सिद्धिगणेश मंदिर

राम जोशी मार्ग, भटवाडी, घाटकोपर (पश्चिम), मुंबई

मुंबईतील प्रामुख्याने मराठी आणि गुजराती भाषिकांची बहुसंख्याक लोकसंख्या असलेल्या घाटकोपर या उपनगरातील ‘मिनी जुन्नर-आंबेगाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भटवाडीमध्ये सिद्धिगणेशास समर्पित असलेले भव्य मंदिर स्थित आहे. मुंबईच्या उपनगरांतील गणेशाचे हे मंदिर गेल्या तीन दशकांत असंख्य गणेशभक्तांच्या धार्मिक आस्थेचे केंद्र बनले आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरातील गणरायाप्रमाणेच येथील गणेशही नवसास पावणारा आहे. त्याचप्रमाणे या मंदिरातील गणेशाच्या दर्शनाने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाचे पुण्य लाभते अशीही लोकश्रद्धा आहे. यामुळे या मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळी दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ असते.

घाटकोपर हे मुंबईच्या मध्य रेल्वेवरील एक गजबजलेले स्थानक व उपनगर आहे. यास घाटकोपर हे नाव कसे पडले, याच्याविषयी अनेक शाब्दिक तर्क लावले जातात. त्यातील एक लोकप्रिय तर्क असा की पूर्वी येथे अनेक लहानमोठे डोंगर होते. त्यांत घाट असत. या भागांमध्ये अनेक मिठागारे होती. तेथे जायचे असल्यास लोक त्यास ‘घाट के पार’ असे म्हणत. त्यावरून या भागास घाटकोपर असे नाव पडले. दुसरी एक नामोत्पत्तीची कथा अशी की घाटकोपरवरून पवईचे डोंगर स्पष्ट दिसतात. या डोंगरांच्या कोपऱ्यावर असल्याने या ठिकाणाला घाटकोपर असे म्हणण्यात येऊ लागले. इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, या नामकथा लोकप्रिय असल्या तरी तो केवळ शब्दखेळ आहे.

घाटकोपर परिसरामध्ये पूर्वी घाटे आणि कोपर ही दोन गावे होती. त्यावरून त्यास घाटकोपर असे नाव पडले. अशा प्रकारे जोडनावे देण्याचा प्रकार विलेपार्ले किंवा नालासोपारा या नावांत दिसतो. ईळे किंवा इरले आणि पाडळे या दोन पाड्यांच्या नावांवरून विलेपार्ले हे जोडनाव आले, तर नाला आणि सोपारा या गावांवरून नालासोपारा हे नाव आले. घाटकोपरची घाटे आणि कोपर ही गावे येथे किमान बाराव्या शतकापासून आहेत. इ.स. ११४२ मध्ये मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी स्थापन करणारा मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब तसेच त्यानंतर इ.स. १२९५ मध्ये सत्तेवर आलेला यादव राजा रामदेवराय यांचा पुत्र बिंबदेव यादव यांची हकीकत सांगणाऱ्या ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथात घाटे आणि कोपर या दोन्ही गावांचा नामोल्लेख आहे. यावरून या गावांना किमान ९०० वर्षांचा इतिहास आहे.

प्राचीन काळी साष्टी (सालसेत) बेटांचा भाग असलेला घाटकोपर हा डोंगराळ तसेच मिठागरांचा भाग होता. जानेवारी १८०५मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या कारकिर्दीत शीवचा पूल बांधण्यात आल्यानंतर कुर्ले (कुर्ला), किरोळ (विद्याविहार) तसेच त्या पलीकडील घाटे, कोपर आदी गावांचा परिसर मुंबई बेटास जोडला गेला. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली व मुंबईचा प्रवास सुकर झाला. या रेल्वेने पहिल्या १३ दिवसांत (१८ ते ३० एप्रिल) २१ हजार ९२२ उतारूंनी प्रवास केल्याची नोंद कृष्णशास्त्री भाटवडेकर यांनी सन १८५४मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘लोखंडी रस्त्याचें संक्षिप्त वर्णन’ या पुस्तकात आहे. सन १८७७मध्ये घाटकोपर येथे रेल्वेस्थानक सुरू झाले. या सुमारास आरोग्यदायी हवामानामुळे घाटकोपर परिसराकडे मुंबईतील धनिक व्यापारी आणि उद्योजकांची दृष्टी वळली. अनेक गुजराती, पारशी, भाटिया, मारवाडी धनिकांनी येथे आपली निवासस्थाने बांधली. असे सांगण्यात येते की दक्षिण मुंबईत जो कापड बाजार होता त्या बाजारावर भाटिया समाजाचे वर्चस्व होते. त्यामुळे घाटकोपरवरून विशिष्ट वेळी निघत असलेल्या रेल्वेगाडीत या भाटिया समाजाच्या उतारूंची मोठी गर्दी असे. त्यावरून तिला लोक ‘भाटिया लोकल’ असे म्हणत असत. या भाटिया समाजाची मोठी वस्ती असलेल्या भागास भाटिया वाडी हे नाव पडले. त्याचाच अपभ्रंश भटवाडी असा झाला, असे सांगण्यात येते. पूर्वी या भटवाडीस घोड्याच्या नाल्याच्या आकाराच्या उंच टेकड्यांनी वेढलेले होते. त्यामुळे या भागास ‘हॉर्स शू व्हॅली’ असे म्हणत असत, असेही सांगण्यात येते. आज टोलेजंग इमारती आणि बैठ्या चाळींची दाटी असे भटवाडीचे स्वरूप आहे. येथेच सिद्धिगणेशाचे हे मंदिर वसलेले आहे.

