दत्तात्रेय दुर्गांबिका देवस्थान

असल्फा, घाटकोपर (प.), मुंबई

सुमारे ९०० वर्षांपूर्वी येथे असलेल्या ‘घाटे’ आणि ‘कोपर’ या गावांनी मिळून ओळखल्या जाणाऱ्या घाटकोपरमधील ‘आसनपे’ म्हणजेच आजच्या असल्फा या भागात दत्तात्रेय आणि दुर्गांबिका देवीस समर्पित असलेले देवस्थान स्थित आहे. येथील देवीचे स्थान सुमारे ३०० वर्षांपासूनचे असल्याचे सांगण्यात येते. दक्षिण कन्नड प्रांतातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या काही नागरिकांनी मिळून सहा दशकांपूर्वी येथे या मंदिराची स्थापना केली. दत्तात्रेय, दुर्गांबिका देवी यांच्यासह येथे आंजनेय, नागशेष आणि चामुंडी माता अशी पाच देवपीठे विराजमान आहेत. येथे दर शनिवारी भाविकांची मोठी गर्दी असते.

हे मंदिर ज्या उपनगरात वसलेले आहे, त्या घाटकोपरचा इतिहास असा की प्राचीन काळी साष्टी (सालसेत) बेटांचा भाग असलेला घाटकोपर हा डोंगराळ तसेच मिठागरांचा भाग होता. जानेवारी १८०५ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या कारकिर्दीत शीवचा पूल बांधण्यात आला. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली. यामुळे कुरले (कुर्ला), किरोळ (विद्याविहार) याप्रमाणेच घाटकोपर आणि मुंबई बेटे यांच्यातील प्रवास सुकर झाला. सन १८७७ मध्ये घाटकोपर येथे रेल्वे स्थानक सुरू झाले. या सुमारास आरोग्यदायी हवामानामुळे घाटकोपर परिसराकडे मुंबईतील धनिक व्यापारी आणि उद्योजकांची दृष्टी वळली. अनेक गुजराती, पारशी, भाटिया, मारवाडी धनिकांनी येथे आपली निवासस्थाने बांधली. मुंबईतील कापड गिरण्या, कुर्ला परिसरात उभे राहिलेले कारखाने यामुळे या भागात अनेक कामगारांनी आणि मध्यमवर्गीयांनीही वस्ती केली. असल्फा हा त्यातलाच भाग होय.

घाटकोपरची नामोत्पत्ती विविध प्रकारे सांगितली जाते. घाटकोपरवरून पवईचे डोंगर स्पष्ट दिसतात. या डोंगरांच्या कोपऱ्यावर असल्याने या ठिकाणाला घाटकोपर असे म्हणण्यात येऊ लागले किंवा हा भाग ‘घाट के उपर’ असल्याने त्याचे घाटकोपर झाले, अशा विविध कथा आहेत. वस्तुतः साष्टी बेटांतील या परिसरात बाराव्या शतकापासून घाटे आणि कोपर या नावाची दोन गावे होती. इ.स. ११४२ मध्ये मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी स्थापन करणारा मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब तसेच त्यानंतर इ.स. १२९५ मध्ये सत्तेवर आलेला यादव राजा रामदेवराय यांचा पुत्र बिंबदेव यादव यांची हकीकत सांगणाऱ्या ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथात घाटे आणि कोपर या दोन्ही गावांचा नामोल्लेख आहे. या दोन गावांवरून घाटकोपर हे जोडनाम निर्माण झाले. या बखरीमध्ये आसनपे, तर बिंबाख्यान या ग्रंथात आसनप या गावाचा उल्लेख आहे. अभ्यासकांच्या मते, आसनपे या नावाचा अपभ्रंश पुढे आसलपे – आसलफे – असल्फा असा झाला.

