खंडोबा मंदिर

खंडोबा टेकडी, जगडूशानगर, घाटकोपर (प.), मुंबई

‘कानडा विठ्ठलु’ हे महाराष्ट्राचे उपास्य दैवत आहे. त्याचप्रमाणे, संत एकनाथ महाराजांनी मल्हारी मार्तंड खंडोबा या देवतेचा ‘मैराळ देव कानडे’ आणि ‘कानडा खंडेराय’ असा उल्लेख केला आहे. मल्हारी मार्तंड खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. जेजुरी गडावरील कडेपठारावर खंडोबाचा निवास आहे. त्याचप्रमाणे, घाटकोपरच्या जगडूशानगर भागातील या उंच टेकडीवर खंडोबाचे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर या परिसरातील कामगार आणि मध्यमवर्गीय मराठी माणसांच्या आस्थेचे एक मुख्य केंद्र आहे. सोमवती अमावास्या आणि चंपाषष्ठी या दिवशी या स्थळी हजारो भक्त देवदर्शनासाठी येतात.

प्राचीन काळी साष्टी (सालसेत) बेटांचा भाग असलेल्या या परिसरात बाराव्या शतकापासून ‘घाटे’ आणि ‘कोपर’ या नावाची दोन गावे होती. इ.स. ११४२ मध्ये मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी स्थापन करणारा मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब, तसेच त्यानंतर इ.स. १२९५ मध्ये सत्तेवर आलेला यादव राजा रामदेवरायांचा पुत्र बिंबदेव यादव यांची हकीकत सांगणाऱ्या ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथात घाटे आणि कोपर या दोन्ही गावांचा नामोल्लेख आढळतो. या दोन गावांवरून घाटकोपर हे जोडनाम निर्माण झाले. हा परिसर डोंगराळ तसेच मिठागरांचा होता. घाटकोपरच्या या भौगोलिक वैशिष्ट्याचा प्रत्यय येथे आजही अस्तित्वात असलेल्या टेकड्यांवरून येतो. आज मोठ्या इमारती, चाळी आणि झोपड्यांनी या भागातील बहुतेक टेकड्या व्यापलेल्या आहेत. खंडोबाच्या नावाने ओळखली जाणारी टेकडी ही त्यांपैकी एक आहे.

ही टेकडी जगडूशानगरमध्ये वसलेली आहे. या नगराच्या नावालाही खास इतिहास आहे. तेराव्या शतकात गुजरातमधील कच्छ भागात होऊन गेलेले धनकुबेर व दानशूर जैन व्यापारी जगडू शाह यांचे नाव या वसाहतीस देण्यात आलेले आहे. जगदू, जगदुशा आणि जगदेव अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जगडू शाह यांच्या मालकीची अनेक जहाजे होती. त्या काळात त्यांचा पर्शिया, अरेबिया आणि आफ्रिकेतील देशांशी व्यापार होता. महाराष्ट्रातील मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांनी दुर्गादेवीच्या दुष्काळात (इ.स. १४६०) सुलतान अलाउद्दीन शाह बहमनी याची दोन धान्यकोठारे सर्वसामान्यांसाठी खुली केल्याची कथा सुपरिचित आहे. या दुष्काळाच्या आधी दोनशे वर्षे दक्षिणेत असाच भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी, म्हणजेच सन १२५६ ते १२५८ या काळात जगडू शाह यांनी आपली सातशे धान्यगोदामे गोरगरीब जनतेसाठी खुली केली होती. अशा दानशूर व्यक्तीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जगडूशानगरमधील खंडोबाचे हे मंदिर या परिसरातील एका वारकरी संताने उभारले आहे. त्यांचे नाव हरिभक्तपरायण शांतारामबाबा सुदामराव शिंदे देशमुख (उर्सेकर) असे आहे.