येथील गणेशाच्या स्थापनेचा नेमका इतिहास अनुपलब्ध आहे. स्थानिक जाणकारांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर सध्या जेथे उभे आहे तेथे मोठे मैदान होते. परिसरातील मुले या मैदानात खेळण्यासाठी येत असत. १९७०च्या दशकात या ठिकाणी काही गणेशभक्तांनी एकत्र येऊन गणेशाच्या मंदिराची स्थापना केली. सन १९६९ मध्ये ‘अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळा’ची स्थापना करण्यात आली आणि या मंडळातर्फे येथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. यानंतर काही वर्षांतच येथे गणेशाचे आणि साईबाबांचे छोटे मंदिर उभारण्यात आले. हळुहळू या सिद्धिगणेशाचा महिमा वाढत गेला. १९९०च्या सुमारास मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये येथे सिद्धिगणेशाचे भव्य मंदिर उभारण्याचा विचार सुरू झाला आणि अखेर १९ ऑक्टोबर १९९६ रोजी येथे गगनगिरी महाराज यांच्या हस्ते नव्या गणेश मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

भटवाडीतील गजबजलेल्या तिठ्यावरील मैदानात वसलेल्या या मंदिराच्या प्रांगणास समोर गडकिल्ल्यासारखी तटबंदी आणि मोठी प्रवेशकमान आहे. या कमानीजवळच डावीकडे उंच दगडी छत्रीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा विराजमान आहे. मंदिरासमोरच्या प्रांगणात भक्तांच्या सोयीसाठी मोठी शेड बांधलेली आहे. या प्रांगणात सर्वत्र फरसबंदी केलेली आहे. मंदिर आधुनिक बांधकामशैलीतील आहे. उंच जगतीवर बांधलेल्या या मंदिराची रचना पारंपरिक पद्धतीनुसार सभामंडप आणि गर्भगृह अशा प्रकारची आहे. सभामंडप मोठे चौकोनी स्तंभ आणि समतल छत असलेला आहे. तो खुल्या प्रकारचा आहे. त्यास बाजूने कठडे लावलेले आहेत. संगमरवरी फरसबंदी केलेल्या या सभामंडपास तीन पायऱ्या आहेत. समोरच उंच चौथऱ्यावर गणेशाचे वाहन असलेली मूषकमूर्ती विराजमान आहे. सभामंडपातून तीन पायऱ्या चढून गर्भगृहाच्या अधिष्ठानावर प्रवेश होतो. गणेशमंत्र, तसेच गणरायाच्या विविध नावांनी सजवलेल्या या गर्भगृहात उंच वेदीवर सोनेरी मखर आहे. त्यात सिद्धिगणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. संगमरवरी पाषाणात घडवलेल्या या मूर्तीस वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेले आहे. मूर्तीच्या मस्तकाच्या वरच्या बाजूस सोनेरी छत्र आहे. मूर्तीसमोर गणरायाची धातूची मूर्ती विराजमान आहे. या गर्भगृहाच्या अधिष्ठानावरून त्यास प्रदक्षिणा घालता येते. सिद्धिगणेशाच्या या गर्भगृहाच्या डाव्या बाजूस मंदिराचे उपगर्भगृह आहे. त्यात संगमरवरी चौथऱ्यावरील चांदीच्या सिंहासनावर बसलेल्या शिर्डीच्या साईबाबांची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. भटवाडी परिसरातील असंख्य तरुण साईबाबांचे भक्त असून त्यातील अनेक जणांचा वर्षातून एकदा शिर्डीस पायी जाण्याचा शिरस्ता आहे, असे सांगण्यात येते. या दोन्ही गर्भगृहांवर आधुनिक बांधकामशैलीतील उरुशृंग प्रकारचे शिखर आहे. त्यावर सोनेरी कलश आहे.

या मंदिरात पहाटे ६ ते रात्री ९ या कालावधीत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. येथे रोज सकाळ-संध्याकाळी भाविकांची दर्शनासाठी मोठी वर्दळ असते. संकष्टी तसेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे दर्शनासाठी रांग लागते. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा उत्सव असतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव हा अर्थातच भाद्रपदातील गणेशोत्सव होय. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या १० दिवसांच्या काळात या परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मुंबईच्या विविध उपनगरांतूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती

  • घाटकोपर रेल्वे स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • कुर्ला एसटी बस स्थानकापासून ५.५ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा

सिद्धिगणेश मंदिर

राम जोशी मार्ग, भटवाड़ी, घाटकोपर (पश्चिम), मुंबई

Back To Home