सिद्धनाथ मंदिर

म्हसवड, ता. माण, जि. सातारा

दक्षिण काशीम्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या म्हसवड शहरात माणगंगा नदीच्या तीरावर असलेले सिद्धनाथ मंदिर म्हसवडचे ग्रामदैवत, तर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक कुटुंबांचे कुलदैवत असलेल्या या देवस्थानाची जागृत नवसाला पावणारे, अशी ख्याती आहे. तुलशी विवाहाच्या दिवशी सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा उत्साहात साजरा केला जातो. त्यादिवशी होणारा रथोत्सव प्रसिद्ध असून त्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्य प्रदेशातून भाविक येथे उपस्थित असतात.

सातारासोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील सातारा जिल्ह्यातील म्हसवड हे शेवटचे गाव. म्हसवडच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले सिद्धनाथ मंदिर १२व्या शतकातील आहे. मंदिराभोवती तटबंदी असून तटबंदीला लागून अनेक पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या आवारात एक उंच दीपमाळ लहान लहान अशी दोन मंदिरे आहेत. मुख्य मंदिरासमोरील बाजूस गजराज मंदिर आहे. त्यात दगडी चौथऱ्यावर मंदिराकडे तोंड करून गजराज उभा आहे. सिद्धनाथांनी गंगेतून ज्या हत्तीला वाचवले त्याचे हे स्मारक असल्याचे सांगितले जाते. हा गजराज नवसालाही पावतो, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. गजराज मंदिराच्या पुढे मुख्य मंदिरासमोरील बाजूस मंदिराला लागून ओवऱ्या बांधलेल्या आहेत. यांपैकी एका ओवरीमध्ये एक वृंदावन आहे त्यावर एक मूर्ती कोरलेली आहे. तिच्या हातामध्ये नांगर डोक्याजवळ सूर्य आणि चंद्र आहेत.

मुख्य मंदिर जमिनीपासून काहीसे उंचावर आहे. दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. दर्शनमंडपात कानडी संस्कृत भाषेत २५ ओळींचा एक शिलालेख आहे. शिलालेखाशेजारी असलेल्या ओवरीमध्ये सप्तमातृकांची शिल्पे आहेत. याशिवाय गणपती, भैरव आणि विष्णू यांच्याही मूर्ती आहेत. सभामंडपाच्या द्वारपट्टीवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम आहे; तर खालच्या बाजूला चवरीधारिणी, नमस्कारी स्त्री द्वारपाल यांची शिल्पे आहेत. अंतराळात भैरव मूर्ती असून तेथील दोन स्तंभांना गोलाकार पत्र्याने मढविलेले आहे. त्यापुढे सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या पादुका आहेत.

सभामंडपाप्रमाणेच गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरही कोरीवकाम आहे. प्रवेशद्वार पंचशाखी आहे. त्यामध्ये पहिल्या शाखेत नक्षीकाम, दुसरी पद्म शाखा, तिसरी स्तंभ शाखा, चौथी नर शाखा आणि पाचवी पुन्हा पद्म शाखायुक्त आहे. स्तंभाच्या खाली शैव द्वारपाल, चवरीधारिणी आणि कुबेर यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात लाकडी महिरपीमागे सिद्धनाथ पत्नी जोगेश्वरी देवी यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या मागे पितळेची प्रभावळ दिसते. सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी मूर्तींच्या मागे नागदेवता आहे. सिद्धनाथांच्या हातात त्रिशूल आणि कमंडलू आहे बाजूला सूर्यदेवता आहे.

सिद्धनाथांची मूळ मूर्ती भैरवाची आणि जोगेश्वरी देवीची मूळ मूर्ती पार्वतीची आहे. या मूर्तींखाली असलेल्या एका भुयारात काशी विश्वेश्वराची स्वयंभू शिवपिंडी आहे. महाशिवरात्रीच्या रात्री हे भुयार खुले करण्यात येते. त्यामुळे वर्षातून केवळ एकदाच येथील शिवपिंडीचे भाविकांना दर्शन घेता येते. त्यानंतर पुन्हा ते बंद केले जाते. भुयाराच्या द्वाराजवळ असलेल्या एका लहान पलंगावरील गाद्यांवर श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. असे सांगितले जाते की हे ठिकाण मूळचे पाताळलिंगी होते. सतराव्या शतकाच्या सुमारास त्याचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर पाताळलिंगी शिवपिंडीच्या वरील बाजूस मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा) या दिवशी घटस्थापना होते. येथून पुढे १२ दिवस सिद्धनाथांचा नवरात्रोत्सव (देवीचा नवरात्रोत्सव ज्याप्रमाणे नऊ दिवसांचा असतो तसा सिद्धनाथांचा नवरात्रोत्सव हा १२ दिवसांचा असतो) साजरा होतो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुपारी १२ वाजता सिद्धनाथांचा हळदी समारंभ होतो. या कार्यक्रमात हजारो महिला सहभागी होतात. ढोल, सनईचौघड्यांच्या निनादात हळदी समारंभ पार पडतो. त्यानंतर कार्तिक शुद्ध द्वादशीला (तुळशी विवाह) सनई चौघड्यांच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा शाही विवाह सोहळा पार पडतो. यासाठी मंदिराच्या बाहेरील गजराज मंदिरातील सुशोभित केलेल्या हत्तीवरील अंबारीत बसविलेली सिद्धनाथांची मूर्ती विवाहासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात नेली जाते. सिद्धनाथांची मूर्ती गाभाऱ्यात नेत असताना हजारो भाविक भक्तिभावाने मूर्तीस स्पर्श करतात. सिद्धनाथांच्या मूर्तीस स्पर्श केल्याने सुखसमृद्धी भरभराट होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मूर्ती आतमध्ये आणल्यानंतर जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरून मंगलाष्टकांसह शास्त्रोक्त पद्धतीने रात्री १२ वाजता श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडतो.

विवाह सोहळा झाल्यानंतर वरातीचा कार्यक्रम अर्थात रथयात्रा आयोजित केली जाते. भव्य अशा लाकडी, चंदनाच्या रथामध्ये मूर्ती बसविल्या जातात. रथाला मोठे दोर बांधून भाविकांच्या मदतीने हा रथ गावाभोवती फिरवला जातो. यावेळी रथावर गुलालखोबऱ्याची उधळण होते. भाविकांकडूनसिद्धनाथांच्या नावाने चांगभलं…’ असा गजर सुरू असतो. यावेळी संपूर्ण म्हसवड शहर गुलालात न्हाऊन निघते. माणगंगा नदीच्या पात्रातून शहराला प्रदक्षिणा घालून हा रथ पुन्हा मंदिर परिसरात येतो. रथयात्रा हा येथील मोठा सोहळा असतो. यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित असतात.

याशिवाय दररोज सकाळी सायंकाळी श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवी यांना अभिषेक केला जातो. पहाटे वाजता काकड आरती, सकाळी .३० वाजता मुख्य आरती, दुपारी वाजता धुपारती, रात्री .३० वाजता पुन्हा मुख्य आरती रात्री १० वाजता शेजारती होते.

उपयुक्त माहिती:

  • म्हसवड बस स्थानकापासून ५०० मीटर, तर सातारा शहरापासून ८४ किमी अंतरावर
  • सातारा जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांतून म्हसवड येथे एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home