
ऐतिहासिक व तीर्थक्षेत्रांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, गंगापूर तालुक्यातील, शेंदूरवादा येथे गणेशाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार, या ठिकाणी गणेशाने विश्वरूप धारण करत आपल्या पाशाने सिंदुरासुर राक्षसाचा गळा आवळून वध केला होता. त्यावेळी गणेशाचे अंग सिंदुरासुराच्या रक्ताने शेंदरासारखे माखले होते. त्यामुळे येथील गणेशाला सिंदुरात्मक व सिंदुरवदन गणेश असे नाव पडले आहे. या गणेशावर असलेली भाविकांची श्रद्धा व येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार राज्य सरकारनेही २००६ मध्ये या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन गौरव केला आहे.
पौराणिक ग्रंथांमधील माहितीनुसार, एकदा ब्रह्मदेव आपल्या निवासस्थानी निद्रा घेत होते. जाग येताच ब्रह्मदेवांनी दिलेल्या जांभईतून एका बालकाचा जन्म झाला. ब्रह्मदेवांनी त्याला सांगितले की तुझ्या शरीराचा रंग तांबडा असल्याने तुला ‘सिंदूर’ या नावाने ओळखले जाईल आणि तू ज्याला मिठी मारशील तो भस्मसात होईल. या वराची प्रचिती पाहण्यासाठी तो ब्रह्मदेवालाच मिठी मारण्यासाठी पुढे आला. त्यामुळे क्रोधित झालेल्या ब्रह्मदेवांनी त्याला, ‘तुझ्या या कृत्यामुळे तू दैत्य होशील’, असा शाप दिला आणि ते वैकुंठास निघून गेले. त्यांच्यापाठोपाठ सिंदुरासुरही तेथे गेला. परंतु तेथे त्याला महादेव सामोरे आले व त्याला त्यांच्याशी युद्ध करावे लागले. हे युद्ध बराच काळ लांबल्याने सिंदुरासुर तेथून भूलोकी आला.
सिंदुरासुराने भूलोकातही सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली.
घृष्णेश्वराच्या मंदिराजवळील राजसदन (सध्याचे शेंदूरवादा) येथे त्याची राजधानी होती. त्याने येथील वैदिक कर्म–पूजापाठ थांबवले. तो देवांनाही त्रास देत असे. त्यामुळे भयभीत झालेल्या सर्व देवांनी बालगणेशाला साकडे घातले. त्यावेळी गणेशाचे वय आठ वर्षे होते. गणेशाने सिंदुरासुराला युद्धाचे आव्हान दिले. त्यावेळी सिंदुरासुराने गणेशाला पकडून आकाशात उड्डाण केले. मात्र वजन न पेलवल्याने त्याने गणेशाला खाली नर्मदा नदीत सोडून दिले. त्यामुळे नर्मदेतील गोटे लाल झाले. बालक मृत्युमुखी पडल्याच्या भावनेतून आनंदी झालेल्या सिंदुरासुराला नदीतील प्रत्येक गोट्यात गणेश दिसू लागला. त्यानंतर गणेशाने अनंत मस्तके–हात–पाय असलेले विराट रूप घेऊन सिंदुरासुराला गच्च पकडले व आपल्याजवळील पाशाने त्याचा गळा आवळून वध केला. हे युद्ध ज्या ठिकाणी झाले ते गाव शेंदूरवादा होय. मृत्यूपूर्वी सिंदुरासुराने गणेशाला विनंती केली की मला तुमच्याजवळ स्थान द्या. जेणेकरून तुमच्यासोबत माझीही पूजा केली जाईल. सिंदुरासुराची विनंती गणेशाने मान्य केली. त्यामुळे शेंदूरवादा येथील सिंदुरात्मक गणेश मंदिरात गणेशमूर्तीच्या खालच्या बाजूला सिंदुरासुराचे मुख आहे. भाविक गणेशासोबतच सिंदुरासुराचीही येथे पूजा करतात.
गंगापूर तालुक्यात खाम नदीच्या काठावर शेंदूरवादा गाव आहे. येथील नदीपात्राला लागूनच सिंदुरात्मक गणेश मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूला असलेल्या दरवाजावर एक शिलालेख आहे. त्यावर ‘श्री गजानन चरणी सरभोजराज विश्वंभर शके १७०६ क्रोधी नाम’ अशी नोंद आहे. त्यावरून इ. स. १७८५ मध्ये या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा, असा कयास बांधता येतो. पानिपतच्या लढाईच्या आधी उदगीरला नानासाहेब पेशवे आणि निजाम यांच्यादरम्यान झालेल्या तहानुसार दौलताबाद मुलखाच्या चौथाई वसुलीचे अधिकार आणि देवगिरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर सुमारे ४० वर्षे या भागात मराठ्यांचा अंमल होता. तत्कालीन मराठा सरदार, जहागीरदारांनी दिलेल्या दानांमधून पैठण, कायगाव टोका, औरंगाबाद या भागात अनेक मंदिरांचे बांधकाम तसेच जीर्णोद्धार झाले. त्याच काळात या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला असावा, असेही सांगण्यात येते. सुमारे ३५ वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
मंदिराच्या प्रांगणात दगडी फरसबंदी आहे. या प्रांगणाला लागून जहागीरदार परिवाराची पुरातन वास्तू आहे. तिच्या दगडी भिंती सुमारे वीस फूट उंचीच्या आहेत. मंदिर परिसरात मारुतीची व दुर्गादेवी यांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिरासमोर प्रसिद्ध संतकवी मध्वमुनीश्वर यांचा मठ असून येथेच त्यांची, त्यांच्या मुलाची व इतर दोन शिष्यांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूस भागीरथी तीर्थकुंड (विनायक कुंड) आहे. असे सांगितले जाते की या कुंडातील तीर्थ घरात तसेच शेतात शिंपडल्यास उंदरांचा वावर होत नाही. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. हे मंदिर अष्टकोनी असून त्याला आठ कमानी आहेत. नदीला येणाऱ्या पुराच्या तडाख्यात न सापडता मंदिर सुरक्षित राहावे, यासाठी अशी योजना केलेली दिसून येते. मंदिरातील गणेशमूर्ती शेंदूरचर्चित, डाव्या सोंडेची व सहा फुटांहून अधिक उंचीची आहे. या मूर्तीच्या खालच्या बाजूला सिंदुरासुराची मूर्ती आहे. सिंदुरासुराच्या मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. मंदिराला घुमटाकृती शिखर असून लोखंडी प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर तसेच आतील भागांतही अनेक देवळ्या आहेत.
दररोज सकाळी ८.३० वाजता येथे गणेशाची पूजा होते. संकष्टी व अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. दर संकष्टी व अंगारकीला गणेशाला सोवळे नेसवून सालंकृत पूजा केली जाते. १९७४ मध्ये गावात अथर्वशीर्ष मंडळ स्थापन झाले. तेव्हापासून दर महिन्यातील संकष्टीला येथे अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने होतात. यावेळी आलेल्या भाविकांना साबुदाणा खिचडीचे, तसेच चंद्रोदयानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते. गणेशोत्सवाच्या काळात सकाळी व सायंकाळी आरती व पूजा होते. या मंदिराशिवाय शेंदूरवादा गावात स्वयंभू विठ्ठलाचे मंदिर आहे. तेथे आषाढी व कार्तिकी एकादशीला भाविकांची गर्दी होते.