संतांनी खंडोबा या देवतेवर रूपके रचली आहेत आणि वीरपुरुषांनी त्यांच्याकडून साहसाची प्रेरणा घेतली आहे. अशा या खंडोबा देवावर ह.भ.प. शांतारामबाबांची निस्सीम भक्ती होती. वैष्णव विठोबा आणि शैव खंडोबा या दोन्ही देवतांची ते नेमाने वारी करीत असत. संत एकनाथांनी एका रचनेत, “वाघ्या-मुरळी नाचती परोपरी। आवडी ऐसी पाहीन जेजुरी।।” असे म्हटलेले आहे. शांतारामबाबा हेही नेहमी जेजुरीची वारी करीत असत. आपल्या या प्रिय देवतेची एकांतात नित्य उपासना करता यावी या हेतूने त्यांनी १९६७ मध्ये जगडूशानगर आणि भटवाडी यांच्या सीमेवरील या टेकडीवरील जागा निवडली. पूर्वी ‘लालबत्ती डोंगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डोंगराचा भाग त्यावेळी बव्हंशी गर्द वनराईचा आणि अत्यंत शांत असा होता. तेथे चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १८८९, २४ एप्रिल १९६७ रोजी त्यांनी एक छोटेसे मंदिर उभारले आणि त्यामध्ये खंडोबा आणि म्हाळसा यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. तेथे भजन-कीर्तनाचे, जागरण-गोंधळाचे कार्यक्रम होऊ लागले. येथील जगडूशानगर, भटवाडी, असल्फा या परिसरात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून, त्यातही प्रामुषाने पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या कामगार, कष्टकरी आणि नोकरदारांची मोठी वस्ती होती. खंडेराय, मल्हारी मार्तंड, मार्तंड भैरव, मल्हारी, म्हाळसाकांत, एवढेच नव्हे तर मल्लूखान, अजमतखान आदी नावांनी संबोधले जाणारे खंडोबा ही त्यांची कुलदैवत आहे. या देवतेचे मुख्य ठाणे पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडावर आहे. सातारा जिल्ह्यातील पाली येथील खंडोबाच्या ठाण्यासही मोठे महत्त्व आहे. या ठिकाणी ही मंडळी आवर्जून यात्रेस जात असत. मात्र, कामधंद्यामुळे किंवा इतर कारणांमुळे तेथे जाणे न जमणाऱ्या खंडोबाभक्तांसाठी टेकडीवरील हे मंदिर एक महत्त्वाचा धार्मिक पर्याय म्हणून समोर आले. यामुळेच खंडोबाचे हे ठाणे ‘सह्याद्री कडेपठार’ या नावाने प्रसिद्ध झाले.

दाटीवाटीच्या चाळींमधील अरुंद वाटेने मार्ग काढीत या टेकडीवर यावे लागते. सन २०१८-१९ मध्ये या टेकडीचे सुशोभीकरण करण्यात आले. समुद्रसपाटीपासून सुमारे २०० मीटर उंच असलेल्या या टेकडीवर येण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या. त्याचप्रमाणे, येथे थेट दुचाकी वाहने जातील अशी वाटही करण्यात आलेली आहे. या मार्गावर काही अंतर चालून गेल्यानंतर मंदिर परिसराची स्वागतकमान आहे. येथून काही अंतरावर सूर्यमुखी हनुमानाची छोटी देवळी आहे. त्या देवळीत हनुमान शिलास्वरूपात विराजमान आहेत. येथून काही पायऱ्या चढून आल्यानंतर मोठ्या तटबंदीत बांधलेले मंदिर परिसराचे महाद्वार दिसते. समोर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेल्या प्रांगणात मोठी दीपमाळ आहे. साधारणतः पारंपरिक पद्धतीच्या दीपमाळांमध्ये खालून वरपर्यंत दीपहस्त असतात. येथे हे दीपहस्त दीपमाळेच्या वरच्या अर्ध्या भागात बसवलेले आहेत.

