हा येथील प्रमुख उत्सव असून या उत्सवाला १६४ वर्षांची परंपरा आहे. या मंदिरात होणाऱ्या गोकुळाष्टमी उत्सवात झगमगाट, धांगडधिंगा व चित्रविचित्र नृत्य असे काही नसते. त्याऐवजी पारंपरिक खेळ, टिपऱ्या, टिपऱ्यांची पारंपरिक गाणी हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तीन गावांतील ग्रामस्थ एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने हा सण साजरा करतात. श्रीकृष्णाने आपल्या वागण्यातून सर्वांना भेदाभेद विसरून एकत्र येण्याचा संदेश दिला होता. गोकुळाष्टमीचा उत्सव म्हणजे त्या संदेशाचे प्रतीक मानले जाते. सड्ये, पिरंदवणे व वाडाजून येथील गोकुळाष्टमी उत्सव आजही आपले ते वैशिष्ट्य टिकवून आहे. श्रावण कृष्ण षष्ठी ते अष्टमी या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवासाठी नोकरी–धंद्यानिमित्त गावाबाहेर गेलेले येथील ग्रामस्थ आवर्जून हजेरी लावतात.
मंदिर सोमेश्वराचे म्हणजे शंकराचे असूनही येथे गोकुळाष्टमी उत्सव साजरा
होतो, याबाबत असे सांगितले जाते की फार पूर्वी येथून जवळच असलेल्या कोतवडे गावात सहस्रबुद्धे कुटुंब राहत होते. त्यांच्या घरी गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असे. पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ त्यात सहभागी होण्यासाठी जात असत. पिरंदवणे येथून कोतवडेला जाताना मार्गावर दोन नद्या लागतात. एकदा नदीला पावसामुळे पूर आल्यामुळे पिरंदवणे येथील ग्रामस्थांना उत्सवासाठी कोतवडेला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे हताश होऊन सर्वजण माघारी फिरले. त्यांनी सोमेश्वर मंदिराच्या पुढ्यात येऊन ‘गोपालकृष्ण महाराज की जय…’ असा जयघोष सुरू केला. तिथे या उत्सवाचे बीज रोवले गेले. त्यातून आपल्या गावातच गोकुळाष्टमीचा उत्सव सुरू करावा, अशी कल्पना पुढे आली. इ. स. १८६० साली या गावात पहिला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला गेला, तो आजही अखंडितपणे सुरू आहे. १९६० मध्ये या उत्सवाचा नऊ दिवस शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. १९८५ मध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सव, तर २०१० मध्ये शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला होता.
सोमेश्वर मंदिराच्या शेजारी जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर नटवर्य शंकर घाणेकर खुले नाट्यगृह आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरावर तीन घुमटाकृती शिखरे आहेत. येथील नोंदींनुसार इ. स. १६८७ रोजी टोळवाडी येथील पाचव्या पिढीतील मोरभट महादेवभट यांचे चुलत बंधू शंकरभट पनभट यांनी सोमेश्वर मंदिराच्या आवारात देवीची पाषाणाची मूर्ती बसविली होती. इ. स. १६९० मध्ये चुन्याच्या बांधकामात तीन घुमट असलेले हे मंदिर उभारले होते. १७२८ मध्ये शिवभट बाळंभट यांच्या काळात मंदिरात नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. २००२ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. या मंदिरासमोरही एक दीपमाळ असून मंदिराच्या गर्भगृहात सुमारे तीन फूट उंचीची जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. चैत्र पौर्णिमेला या देवीची यात्रा भरते.
या गावाची आणखी एक ओळख म्हणजे नटवर्य शंकर घाणेकर यांचे हे गाव. १० फेब्रुवारी १९२६ ला त्यांचा पिरंदवणे येथे जन्म झाला होता. आयुष्यातील खडतर प्रवासानंतर शंकर घाणेकर यांनी भाऊबंदकी, खडाष्टक, पुण्यप्रभाव, विद्याहरण, भावबंधन, एकच प्याला, बेबंदशाही, आग्र्याहून सुटका, संगीत शारदा, दुरितांचे तिमिर जावो, कट्यार काळजात घुसली अशा अनेक नाटकांमध्ये भूमिका करून नाट्यरसिकांचे मन जिंकले होते. घाणेकरांचे वक्तृत्वही चांगले होते. अनेक कार्यक्रमांमधील त्यांची भाषणे प्रेक्षकांचे मनोरंजन करायची. त्यांच्या वक्तृत्वामुळे पु. ल. देशपांडे त्यांना ‘विनोदवीर’ म्हणत असत, तर नाटककार वसंत सबनीस यांनी ‘तू बोलतोस तेच ठिक आहे, लिहायला लागलास तर आम्हाला कामच उरणार नाही’ असे म्हटले होते.
नाट्यक्षेत्रात त्यांचे मोठे नाव झाले होते; परंतु ते आपल्या गावाला कधीच विसरले नाहीत. दरवर्षी गावातील मंडळी तुकाराम बीजेला सोमेश्वर मंदिराच्या खुल्या रंगमंचावर नाटक सादर करायचे आणि घाणेकर आवर्जून त्यात भूमिका करत असत. २० मार्च १९७३ या दिवशी सोमेश्वरासमोरील रंगमंचावर ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ हे नाटक ते सादर करणार होते. त्याप्रमाणे नांदी होऊन नाटक सुरू झाले आणि पहिल्या अंकात कोतवाल झालेले घाणेकर भूमिकेत झोपले होते. आता कोतवाल उठेल आणि हास्याचा धबधबा सुरू होईल, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते; परंतु कोतवाल भूमिकेत झोपले ते कायमचेच. त्या दिवशी घाणेकर यांच्या आयुष्यावरही अखेरचा पडदा पडला होता. त्यांच्या स्मरणार्थ या रंगमंचाला ‘नटवर्य शंकर घाणेकर खुला रंगमंच’ असे नाव देण्यात आले आहे.