दत्तात्रेय दुर्गांबिका देवस्थानची आख्यायिका अशी की घाटकोपरचा हा सर्व परिसर डोंगर-टेकड्यांचा व दाट झाडीचा होता. सुमारे ३०० वर्षांपूर्वी म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत येथील असल्फा टेकडीवर देवीदास महर्षी नावाचे देवीभक्त वास्तव्य करीत असत. ते येथे दुर्गांबिका देवीची पूजा करीत असत. तेव्हापासून येथे देवीचे ठाणे होते. परिसरातील भाविकही तिची पूजा करीत असत. पुढे इ.स. १९६४ मध्ये असल्फ्यातील सुभाष नगरात मंगळूर परिसरातील काही लोक वास्तव्यास आले. सायंकाळच्या वेळी ते दत्तात्रेयाची पूजा व भजन करीत असत. त्यांनी येथे दत्तात्रेयाचे एक छोटे देऊळ बांधले व तेथे दैनंदिन पूजेसाठी एका पुजाऱ्यास नेमले. त्यांच्या ‘दत्तात्रेय मित्र भजनी मंडळा’तील एका भाविकाने एके दिवशी दुर्गामातेची प्रतिमा आणली. तेव्हापासून सर्वजण दुर्गादेवीचीही आराधना करू लागले.

एका मंगळवारी या देवळातील पुजारी दत्तात्रेय व दुर्गांबिका देवीची मंगल आरती करीत असताना अचानक त्यांच्या अंगात दुर्गामाता आली. यानंतर पुढच्या शनिवारीही असेच घडले. त्यावेळी त्या पुजाऱ्याच्या अंगात आलेल्या देवीने सांगितले की ‘मला तुमची भक्ती आणि पूजा आवडली आहे, म्हणूनच मी येथे आले आहे. अनादी काळापासून तुमच्या चाळीसमोरील टेकडीवर ऊन-पावसात मी शिलारूपात विराजमान आहे. आता त्या टेकडीवर मी अपवित्र होत असल्याने, मला अशा ठिकाणी घेऊन चला की जेथे मी लोकांचे कल्याण आणि रक्षण करू शकेन.’ ही भजनी मंडळी सर्व गरीब कामगार वर्गातील होती. त्यांच्याकडे मंदिर बांधण्यासाठी धन आणि जागा नव्हती. ही अडचण सांगितल्यानंतर अंगात आलेल्या देवीने, चाळीच्या समोर असलेल्या जागेच्या मालकास भेटण्यास सांगितले. तेथील आंब्याच्या झाडाखाली ते आपली शक्तीशिला ठेवू शकतात, असे तिने सुचविले. मंडळाचे लोक त्या जागेचे मालक एम. एस. खन्ना यांना जाऊन भेटले. मात्र त्यांनी त्यांच्या विनंतीला काहीच प्रतिसाद दिला नाही. हे देवीला सांगितल्यानंतर तिने त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाण्यास सांगितले. त्यावेळी खन्ना यांनी ती आंब्याच्या झाडाजवळील जागा देण्यास असमर्थता दाखवली. मात्र त्याऐवजी दुसरी जागा देण्यास ते तयार झाले. देवीने त्या जागेस संमती दाखवल्यानंतर तेथे मंदिर बांधण्यात आले. १९ फेब्रुवारी १९६५ रोजी देवालय बांधून पूर्ण झाले. ‘दत्तात्रेय मित्र भजनी मंडळा’च्या सदस्यांनी मोठ्या मिरवणुकीने टेकडीवरून दुर्गामातेची शक्तीशिला आणली व मंदिरात तिची प्रतिष्ठापना केली. तेच आजचे दत्तात्रेय दुर्गांबिका मंदिर होय.

