सोमनाथ मंदिर

मरोडा, ता. मूल, जि. चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असलेले मरोडा हे गाव येथील प्राचीन सोमनाथ मंदिर सोमनाथ धबधब्यामुळे भाविक पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. डोंगरदरीतून वाहणाऱ्या धबधब्याच्या शेजारी निसर्गसंपन्न वातावरण स्थित सोमनाथ मंदिर जागृत असून अनेक भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. आजारपणातून बरे होण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी येथे नवस बोलल्याने ते पूर्ण होतात, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.

मरोडा गावाच्या वेशीवर असलेल्या जंगलव्याप्त भागात एका लहानशा टेकडीवर हे मंदिर आहे. असे सांगितले जाते की येथे वन्यप्राण्यांचा वावर आहे. या मंदिर परिसराच्या चहूबाजूंनी गर्द वनराई असून मंदिर टेकडीच्या पायथ्याशी सर्वत्र फरसबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य भासतो. येथे आल्यावर बाजूने वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट विविध पक्ष्यांचे कुजन कानावर पडतात. भाविक पर्यटकांसाठी वनविभागातर्फे येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिराच्या पायथ्याशी धबधब्याच्या शेजारी स्वतंत्र मोठे चौथरे असून त्यावर शंकर नंदी यांच्या भव्य मूर्ती स्थापन केल्या आहेत. सुमारे २० ते २५ फूट उंचीच्या या मूर्ती येथील आकर्षण आहे. याच परिसरात पूजासाहित्याची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत.

पायथ्यापासून टेकडीवर असणाऱ्या मंदिरात जाण्यासाठी ३० पायऱ्या आहेत. पायरी मार्गाच्या सुरुवातीलाच एका गोमुखातून अखंड पाण्याचा झरा वाहतो. एका फूट बाय फूट आकाराच्या लहानशा कुंडात गोमुखातून हे पाणी पडत असते. या गोमुखाचे कुंडाचे बांधकाम १९६६ साली करण्यात आल्याचा त्यावर उल्लेख आहे. गोमुखातून बाराही महिने पाणी वाहत असते. मात्र त्या पाण्याच्या उगमस्थानाची माहिती मात्र आजपर्यंत कोणालाच नाही, असे सांगितले जाते. वनविभागातर्फे या परिसरात भाविक पर्यटकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाक बसविण्यात आले आहेत. धबधब्याच्या बाजूने घाटसदृश्य बांधकाम करण्यात आलेले आहे.

पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. उंचावर असल्याने या प्रांगणाच्या सर्व बाजूने सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग लावण्यात आले आहेत. असे सांगितले जाते की पूर्वीच्या काळी हा परिसर तपोभूमी म्हणून प्रसिद्ध होता. येथे अनेक साधूसंत तपश्चर्येसाठी येत असत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर मारुतीची छोटी देवळी आहे. मध्यम आकाराच्या या मंदिराचे स्वरूप सभामंडप, अंतराळ गर्भगृह असे आहे. येथील सभामंडपाचे काम नंतरच्या काळात करण्यात आले असले तरी अंतराळ गर्भगृहाचे बांधकाम हे हेमाडपंती रचनेचे असून ते मूळ मंदिर होते, असे सांगितले जाते.

अंतराळात चार दगडी स्तंभ असून त्यांच्या पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदी आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या उजव्या बाजूस सुमारे फूट उंचीची गणेशाची, तर डाव्या बाजूस उमामहेश्वर नंदी यांच्या मूर्ती आहेत. उमा़महेश्वरांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून महादेवांच्या डाव्या मांडीवर पार्वती माता बसलेली आहे ही प्रतिमा सुखासनात आहे. या मूर्तीत पार्वती मातेच्या डोक्यावर नागशिल्प असून डावा हात तिच्याच डाव्या मांडीवर दिसतो. महेशाच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी असून त्या शिवपिंडीसमोरही नंदी आहे. शिवपिंडीसमोर चौथरा असून त्यावर पार्वती मातेची कोरीव मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला श्रीगणेश आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत.

मंदिराला लागून असलेल्या टेकडीवरून सतत एक धबधबा वाहत असतो. या धबधब्यामुळे येथे मोठे कुंड तयार झाले आहे. येथे येणारे भाविक या कुंडात स्नान करून सोमनाथाच्या दर्शनाला जातात, तर अनेक पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा पोहण्याचा आनंद घेतात. या धबधब्याच्या वरून एक छोटासा, पण वैशिष्ट्यपूर्ण पूल बनविण्यात आला आहे. पर्यटक या पुलाचा वापर सेल्फी पॉईंट म्हणून करतात.

या मंदिराच्या बाजूने डोंगरावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहेत. त्यातील एका मार्गाने गेल्यास सुमारे १० फूट उंचीवर हनुमानाची मूर्ती आहे. दुसऱ्या पायरी मार्गाने गेल्यावर तेथे एक सोमी नावाच्या शिवभक्त स्त्रीची समाधी आहे. तिने या ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली होती. पुत्रप्राप्तीसाठी या सोमीला नवस बोलल्यास ते पूर्ण होतात, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की या सोमीवरूनच या देवस्थानाचे नावही सोमनाथ झाले आहे. सोमीच्या समाधीजवळ नवसपूर्तीनंतर भक्तांनी वाहिलेले अनेक मातीचे घोडे पाळणे आहेत. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. याशिवाय शिवरात्री श्रावणी सोमवारीही या परिसरात यात्रेचे स्वरूप असते.

हिरवीगार वनराई, डोंगर, धबधबा असल्याने सोमनाथ मंदिर परिसर हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत येथे कोसळणाऱ्या धबधब्यात भिजण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांतील पर्यटकही या ठिकाणी धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. याशिवाय याच मारडा गावात सोमनाथ मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या एका तलावावर उंच गरुडखांब असून त्याच्या चारही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये शिवपार्वती, श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन, नृसिंह, श्रावण बाळ, हत्तीवर झडप घालणारा सिंह यांचा समावेश आहे.

उपयुक्त माहिती:

  • मूलपासून किमी, तर चंद्रपूरपासून २६ किमी अंतरावर
  • मूलपासून मरोडापर्यंत एसटी रिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची व्यवस्था आहे, परंतु निवासाची नाही
Back To Home