पूर्वी चिपळूण हे नावाजलेले बंदर होते. मालाने भरलेली जहाजे येथील वासिष्टी नदीतून आताच्या चिपळूण शहरापर्यंत येत असत. या बंदरावर देखरेख ठेवण्यासाठी वासिष्टी नदीकाठी एका छोट्या टेकडीवर गोवळकोट किल्ला बांधला गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६० रोजी गोवळकोट किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचे नाव गोविंदगड असे ठेवले. किल्याच्या पायथ्याशी देव सोमेश्वर आणि देवी करंजेश्वरी यांचे जागृत मंदिर आहे. शिमगोत्सवात येथील ‘शेरणे काढणे’ हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
देवीची अख्यायिका अशी की या परिसरात पूर्वी अनेक करंजीची झुडपे होती. या झुडपांमध्ये ही देवी प्रकट झाली, हे स्थान ‘सिंगासन’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही देवी जिथे प्रकट झाली तेथे तिने एका मुलीजवळ हळदी–कुंकू मागितले. ती मुलगी हळदी–कुंकू आणायला गेल्यावर देवी तेथूनही गुप्त झाली आणि सध्या जिथे मंदिर आहे, तेथे प्रकट झाली. त्यानंतर एका भक्ताला स्वप्नदृष्टांत देऊन ‘करंजीच्या झुडपात माझ्या नथीमधला मोती अडकला आहे, तो घेऊन ये’ असे तिने सांगितले. देवीने सांगितलेल्या जागेवर त्या भक्ताला मोती सापडला. त्यामुळे देवीचे येथे अस्तित्व असल्याची ग्रामस्थांची खात्री झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी मंदिर बांधून तेथे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. करंजीच्या झुडपात प्रकट झाली म्हणून करंजेश्वरी असे तिचे नाव पडले.
१९ फेब्रुवारी १९६९ ला या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे देवस्थान जागृत असून देवीची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. परिसरातील पटवर्धन, गोळे, फणसे, दीक्षित, पुराणिक, देवल या कुटुंबांची ही कुलदेवता, तर पेठमाप गोवळकोट येथील रहिवाशांची ग्रामदेवता आहे. चिपळूण बसस्थानकापासून काही अंतरावर मंदिर असून मुख्य रस्त्याला मंदिराची मोठी कमान आहे. येथून काही अंतरावर देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे सुंदर मंदिर आहे. सुमारे १८ ते २० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराजवळ मोठी दीपमाळ असून संपूर्ण प्रांगणात फरसबंदी असल्यामुळे हा परिसर सुंदर भासतो.
दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराचा सभामंडप भव्य असून त्यातच गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या समोरील भिंतीवर आकर्षक नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात एका सुंदर लाकडी मखरात वाघावर आरूढ, चतुर्भुज श्रीकरंजेश्वरी देवी विराजमान आहे. या देवीला विविध वस्त्रालंकारांनी मढविलेले असून मूर्तीच्या मागे असलेल्या चांदीच्या प्रभावळीमध्ये सुंदर कोरीव काम केलेले आहे. देवीच्या मूर्तीसमोर गर्भगृहाच्या मध्यभागी सोमेश्वर महादेवाची पिंडी आहे. ही पिंडीही चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे.
देवी करंजेश्वरीचे पेठमाप हे माहेर, तर गोवळकोट सासर असल्याचे मानले जाते. फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला देवीची पालखी गोवळकोटहून पेठमाप भागात माहेरी येते. यावेळी शिमगोत्सवाला सुरुवात होते. फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला येथील आगळावेगळा शेरणे उत्सव होतो. यामध्ये ज्या भाविकांना देवीला नवस बोलायचा असतो, त्यांनी शेरणे काढण्याच्या एक दिवस आधी म्हणजे फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला पिवळ्या कापडामध्ये नारळ आणि आपल्या नावाची चिठ्ठी हे शेरणे कोणाच्याही नकळत नदीकिनाऱ्यावरील मैदानातील मातीत पुरून ठेवायचे असते. दुसऱ्या दिवशी येथून येणाऱ्या करंजेश्वरी आणि सोमेश्वर यांच्या पालखीपुढे असणारे एक त्रिशुळासारखे निशाण जमिनीमध्ये पुरलेली अनेक शेरणी शोधून काढतो. ज्यांचे शेरणे शोधून काढले जाते त्यांच्या नवसाला देवी पावली, असे मानले जाते. हा येथील अनोखा उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. यावेळी या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. त्यानंतर फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला देवीची पालखी परत माहेरहून सासरी म्हणजे गोवळकोटला जाते.
युद्धासारख्या प्रसंगांमध्ये अनेक सरदारांनी या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्याच्या नोंदी आहेत. १७ नोव्हेंबर १७०० रोजी जंजिरेकर सिद्दी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी राणी ताराबाई यांनी कान्होजी झुंजारराव यांना सात हजार फौजेनिशी कुंभार्ली घाटाने चिपळूण येथे पाठविले. त्यावेळी झुंजाररावांनी प्रथम श्रीकरंजेश्वरीचे दर्शन घेतले होते. ४ फेब्रुवारी १७०१ रोजी दादोजी मल्हार यांनी जंजिरेकर सिद्दी याचा बीमोड करून देवीचे दर्शन घेतले होते. मार्च १७८१ मध्ये इंग्रजांचा बंदोबस्त करण्यासाठी परशुरामभाऊ पटवर्धन हे कोकणात उतरले होते. त्या वेळी त्यांनीही देवीचे दर्शन घेतले होते. या देवस्थानाला इंग्रज सरकारकडून १८७४ रोजी वार्षिक १५ रुपयांची सनद मिळाली होती. त्यानुसार आजही महाराष्ट्र सरकारतर्फे देवस्थानला दरवर्षी १५ रुपये मिळतात.
दरवर्षी वैशाख कृष्ण चतुर्दशीला मंदिराचा वर्धापनदिन उत्सव, श्रावण शुक्ल त्रयोदशीला देवी करंजेश्वरीचा जागर, नारळी पौर्णिमा, आश्विन शुक्ल प्रतिपदा ते आश्विन शुक्ल दशमी या काळात नवरात्रोत्सव, दिवाळी पाडवा व त्रिपुरारी पौर्णिमा या दिवसांमध्ये येथे विविध उत्सव साजरे केले जातात. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत भाविकांना येथील देवीचे दर्शन घेता येते. मंदिर परिसरात भाविकांसाठी सुसज्ज भक्त निवासही आहे. येथे राहण्यासोबतच जेवणाचीही सुविधा आहे. (संपर्क : सूर्यकांत सहस्त्रबुद्धे, व्यवस्थापक : मो. ७०३८२३४४८६) या मंदिराच्या आवारातून गोविंदगड किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. सुमारे ३०० पायऱ्या चढून किल्ल्यात जाता येते. तेथून संपूर्ण चिपळूण शहराचे विहंगम दृश्य पाहता येते.