मंदिरातर्फे मुख्य द्वारासमोर मोकळे मैदान असून तिथे लोखंडी प्रवेशद्वार असलेले मैदान आहे. त्यात समोरच्या बाजूला मंदिराची दुमजली आडवी-रुंद वास्तू उभी आहे. मंदिरासमोर भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याचे छप्पर बांधण्यात आले आहे. येथे डावीकडे चामुंडी देवीचे मंदिर आहे. त्यात उंच वेदीवर चामुंडी देवीची चांदीचा मुखवटा असलेली मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीच्या मागे चांदीची कोरीव नक्षी असलेली प्रभावळ आहे. येथेच नाग संनिधी म्हणजे नाग देवतेची देवळी आहे. उंच ओट्यावर पत्र्याचे छप्पर असलेल्या या देवळीत उंच पायऱ्यांसारख्या अधिष्ठानावर एकावर एक अशा तीन नागशेषाच्या मूर्ती विराजमान आहेत. सण-उत्सवांच्या काळात या नागमूर्ती चांदीच्या मुखवट्याने मढवल्या जातात. मुख्य मंदिराच्या बाह्य दर्शनी भिंतीत सोनेरी रंग दिलेले अर्धस्तंभ आणि महिरपी आकाराच्या खिडक्या आहेत. येथील छोट्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर दाक्षिणात्य मंदिर परंपरेनुसार उंच ध्वजस्तंभ असून त्यासमोर दगडी बलिपीठ आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. त्यास संगमरवरी फरसबंदी आहे. चौकोनाकार स्तंभ असलेल्या या सभामंडपाच्या छतावर बिलोरी काचांचे झुंबर आहे. सभामंडपातील संगमरवरी देवळ्यांमध्ये गणेशाची आणि श्रीराम-लक्ष्मण-सीता व आंजनेय (हनुमान) यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर कर्नाटकी शैलीतील दोन सिंहमूर्ती विराजमान आहेत. गर्भगृहाच्या द्वारचौकटी नक्षीदार कोरीव काम असलेल्या चांदीच्या पत्र्याने मढवलेल्या आहेत. आत चांदीचा पत्रा जडवलेल्या उंच अधिष्ठानावर दुर्गांबिका देवीची मूर्ती विराजमान आहे. संगमरवरी पाषाणात घडवलेली ही मूर्ती वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेली आहे. तिच्या खालच्या बाजूस अधिष्ठानावर दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे दत्तात्रेय तीन मुखे, सहा हात आणि मागच्या बाजूस गोमाता अशा स्वरूपात विराजमान आहेत.

कन्नड भाषिक भाविकांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या या दत्तात्रेय दुर्गांबिका देवस्थानात रोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येतो. येथे रोज सकाळी ७ वाजता, सकाळी १०.३० वाजता आणि सायंकाळी ८ वाजता आरती केली जाते. या मंदिरात शनिवारच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. येथे दर शनिवारी रात्री ७ ते ८.३० या काळात भजनाचा खास कार्यक्रम आयोजित केला जातो.

त्यानंतर रात्री ८.३० ते ९ या काळात देवीची महाआरती केली जाते. रात्री ९ ते १० या काळात देवी दर्शनाचा खास उत्सव असतो. याच काळात येथे अन्नदान आणि तीर्थप्रसादाचे वाटप केले जाते. यानंतर रात्री १० वाजता मंदिरात मंगल आरती होते. दर महिन्याच्या अखेरच्या शनिवारी येथे रात्री ९ ते १० या काळात चामुंडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याशिवाय मंदिरात दत्तजयंती, नवरात्र, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी आदी उत्सवही पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात.

मंदिरात होळीच्या दिवशी सकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत विठ्ठल-रुक्मिणीचे अखंड भजन केले जाते. त्यास एक्का भजन असे म्हणतात. या मंदिरात भाविक विशिष्ट देणगी देऊन अन्नदान सेवा, शाश्वत पूजा, देवी चामुंडीची पणियार सेवा, त्याचप्रमाणे आपल्या वाहनांची पूजा करून घेऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • घाटकोपर रेल्वे स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • कुर्ला एसटी बस स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७७७७०७८३४९

दत्तात्रेय दुर्गाम्बिका मंदिर

असल्फा, घाटकोपर (पश्चिम), मुंबई

Back To Home