येथील खंडेरायाचे मंदिर साध्या स्वरूपाचे व आधुनिक बांधणीचे, पत्र्याचे छप्पर असलेले आहे. वेळोवेळी करण्यात आलेले नूतनीकरण, त्यामध्ये कालांतराने उभारण्यात आलेल्या मूर्ती आणि त्यांसाठी बांधण्यात आलेल्या देवळ्या असे या मंदिराचे रूप आहे. त्याच्या बाह्यभिंतीवर तुकड्या-तुकड्यांची रचना वाटावी अशा प्रकारच्या संगमरवरी फरश्या बसवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या समोर एका चौथऱ्यावर सिमेंटचा एक मोठा अश्वपुतळा आहे. येथे लोखंडी चौकटीला मोठी घंटा टांगलेली आहे. येथून तीन पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गर्भगृहाकडे मुख असलेली देवळी आहे. त्यामध्ये गणेशाची पाषाणमूर्ती विराजमान आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एका चौथऱ्यावर हेगडे प्रधानाची मावळी वेशातील उभी मूर्ती आहे. हेगडे हा बाणाईचा भाऊ आणि खंडोबाचा प्रधान मानला जातो. ‘हेगडे’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘प्रधान’ असा आहे. गणेशाच्या देवळीच्या समोर संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची जुनी पाषाणमूर्ती आहे. खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरव हा शंकराचा अवतार मानला जातो. त्यामुळे येथे शिवगण असलेल्या नंदीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे नजीकच एक हवनकुंड आहे. समोर मंदिराचा मुख्य गाभारा आहे. त्याच्या प्रवेशद्वारानजीकच मोठ्या संगमरवरी चौथऱ्यावर ह.भ.प. शांतारामबाबांची काषाय वस्त्र परिधान केलेली बैठी मूर्ती विराजमान आहे. शांतारामबाबा यांचे ६ मार्च २०१९ रोजी निधन झाले. त्यानंतर दोन वर्षांनी, ९ डिसेंबर २०२१ रोजी येथे त्यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या प्रवेशद्वाराच्या उजवीकडील भिंतीवर खंडेरायाची मोठी प्रतिमा लावलेली आहे. गाभाऱ्यात मध्यभागी उंच अधिष्ठानावर उभारलेल्या मोठ्या संगमरवरी मखरामध्ये खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. येथे खंडोबा बसलेल्या रूपात प्रसन्नवदन आणि अभयमुद्रेत आहेत. मूर्तीच्या मस्तकी मोठी शिंदेशाही पगडी आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या आणि फुलांच्या माळा आहेत. म्हाळसाईची मूर्ती समपाद उभी आहे. तिला वस्त्रांलकार ऐवजी वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेले आहे. या मूर्तीच्या मागे मणि आणि मल्ल या दैत्यांचा वध करणाऱ्या अश्वारूढ खंडेराय व म्हाळसा यांची उठावशिल्प प्रकारातील मूर्ती आहे. या मखरामध्ये खंडोबाचे दोन पितळी मुखवटेही आहेत. मखराच्या अधिष्ठानावर गणेशाची छोटी प्रतिमा आहे, तर बाजूलाच हनुमानाची अभयमुद्रेतील पाषाणात कोरलेली मूर्ती विराजमान आहे. येथे मुख्य गाभाऱ्यालगत आणखी एक गर्भगृह आहे. त्यामध्ये उंच वेदीवर कालीमातेची मूर्ती विराजमान आहे. सन १९८२ मध्ये येथे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. येथे विठ्ठल-रुक्मिणीचेही मंदिर आहे. त्यामधील संगमरवरी मखरामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. या मखराच्या बाजूलाच उंच अधिष्ठानावर संत ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे. खंडोबा मंदिरापासून काही पावलांवर विठ्ठल-रुक्मिणी आणि दत्त-कानिफनाथ यांचे मंदिरही आहे. दत्त-कानिफनाथांच्या या छोट्या मंदिरास खुल्या प्रकारचा सभामंडप आहे. त्याच्या समोर नंदीची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपात गुरुवर्य लक्ष्मणबाबा सुदामराव शिंदे यांचे समाधिस्थळ आहे. छोट्याशा गाभाऱ्यात कानिफनाथ आणि दत्तात्रेयांच्या मूर्ती आहेत. खंडोबा मंदिराच्या परिसरातील भिंतींवर साईबाबा, शिवशंकर यांच्या उठावशिल्प प्रकारातील मूर्ती आहेत.

या मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांचा राबता असतो. खंडोबाच्या उपासनेत रविवार या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा भैरवाचा वार मानला जातो. हा बहुसंख्य कामगारांच्या, नोकरदारांच्या सुटीचाही दिवस असल्याने या दिवशी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी अनेक लोग येतात. या मंदिरात सोमवती अमावास्या, चैत्र पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, माघी पौर्णिमा, तसेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी (चंपाषष्ठी) या दिवशी येथे दर्शनेच्छुकांची मोठी गर्दी लोटते. चैत्री पौर्णिमेस मार्तंड भैरवाने अवतार घेतला. माघी पौर्णिमेस म्हाळसादेवीचा नेवासे येथे तिम्माशेटच्या घरी जन्म झाला, तर पौष पौर्णिमेस पाली येथे म्हाळसा व खंडोबा यांचा विवाह झाला. चंपाषष्ठीस खंडेरायाने मणि-मल्लांचा वध केला. यामुळे या दिवसांना खंडोबाच्या उपासनेत खास महत्त्व आहे. चंपाषष्ठी आणि सोमवती अमावास्येच्या दिवशी या मंदिर परिसरास खास सजवले जाते. त्यावेळी येथे जत्रेसारखे वातावरण असते. खंडोबाच्या या टेकडीवर पावसाळ्यात अनेक युवक-युवती गिरीभ्रमंती म्हणजेच ‘ट्रेकिंग’साठी येतात. पावसाळ्यात येथे धबधबेही पाहायला मिळतात. या टेकडीवरून महानगरी मुंबईचे विहंगम दर्शन होते. यामुळे धार्मिक स्थळाबरोबरच ही टेकडी एक पर्यटनस्थळही बनलेली आहे.

उपयुक्त माहिती

  • घाटकोपर रेल्वे स्थानकापासून सुमारे ३ किमी अंतरावर
  • कुर्ला एसटी बस स्थानकापासून सुमारे ६ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा

खंडोबा मंदिर खंडोबा

हिल, जगदुशानगर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई

Back To Home