दुमजली गर्भगृह असलेले कोकणातील एकमेव मंदिर म्हणून संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या प्राचीन व हेमाडपंती रचनेच्या मंदिरातील सभामंडपाच्या खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेली शिल्पे, मंदिरानजीक असलेले गरम पाण्याचे कुंड ही येथील आणखी काही वैशिष्ट्ये. या कुंडात स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात, तसेच जोराची भूक लागते, अशी श्रद्धा असल्याने हजारो भाविक येथे स्नानासाठी येतात.
मुंबई–गोवा महामार्गावरून आरवलीमार्गे संगमेश्वरकडे जाताना तुरळ गावापासून काही अंतरावर डावीकडे राजवाडीकडे जाणारा एक रस्ता आहे. तेथून गावातील ब्राह्मणवाडीतील सोमेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराच्या कमानीजवळ असलेल्या पायऱ्या उतरल्यावर फरसबंदी केलेली पाखाडी लागते. त्यावरून काही अंतर चालत गेल्यावर पारंपरिक कोकणी पद्धतीने बांधलेले दुमजली कौलारू मंदिर दृष्टीस पडते. मंदिराला चारही बाजूंनी जांभ्या दगडांची तटबंदी आहे. दगडी जोता असलेल्या या मंदिराच्या बांधकामात जास्तीत जास्त लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. सभामंडप, अंतराळ आणि दुमजली गाभारा अशी रचना असलेले हे मंदिर चालुक्यकालीन आहे. १९६० मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
मंदिरासमोर सुमारे २५ फूट उंचीची दगडी दीपमाळ आहे. तीन फूट उंच चौथऱ्यावर उभी असलेली ही दीपमाळ त्रिपुरारी पौर्णिमा व उत्सवांच्या वेळी दिवे लावून उजळविली जाते. दीपमाळेच्या समोर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिराचा सभामंडप अर्धमंडप प्रकारातील असून तिन्ही बाजूंनी दगडी कक्षासने (बाके) आहेत. या कक्षासनांवर मोठमोठे लाकडी खांब उभे असून हे खांब व त्यावरील मोठमोठ्या तुळ्यांवरील सुंदर कोरीव काम ही या मंदिराची खासियत आहे. येथील लाकडी तुळ्यांवर सीताहरण, लंकादहनासारखे रामायणातील काही प्रसंग, बारीक वेलबुट्ट्यांचे नक्षीकाम, विविध पक्षी, घोडेस्वार, वाघाशी युद्ध करणारा ढाल–तलवारधारी पुरुष, बासरीवादन करणारा श्रीकृष्ण अशी शिल्पे कोरलेली आहेत. येथील गंडभेरुंडाचे (एक धड आणि दोन तोंड असलेला काल्पनिक पक्षी) शिल्प सर्वात वेगळे व देखणे आहे. येथील सर्व लाकडे एकमेकांशी जोडण्यासाठी एकही खिळा वापरण्यात आलेला नाही. प्रत्येक लाकडाला खाचा करून ते एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. मंदिराचा सभामंडप आजही दररोज शेणाने सारवला जातो.
येथून अंतराळात जाताना प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशमूर्ती व प्रवेशद्वाराच्या भिंतींवर दोन बाजूंना घोडे कोरण्यात आलेले आहेत. अंतराळ आणि सभामंडपातील रचनेमध्ये काहीसे साम्य आहे. येथेही कोरीव काम केलेले खांब आहेत. अंतराळात डाव्या बाजूला शिवाच्या विविध रूपातील मूर्ती आहेत. याशिवाय येथे अखंड दगडातील नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या मागे मंदिराच्या दगडी बांधकामातील अवशेषातील एक भाग ठेवण्यात आला आहे. त्याचीही भाविक गंध–फुले वाहून पूजा करतात. त्याबाबत ठोस माहिती उपलब्ध नसली तरी तो मंदिराचा जुना कळस आहे. मुघल आक्रमणादरम्यान तो पडला, मात्र तो पुन्हा मंदिरावर न चढवता नंदीजवळ ठेवण्यात आला, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.
येथील गर्भगृह दुमजली आहे. अंतराळातून काही पायऱ्या उतरून सोमेश्वराची पिंडी असलेल्या खालच्या गर्भगृहात जाता येते. गर्भगृहाचे बांधकाम काळ्या पाषाणातील आहे. येथे शिवलिंगाच्या बाजूला कोरीव काम केलेले दगडी खांब, तसेच कळसाच्या आतील बाजूलाही नक्षीकाम केलेले दिसते. येथील शिवलिंग मोठे व सुंदर आहे. दुसऱ्या मजल्यावरील गर्भगृहात मोठ्या दगडावर कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. तेथे जाण्यासाठी सोमेश्वराच्या गर्भगृहाच्या उजव्या बाजूने मार्ग आहे. अशी अख्यायिका आहे की येथील गाभाऱ्यात खिडकीवजा भागाजवळ एक भुयार आहे. हे भुयार नजीकच्या भवानीगडापर्यंत जाते. सोमेश्वराची पूजा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज भवानीगडावरून या भुयारातून येत असत.
मंदिरात महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा व श्रावणी सोमवारी मोठे उत्सव होतात. महाशिवरात्रीचा उत्सव तीन दिवसांचा असतो. तिन्ही दिवशी पालखीत शंकराचा मुखवटा ठेवून मंदिराला ११ प्रदक्षिणा घातल्या जातात. पहिल्या दिवशी तीन, दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी तीन प्रदक्षिणा होतात.
मंदिरापासून जवळच असलेले गरम पाण्याचे नैसर्गिक कुंड हे येथील आकर्षण आहे. मंदिरातील दैनंदिन पूजाविधीसाठी या कुंडातील पाणी वापरले जाते. नितळ, स्वच्छ पाणी असलेल्या या कुंडातून वाफा व पाण्यावर बुडबुडे येत असतात. कुंडातील तापमान अंदाजे ६० डिग्री सेंटिग्रेड असते. (नळातून येणारे, पिण्याचे पाणी साधारणतः १६ ते १८ डिग्री असते, तर समुद्रातील पाण्याचे तापमान हे २२ ते २६ डिग्री इतके असते.) या तापमानात, तसेच कुंडातील पाण्याच्या पातळीत कधीही बदल होत नाही.
कुंडाभोवती जांभ्या दगडाची भिंत आहे. त्यावर कौले बसविण्यात आली आहेत. कुंडातील वाफ बाहेर जाण्यासाठी कुंडाच्या आकाराएवढी मोकळी जागा या कौलांमध्ये ठेवण्यात आली आहे. मुख्य कुंडातून हे पाणी बाजूला असलेल्या दुसऱ्या कुंडात जाते. तेथे भाविक स्नान करू शकतात. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे. कुंडातील पाणी जास्त गरम असल्यामुळे थेट अंगावर घेता येत नाही. त्यात थंड पाणी मिसळावे लागते. या गंधकयुक्त पाण्याने स्नान केल्यास खरूज, नायटासारखे त्वचारोग नाहीसे होतात व जोराची भूकही लागते, अशी भाविकांची समज आहे. या कुंडाजवळून वाहणाऱ्या नदीच्या एका तीरावर काहीसे गरम पाणी व एका तीरावर गार पाणी असते.